आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गझलेच्या गावात:​​​​​​​गझलेतील घर...

एका महिन्यापूर्वीलेखक: बदीऊज्जमा बिराजदार (साबिर सोलापुरी)
  • कॉपी लिंक

आदिमकाळापासून मानवाला स्वतःच्या संरक्षणासाठी निवाऱ्याची, घराची नितांत निकड भासत आलीय. म्हणूनच पूर्वीचा मानव गुहेत राहात होता. कालांतराने त्या गुहेलाच आजच्या घराचं आधुनिक स्वरूप आलंय. मानवी जीवनात घराला आत्यंतिक महत्त्व आहे. कारण माणसाचा सर्वाधिक काळ घरातच व्यतीत होतो. जीवनाची संध्याकाळ मावळेपर्यंत घर त्याची साथ-संगत करत राहातं. आपलं स्वतःचं एखादं टुमदार सुंदरसं घर असावं असं कोणाला नाही वाटत? "असावे घर ते आपुले छान' असं प्रत्येकाच्या डोळ्यात स्वप्न असतं. ज्याचं हे स्वप्न साकार होतं ते घरंदाज ठरतात.

घराचे आकार-प्रकार किती म्हणून सांगावेत. स्वप्नातलं घर... मनातलं घर... जनातलं घर... सावलीतलं घर... उन्हातलं घर… सुखाचं घर... दुःखाचं घर... सासर घर... माहेर घर... घरावर घरं... आकाशाशी बोलणारी... घरातली घरं... गर्दी करणारी... देवघर... स्वयंपाक घर... माजघर... शेजघर... स्वतःचं घर... भाड्याचं घर... फूटपाथवरचं घर... ज्याला घरचं नसतं ते बेघर... अशा लोकांचं काय? आयुष्यात माणूस एक घर उभं करता करता पार मोडून पडतो. त्याच्या खिशाला घरघर लागते. गोरगरिबांना स्वतःचं तेही मनासारखं घर बांधता येणं ही अपूर्व गोष्ट ठरते.

परंतु आपल्याला असेही काही अवलिये भेटत असतात, की ज्यांना ना घराची चिंता, ना छताची पर्वा असते! अवघ्या विश्वालाच 'हे विश्वचि माझे घर' असं मानून जगण्याच्या धुंदीत 'मुसाफिर हूँ यारो' म्हणत नुसती भटकत राहातात. त्यांची ही गोष्ट अलाहिदा! पण हे प्रत्येकाला शक्य नसतं. गझलकारांनी त्यांचं घर कसं बांधलं, कसं सावरलं, कसं सजवलंय, घर त्यांना कसं वाटतंय, घराविषयी त्यांचं आकलन काय? हे जाणून घेणं म्हणजे घरोघरी फिरणचं नाही का?

आयुष्यात कित्येकवेळा असे प्रसंग येतात की ज्यामुळं 'नको हे घर' असं वाटतं. परिस्थितीच्या शृंखला माणसाला चहुबाजूंनी जखडून टाकतात. 'घर फिरले की घराचे वासेही फिरतात' हे काही खोटं नाही. घरापासून दारापर्यंत त्याची एकसारखी घालमेल सुरू असते. घराचा सुन्नपणा, खिन्नपणा त्याला खायला उठतो. ज्या संपन्नतेची, वैभवाची आस उरात होती त्याची राख झाल्यावर घरात कोणत्या पावलानं प्रवेश करायचं, घर कसं सजवायचं? म्हणून तो उंबऱ्यातच अडखळतो. जगणं निराशेत रुतून जातं. त्रागा अनावर होतो. मग घराचा राग तो उंबऱ्यावर काढतो. आजन्म दुःखभोगाशी घरोबा करून राहणारे सुरेश भट लिहितात...

शेवटी राहिले घर सुनेच्या सुने उंबऱ्यावरच मी तणतणत राहिलो! ज्या शहराला आपण आपलं शहर समजून राहात असतो. त्या शहरात आपल्याला साधा आसरा नसेल, घर नसेल तर त्या शहराविषयी आपलेपणा कसं वाटणार? आपण इथं उपरेच आहोत. ही परकेपणाची आग मनात धुमसत राहाते. ही होरपळ मात्र शहराला नाही दिसत. शहर आपल्याशी संवेदनशून्यतेनं का वागतो, शहर आपल्याबाबतीत इतका निर्दयी कसा झालाय, इतरांप्रमाणंच शहरानं आपल्यावरही काळीजसावली का धरू नये, आपणही याच शहराचे नागरिक ना? या शहराच्या लौकिकात आपलाही वाटा आहेच ना? मग शहरानं असा दुजाभाव का करावा? असे अनेक प्रश्न त्याला पडत असतात. उत्तर मात्र सापडत नाही. 'एक अकेला इस शहर में आशियाना ढूँढता है' अशी त्याची अवस्था होऊन जाते. पण हा शोध संपणारा नसतो. चंद्रशेखर सानेकर यांनी बेघरांचं प्रातिनिधिक दुःख आपल्या शेरातून मांडलंय.

हे शहर आपले शहर नाही आसऱ्याला कुठेच घर नाही मने फाटली की संसार विस्कटत जातो. दैनंदिन ताणेबाणे जगणं कठीण करतात. आपल्याच घरात आपल्याला आसरा मिळू नये, घरातला एखादा कोपरा आपल्या वाट्याला येऊ नये, याचं शल्य हृदय कातरणारं असतं. पण ज्याचं स्वतःच्या श्वासांवर विश्वास असतो तो जराही खचत नाही. आसरा नसला म्हणून काय झालं, मी माझ्या हरेक श्वासात महाल बांधीन असा तो निश्चय करतो. निश्चयात बळकटी असली की उद्दिष्टही लोटांगण घेते अन घराचं रूपांतर महालात होतं. मग 'अवघाचि संसार सुखाचा करीन' याचा प्रत्यय येत राहातो. सतीश इनामदार यांच्या शेरातून हाच आत्मविश्वास फुलत राहातो.

जरी स्वतःच्या घरी मला आसराच नाही हरेक श्वासात बांधला मी महाल माझा

घर सुंदर असलं की रस्त्यालाही मोह नाही आवरत. तो त्या घराशी बांधिलकी पत्करतो. मग पावलंही आपसूक त्याच रस्त्यानं चालू लागतात. त्यात पावलांचा दोष तो काय? तिच्या किंवा त्याच्या अस्तित्वामुळेच घराला घरपण लाभतं हे घरपण मनोभावे भावतं तेव्हा असंच घडतं. रस्त्यानं त्या घराशी बांधील व्हावं ही गोष्ट नवलाईची नाही ठरतं. हे संबंधांचं पुल दृढ करत जाणं असतं यात कुणाचा दोष किंवा रोष नसतो. नीता भिसे यांनी खास बांधिलकीचा शेर आपणास दिलाय्.

माझ्याच पावलांना मी दोष काय देऊ? रस्ता तुझ्या घराशी बांधील होत गेला..

झाडावरचे पक्षीही घरटं बांधतात. वादळ-पावसापासून संरक्षणासाठी त्यांनाही घरट्याची गरज असते. एकेक काडी चोचीत आणून झाडावर घरटं विणण्याचं काम अविरत चालू असतं झाडाच्या एखाद्या जाड फांदीवर सुरेखसं घरटं तयार झालं की पाखरं किती सुखावून जातात. पण वादळानं क्षणात चिमणीचं घर उद्ध्वस्त होऊन जातं नंतर वादळाचा अश्रू ढाळण्याचा उपयोग नाही होत. हे पाखरांचं दुःख इलाही जमादार यांच्या शेरातून येतं. क्षणात गेले ध्वस्त करोनी घर चिमणीचे

कशास आता अश्रू गाळत बसले वादळ
घराचं घरपण कळायला समजुतदार मनं हवीत. जेव्हा माणसातील हैवानं गावच्यागावं पेटवून देतात तेव्हा घरांची राखरांगोळी होते. ही राखरांगोळी नुसत्या घरांची नसते तर स्वप्नांची, माणुसकीचीही असते. बघताबघता होत्याचं नव्हतं होऊन जातं यातून हैवानांच्या मनोविकृतीचं दर्शन घडतं. महानगरीत मोठमोठ्या इमारतींना आगी लावण्यात येतात. ज्वाळा भडकत जातात. परंतु अग्निशामन दलाच्या गाड्या वेळेवर पोहोचतातच असं नाही. पाऊसही तसंच काहीसं वागत असतो. जेव्हा त्याची गरज असते तेव्हा तो कधीच बरसत नाही. माणसाप्रमाणंच पावसाचं विचित्र वागणं राजेंद्र शहा यांनी आपल्याशी शेअर केलंय त्यांच्याच शेरातून.

राहिली गावात जेव्हा राख झालेली घरे पावसाचे थेंब आता का पडाया लागले

आपण जुनं घर सोडून नव्या घरात राहायला येतो. काळ लोटत जातो. तरीही त्या जुन्या घराच्या आठवणी मनाच्या कप्प्यात सदैव ताज्या, टपोऱ्या असतात. आपल्या असल्या नसल्या सगळ्या सगळ्या खुणा ते घर जपून ठेवत असतं. त्या घराच्या कानाकोपऱ्यात आपले श्वास बागडत असतात. तिथं आपल्या अस्तित्वाची छाया पसरलेली असते. त्यात आपण जगलेल्या-जागवलेल्या आठवणींच्या पानांची सळसळ असते. जुनं घर आपल्या मनातलं घर असतं. ते आपल्या भावविश्वाचं साक्षीदार असतं. आपल्या सुख-दुःखाचे कितीतरी क्षण त्या घरात भरलेले असतात. आपल्या आयुष्याचा किती मोठा अवकाश त्या घरानं व्यापलेला असतो. ते घर आपल्याला पुन्हा पुन्हा साद घालत राहातं. हितगुज करण्यासाठी आसुसलेलं असतं. कधी आपली पावलं तिकडं वळली की आपण विलक्षण हळवे बनतो. भावनांचा प्रचंड कल्लोळ उठतो. घर डोळ्यात खोल उतरते. आपण जसं बघू तसं घर दिसू लागतं. काळ गोठून जातो. मग कितीतरी वेळ आपण घराकडं अन् घर आपल्याकडं पाहात राहतं वा. न. सरदेसाई यांच्या जुन्या घराकडील आठवणींना उजाळा देणारा हा शेर.

नव्या घरात येउनी बराच काळ लोटला.. जुन्या घरील नाव ते पुसायचेच राहिले…

घर म्हटलं की नुसत्याच चार भिंती एवढंच नसतं. घर आपुलकीच्या भिंतीत गजबजलेली एक दुनियाच असते. त्यात फुलांचा सुगंध असतो. घनदाट सावलीचा निवांत सुखद संग असतो. घरात वस्ती असते देवाची. घर म्हणजे देवाचा गाभारा असतो जणू! म्हणून प्रत्येकानंच पावित्र्यासह घराचं घरपण जपलं पाहिजे. आपल्याला हाच संदेश गझलकारांचा घराणा देतोय.

contact@sabirsolapuri.com

बातम्या आणखी आहेत...