आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गझलेच्या गावात:​​​​​​​गझलेतील दुनियादारी

एका वर्षापूर्वीलेखक: बदीऊज्जमा बिराजदार (साबिर सोलापुरी)
  • कॉपी लिंक

दुनियादारीला गझलकार कसं सामोरं गेले. ही रंगीबेरंगी दुनिया त्यांना कशी वाटली. कोणते रंग त्यांना भावले. कोणते रूप त्यांना पावले. इथं त्यांना सगे भेटले की दगे? त्यांच्या वाट्याला वाळवंट आलं की हिरवळ, त्यांना अमृत मिळालं की हलाहल? हे सगळं त्यांच्या शेरांमधूनच उलगडत जाणार आहे.

ही दुनिया दिसते तशी ती कधीच नसते. दुनिया अनेक रंगात रंगलीय तिचं नेमकं अंतरंग कोणतं याचा उलगडा भल्याभल्यांनाही करता आलेलं नाही. दुनिया अथांग... तिचा लागत नाही थांग... दुनिया विविधरंगी... दुनिया नानारुपी... दुनिया नाटकी… दुनिया छाटकी... दुनिया घातकी… दुनिया पातकी… पदोपदी. दुनियेची किती सांगावी व्यथा... परी त्याची कथा... फसलेली. ही दुनिया म्हणजे नुसत्या माणसांची गर्दी... त्यात क्वचितच असतो दर्दी... इथं जीवनाच्या वाटेवर कुणी भेटतो संतांच्या शैलीनं... कोणी भेटतो सैतानाच्या चालीनं... या दुनियेची तऱ्हाच निराळी... कधी दुःखाची दिवाळी... कधी सुखाची होळी... हीच असते दुनियादारी... इथं शिक्षा भोगतो परोपकारी... कसं जगायचं माणसाशेजारी... फिरे दारोदारी... दुनियादारी. कशी निभवायची दुनियादारी... तिला नाचविण्यासाठी लागतो जातिवंत मदारी... ही दुनिया किती कोसांची… किती श्वासांची... कोणालाही न कळे... पाषाणाच्या पिंजऱ्यात काळोखा सूर्य जळे… या दुनियादारीला गझलकार कसं सामोरं गेले. ही रंगीबेरंगी दुनिया त्यांना कशी वाटली. कोणते रंग त्यांना भावले. कोणते रूप त्यांना पावले. इथं त्यांना सगे भेटले की दगे? त्यांच्या वाट्याला वाळवंट आलं की हिरवळ, त्यांना अमृत मिळालं की हलाहल? हे सगळं त्यांच्या शेरांमधूनच उलगडत जाणार आहे. ही दुनिया माणसांनी गजबजलेली असली तरी इथं माणसं माणसाला समजून घ्यायला मुळीच तयार नाहीत. कुणाचं ऐकून घ्यायला त्यांना उसंत नाही. जो तो आपल्या कोशात बंद आहे. इथली माणसं ठार बहिरी झालीयत, मनं पत्थरांची झालीयत. कुणालाच फुटत नाही पाझर... ना मानवतेची चाड ना चांगुलपणाची कदर... माणुसकी, सहानुभूती, प्रेम, दया ही मूल्ये केव्हाच झालीत हद्दपार… भावना, संवेदना झाल्यात कस्पटासमान... कुणाला नाही कळत थोर सान... पाषाणाच्या या दुनियेत फूलमनाच्या माणसाला भविष्य उरलेलं नाही. इथल्या वागण्या-बोलण्याची रीत व्यवस्थेचाच भाग असतो. त्यावर प्रत्येक जण ठाम असतो. जिथं भाव भावुकतेला नाही तर घावुकतेला असतो. तिथं कोमल हृदयी कवीचं म्हणणं, सांगणं, कोण ऐकणार? जिव्हाळ्यातून फुटलेल्या उमाळ्याकडं कोण पाहणार? पाषाण शेवटी पाषाणच असतं. यावर सुरेश भट यांचं प्रतिपादन येतं ते असं. ही दुनिया पाषाणाची बोलून बदलली नाही मी बहर इथे शब्दांचे नुसतेच उधळले होते एकदाच मिळणार आयुष्य माणसाला त्याच्या मर्जीप्रमाणं, आपल्या धुंदीत जगता आलं पाहिजे अशी मोकळीक निसर्गानं माणसाला दिलीय. परंतु अनेक वेळा माणसाच्या जगण्याच्या मूलभूत हक्कावर दुनियावाल्यांकडून घाला घालण्यात येतो. आम्ही म्हणतो तसच जगलं पाहिजे असा त्यांचा दुराग्रह असतो. एखाद्याला सतत धाकात, दहशतीखाली ठेवून त्याचं जगणं मुश्कील करून टाकण्यात येतं. कमी-अधिक प्रमाणात दुनियेत जागोजागी असंच आजवर घडत आलंय. दुनियेची ही कुठली पद्धत, हा कुठला न्याय, कुणी बनवलीय् ही नियमावली? दुनियेची ही अरेरावी का म्हणून खपवून घ्यायची. आपल्याला वाटतं, आवडतं तसंच जगलं पाहिजे दुनियेचे नियम रटत बसण्यात फारसा अर्थ नसतो. याची ग्वाहीच जणू नितीन देशमुख यांचा हा शेर आपल्याला देतो.

मला वाटते तसेच माझे जगणे आहे मी दुनियेचे नियम फारसे रटले नाही..

दुनियेत सर्वत्र स्वार्थाची बजबजपुरी झालीय्. सर्व काही मलाच पाहिजे. सर्वांवर माझाच अधिकार. अशी अप्पलपोटी हव्यासामागं माणूस पिसाट वेगानं पळत सुटलाय्. त्यामुळेच तो जीवनाचा सूर पार हरवून बसलाय. शेजारधर्म पाळण्याचं साधं कर्तव्यदेखील तो नाही करत. भोगवादी प्रवृत्तीचा मानवी मनावर बसलेला पगडा मानवी जीवनाची शोकांतिका बनत आहे. विज्ञानानं अंतराळात झेप घेण्याचं सामर्थ्य माणसाला लाभलं तरी शेजारच्या माणसाच्या अंतरंगात डोकावण्यास तो राजी नाही. हे सामाजिक मूल्याचं भयानक अधःपतन आहे. त्यामुळं प्रामाणिकपणानं आपलं आयुष्य जगणारे कितीक गुणीजन उपेक्षेच्या खाईत फेकले जाताहेत. सत्याची सोबत करत नि:स्वार्थपणानं जगत राहणं हाच मुळी दुनियेत गुन्हा ठरत चाललाय. ही आंतरित घालमेल व्यक्त करणारा जनार्दन म्हात्रे यांचा हा शेर.

राहिलो नि:स्वार्थ येथे, हाच का होता गुन्हा स्वार्थ या दुनियेतले हे, मज गिळाया लागले

'दामकरी काम' ही दुनियेची रीत आहे. पैशाच्या अवास्तव महत्त्वामुळं सामाजिक न्यायाला किंमत उरलेली नाही. म्हणून माणसाच्या अंगच्या गुणांपेक्षा त्याचं मोठेपण त्याच्या आर्थिक परिस्थितीवर मोजलं जात आहे. सामाजिक जीवनाला लागणारा स्नेहाचा, आपुलकीचा ओलावा आटून त्याला पैशाची, जमीन जुमल्याची राक्षसी अवकळा आलीय्. दुनियेवर आपला जन्मजात हक्क सांगणारे सिकंदरासारखे किती राजे-महाराजे आले अन् रिकाम्या हाताने मातीत मिसळून गेले. आज त्यांच्या समाधीवर कुणी दिवाही नाही लावत. हे डोळ्यात अंजन घालणारं सत्य समोर असतानाही स्वतःला अधिकाधिक वैभव प्राप्त व्हावं म्हणून दुसऱ्यांवर अन्याय करण्याची प्रवृत्ती बळावत चाललीय. अफाट धनाचा लोभ माणसाला विनाशाकडंच घेऊन जाणारा असतो. हे उघड सत्य जाणून असलेले श्रीकृष्ण राऊत लिहितात.

माझ्या हिस्स्यापुरती जागा मनात दुनिये दे कायमची मला कोण्या सिकंदराच्या धनात वाटा नको वाटतो

ही दुनिया रोज नवनवे रंग दाखवत असते. पावलागणिक ती सरड्याप्रमाणं रंग बदलत जाते. दुनियेचं दिसणं अन् असणं यात मोठा फरक असतो. इथं प्रत्येकाच्या चेहर्यावर असतो मुखवटा... तोच असतो सर्वसामान्यांसाठी भोगवटा... इथली वाट वाकडी... भावना खोटारडी... इथले व्यवहारही खोटेनाटे कोण कधी करेल गुन्हा... कोण कधी कुणाला लावेल चुना... सांगता नाही येत. दुनियेचे हे रोजचे डावपेच पाहून सरळमार्गी माणसाचा जीव अगदी मेटाकुटीला येतो. ही दुनिया जर लबाडांच्या, खोट्यांच्या, निर्दयी माणसांच्या मुठीत असेल तर इथलं सत्य काय? पोटातली भूक हेच इथलं अंतिम सत्य. याचा प्रत्यय ज्याला येतो त्याच्या पोटातला वणवा स्वप्नांची दुनिया जाळून टाकतो. श्रीजित वाघमारे यांनी हेच सनातन सत्य आपल्या शेरातून मांडलंय. निर्दयी दुनियेत माझ्या सत्य आहे एवढे भावना खोटारडी अन् भूक पोटाची खरी दुनियेचे वेगवेगळे चाळे... ही दुनिया मोहमयी. इथं पिकतात मोहाचे मळे... टाकले जातात आमिषांचे जाळे... हे लक्षात घेतलं पाहिजे. आपण जसे अंतरी असतो. तसेच बाहेरूनही राहिलं हवं. आमिषांना बळी न पडता कोणत्याही सापळ्यात, घपल्यात न आडकता, ईमान जराही ढळू न देता या दुनियेला सामोरं गेलं पाहिजे. नाहीतर ही दुनिया धड जगू देत नाही... धड मरु देत नाही... दुनियादारीच्या मागं न धावता आपण आपला आतला आवाज ऐकला पाहिजे. 'हा मार्ग माझा वेगळा' म्हणत वाटचाल सुरू ठेवली की, दुनियादारीचं लचांड मागं नाही लागत. दुनियादारीत आपण सजग राहायला हवंच. असा संदेश अस्मिता गायकवाड यांच्या शेरातून मिळतो. या आमिषांच्या दुनियेमध्ये ईमान माझे ढळले नाही दुनियाकडं बघताना 'सब घोडे बारा टक्के' असा विचार करूनही नाही चालत. सज्जन माणसंही दुनियेत आहेत. त्यामुळेच ही दुनिया सुंदर झालीय्. आख्खी वाट काट्यांनीच भरलेली नसते. त्यात काही फुलंही उमललेली असतात. तेवढ्यानंही जगणं सुगंधित होऊन जातं. दृष्टीकोन सकारात्मक असला की अशी सुगंधी माणसं आपल्याला भेटत जातात. मग दुनियाच फुलांची होऊन जाते. सद् संगतीचा हा परिणाम असतो. दुनियादारी निभावताना चांगलं तेवढं वेचता अन् देता आलं की मग दुनियेविषयी तक्रारीला जागा नाही उरत. दृष्टी स्वच्छ ठेवली ही मायेनं गंधाळलेली स्वच्छ माणसं दिसू लागतात. यालाच तर 'दृष्टीत सृष्टी' असं म्हटलं गेलंय्. याला अनुरुपच संदीप माळवी यांचा शेर येतो. माणसांचा अता गंध येतो मला काय दुनिया असावी फुलासारखी! दुनियेशी लढून कोण जिंकतो? दुनियेशी वाद घालत बसण्यापेक्षा ती समजून घेणंच हितावह होईल. माणूस अन् दुनिया या दोघांचा अनुबंधच नव्हे तर ऋणानुबंधसुद्धा आहे. त्यामुळं एकमेकांना सहाय्य करत हे संबंध अधिक दृढ केले पाहिजेत. दुनियेला वगळून आपल्याला जगताच येणार नाही. असा मौलिक सल्ला गझलकारांनी दिलाय. contact@sabirsolapuri.com

बातम्या आणखी आहेत...