आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गझलेच्या गावात:गझलेतील आंबेडकरी चळवळ

एका वर्षापूर्वीलेखक: बदीऊज्जमा बिराजदार (साबिर सोलापुरी)
  • कॉपी लिंक

येत्या चौदा एप्रिलला विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आपण साजरी करणार आहोत. या पार्श्वभूमीवर गझलेतील आंबेडकरी चळवळीचा धांडोळा घेणं औचित्यपूर्ण ठरेल. आजच्या बदलत्या आंबेडकरी चळवळीकडं नव्या पिढीतील गझलकार कसं पाहतात, त्यांना नेमकं काय वाटतं याची कैफियत त्यांच्याच शेरांतून जाणून घेण्याचा हा प्रयास.

पूर्वी जागोजागी आंबेडकरी जलसे व्हायचे त्यात भीमगीते, अन् शायरीच्या माध्यमातून परिवर्तनाच्या चळवळीला चेतना, चालना देण्याचं काम व्हायचं. त्यात आप्पा कांबळे, विठ्ठल उमप, डी. आर. इंगळे, लोककवी वामनदादा कर्डक हे आघाडीवर होते. उमप अन् वामनदादांचे जाहीर स्वतंत्र कार्यक्रमही व्हायचे. त्यांच्या पहाडी आवाजातील साभिनय दमदार सादरीकरणाला लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभायचा. परिवर्तनाच्या विचारांनी लोक भारावून जायचे. अस्सल माणूसपणाच्या जाणिवा विकसित करण्याचा तो काळ होता. हे सगळेच शाहीर बाबासाहेबांच्या विचारांचे पाईक होते. बाबासाहेबांच्या समाजसुधारणेच्या संकल्पनेचा त्यांच्यावर मोठा प्रभाव होता. त्यांच्या सादरीकरणामागे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची मूळ प्रेरणा होती. आंबेडकरी चळवळीला धार देण्यात शाहिरांचा मोलाचा वाटा होता. हे नाकारून चालणार नाही.

नंतरच्या काळात मराठी काव्याच्या प्रांतात गझल रुजली. लोकप्रिय झाली. वामनदादांसह नव्या पिढीतील गझलकारांनी तिचा स्वीकार केला. तेही आंबेडकरी चळवळीच्या अंगानं मुक्तपणे व्यक्त होऊ लागले. अशा प्रगल्भ जीवन जाणिवेनं लिहिणाऱ्या गझलकारांची संख्या आज लक्षणीय आहे. ही स्वागतार्ह बाब आहे. आजच्या बदलत्या आंबेडकरी चळवळीच्या परिप्रेक्ष्येतून त्यांना नेमकं काय वाटतं, काय जाणवतं, त्यांचं निरीक्षण, आकलन काय आहे? डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या येऊ घातलेल्या जयंतीच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या शेरांमधून जाणून घेण्याचा हा प्रयास आहे.

गझलसम्राट सुरेश भट यांचा आंबेडकरी चळवळीशी निकटचा संबंध होता. बाबासाहेबांच्या उत्तुंग, सर्वव्यापी व्यक्तिमत्त्वावर त्यांनी अनेक गीते, गझला लिहिल्यात. केवळ इतकेच नव्हे तर "झंझावात' हा त्यांचा गझल-कवितासंग्रह त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना सविनय अर्पण केलाय. यावरून भटांची आंबेडकर चळवळीशी जुळलेली नाळ स्पष्टपणे दिसून येते. "स्वातंत्र्य, समता, बंधुता' ही बाबासाहेबांनी दिलेली त्रिसूत्रीच भटांच्या काव्य लेखनाच्या केंद्रस्थानी होती. मानवमुक्तीचं तांबडं फुटावं, माणुसकीचा विजय व्हावा यासाठी हयातभर खस्ता खाणाऱ्या अनेक पातळ्यांवर सतत संघर्षरत राहणाऱ्या विश्वरत्न डॉ. आंबेडकरांच्या महापरिनिर्वाणानं दशदिशा अंधारल्या जगाला मोठा हादरा बसला. जगाची छाती फाटली. त्यांच्या तमाम लेकरांचा शोक अनावर झाला. याला भटही अपवाद नव्हते. त्यांनी बाबासाहेबांवर गझल लिहिली त्याचा मतला असा...

कुठे गेलास तू? माया तुझी का आटली बाबा? कुठे गेलास तू? छाती जगाची फाटली बाबा वामनदादा हे जसे प्रतिभावान गीतकार, गझलकार होते तसेच ते हाडाचे कार्यकर्तेही होते. बाबासाहेबांचा समतेचा विचार गावोगावी पोचवावा त्याकरिता ते अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतही पदरमोड करून आपल्या कार्यक्रमांनी ग्रामीण महाराष्ट्र पिंजून काढत असत. बाबासाहेबांकडून घेतलेल्या विचारांचा वसा त्यांनी अखेरच्या श्वासापर्यंत टाकला नाही. परिणामकारक शब्दांनी ते तडफेने जनजागृती करत राहिले. बाबासाहेब म्हणजे त्यांचा जीव की प्राण होता. भीमावरची निष्ठा, श्रद्धा खरी असावी. त्यात नाटकीपणा, दिखावा असू नये. असं ते सांगत असत. दांभिकपणाचा त्यांना राग होता. बलिदान द्यायची वेळ आली तरी सत्यापासून ढळायचं नाही. असं त्यांचं कळकळीची सांगणं होतं. त्यांच्या एका शेरात ते म्हणतात.

तुझी निष्ठा, तुझे जीवन, तुझी श्रद्धा भीमावरची नसावी नाटकी 'वामन' खरे बलिदान मागावे महाडच्या चवदार तळ्याचा सत्याग्रह ही बाबासाहेबांच्या जीवनातील क्रांतीकारी घटना होती. इथल्या मुजोर प्रस्थापित व्यवस्थेनं लादलेल्या जातीव्यवस्थेला, विषमतेला निर्भयपणे ललकारून, सामाजिक समतेची, न्यायाची, हक्काची अस्पृश्यांना जाणीव करून देणारा तो ऐतिहासिक लढा होता. तहानेनं व्याकूळ झालेल्या माणसाला पाणी देण्याचं नाकारणं हा सामाजिक गुन्हा आहे. असं बाबासाहेबांचं स्पष्ट मत होतं. तो केवळ पाणी वाटप करण्याचा सत्याग्रह नव्हता तर तो सत्याग्रह मानवी प्रतिष्ठेची अवहेलना करणाऱ्या विषमतेच्याविरुद्ध समता प्रस्थापित करण्याचा निर्णायक संघर्ष होता. जगास माणुसकीचं, समतेचं महत्त्व पटवून देणारं ते कृतिशील आंबेडकरी आंदोलन होतं. महाडचे तळे बाबासाहेबांसारख्या महामानवाच्या स्पर्शानं अधिक चवदार, चमकदार झाले. ज्येष्ठ गझलकार रमेश सरकाटे यांनी त्यांच्या शेरांतून या महत्त्वाच्या घटनेकडं लक्ष वेधलंय.

जगास महत्त्व माणुसकीचे सांगत असते चवदार तळे समतेसाठी मर्यादा पण लांघत असते चवदार तळे बाबासाहेबांनी लेखणीचं मोल खूप आधी जाणलं होतं. अज्ञानाच्या अंधारात गोते खाणारा आपला समाज साक्षर झाला पाहिजे. साक्षरतेतूनच माणसात सशक्तता येते म्हणून त्यांनी प्रथमतः 'शिका, संघटित व्हा, संघर्ष करा' हा व्यापक नारा दिला. त्यांनी आपल्या लेखणीतून अक्षरांची दौलत वाटली. ज्ञानवंचितांच्या झोळीत शब्दांचे तारे टाकले. त्यामुळे झोपडी-झोपडीत ज्ञानाचा दिवा लागला. उपेक्षितांची जीवने उजळून निघाली. समाज लिहू लागला. लेखणीला धार आली. अक्षरांना कंठ फुटला. हा समाज बोलू लागला, हक्क मागू लागला यातून दलित साहित्याचा प्रवाह खळाळू लागला. आंबेडकरी चळवळ जोर धरू लागली. ही कमाल होती बाबासाहेबांनी दिलेल्या तेजस्वी लेखणीची. हे निर्विवाद वास्तव शरद काळे यांनी त्यांच्या शेरातून मांडलंय.

देऊन लेखणी तू, आम्हा सशक्त केले झोळीत वंचितांच्या, तू टाकलेस तारे संसदेला घटनेनं दिलेलं पावित्र्य आहे, गांभीर्य आहे. संसद म्हणजे अन्यायग्रस्तांच्या, अभावग्रस्तांच्या दु:खाला वाट मोकळी करून देण्याची जागा आहे. परंतु इथं राजकीय पक्ष मासळी बाजारासारखा नुसता गोंधळ घालतात. तेवढ्यापुरती एकमेकांची उणीदुणी काढतात. त्यांच्या चेष्टा-मस्करीच्या विदुषकीचाळ्यात सर्वसामान्यांचे प्रश्न कुठल्याकुठे विरून जातात. संसदेवर पाशवी कब्जा सांगणारे उदयास आले की 'संसद बोले भारत डोले' अशीच परिस्थिती निर्माण होते. मग 'मुकी बिचारी जनता कुणीही हाका' याचा पावलोपावली प्रत्यय येऊ लागतो. याच संसदेत भीमरायांनी मांडलेला जनतेचा आक्रोश, जनतेचा घेतलेला कैवार, त्यांनी केलेली घणाघाती भाषणं चिरकाल गुंजणार्या नाऱ्यासारखी होती. संसदेच्या भिंतीना आजही ते नारे ऐकू येत असतील. भीमाचे नारे निष्ठूर व्यवस्थेच्या काळजाला चिरणारे होते. त्यांच्या सदाबहार नाऱ्याविषयी ईश्वर मते यांनी असं मत नोंदवलंय. तू संसदेत भीमा जे बोललास ते ते चिरकाल गुंजणाऱ्या नाऱ्या समान आहे!

गावकुसातला बहिष्कृत माणूस गावात यावा. माणसं माणसात मिसळावीत. हजारो वर्षांपासून त्यांच्यावर लावण्यात आलेला अस्पृश्यतेचा कलंक धुवून निघावा. गुलामीच्या दास्यातून त्यांची सुटका व्हावी. त्यालाही इतरांप्रमाणेच आत्मसन्मानाने जगता यावे या उद्देशानेच तर बाबासाहेबांनी संविधान लिहिले. या संविधानानेच उपेक्षितांची लाज राखली गेली. माणसाची, त्यांच्या अंगच्या कला गुणाची कदर झाली. परंतु हे सारे सहज नाही घडले. यासाठी बाबासाहेबांना प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागली. ज्यांच्या हाती लेखणीचा मक्ता होता, त्यांनी जाणीवपूर्वक लिहून ठेवलेल्या त्यांच्या सोयीचा इतिहास बदलून टाकावा लागला. आपल्या अफाट बुद्धिकौशल्यानं आधुनिक, सर्वसमावेशक इतिहासाची नव्यानं मांडणी करावी लागली. म्हणूनच तर दीनदुबळ्यांच्या संरक्षणाचं संविधान हे कायदेशीर अस्त्र बनलं याचं सारं श्रेय बाबासाहेबांकडंच जातं या आशयाचा शेर हेमलता ढवळे असा लिहितात.

संविधान हे लिहून बाबा! लाज राखली उपेक्षितांची इतिहास बदलून बाबा! कदर जाहली मानव्यांची

संविधान हे माणसाला माणसात आणून त्यांना त्यांच्या मूलभूत हक्काची जाणीव करून देण्याला प्राधान्य देतं. जिवानं जिवाशी निर्मळपणानं बोलण्याची भाषा करतं. संविधान म्हणजे बाबासाहेबांच्या अंतःकरणाचा आदर्श अविष्कार आहे. ते तितक्याच आत्मीयतेनं समजून घेणं अगत्याचं आहे. तरीही काही खोडसाळ लोक अधून मधून संविधान बदलण्याची वल्गना करत असतात. जुने दळण ते नव्यानं दळत असतात. त्यांना कशाशीच काही देणं-घेणं नसतं अशा अपप्रवृत्तीवर इ. मो. नारनवरे यांनी प्रकाशझोत टाकलाय. अरे! संविधाना बदलण्या कसे

जुने ते नव्याने दळू लागले आपसातील जळमटे, क्लिमिषं साफ करून मनामनात समतेची ज्योत प्रज्वलित करून चौदा एप्रिल साजरी करणं म्हणजे आंबेडकरी चळवळीला ऊर्जा देण्यासारखं आहे असाच संदेश गझलकार यांनी दिलाय.

contact@sabirsolapuri.com

बातम्या आणखी आहेत...