आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

माझी शॉर्टफिल्म:भूक, आठवण आणिक तारे..!

4 महिन्यांपूर्वीलेखक: निखिल शिंदे (लेखक, दिग्दर्शक)
  • कॉपी लिंक

कथेनं झपाटलं की काहीतरी अफलातून आकाराला येतं. संकटं येतात, पण मार्गही निघतो. चित्रीकरण सुरू करायच्या आदल्या दिवसापर्यंत लोकेशनला परवानगी मिळाली नाही. त्यातच कोरोनामुळे नियमांची जंत्री.. पण, जिद्दीला पेटलेली टीम सोबतीला होती आणि तिच्या डोळ्यांपुढं फक्त एकच ध्येय होतं.. ‘कागद’ पूर्ण करण्याचं..!

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील माध्यम आणि संज्ञापन विभागाच्या अभ्यासक्रमांतर्गत तृतीय सत्रासाठी आम्हाला एक लघुपट तयार करायचा होता. मी, सिद्धांत पाटील आणि संकेत अंगरकर अशा तिघांचा हा ग्रुप प्रोजेक्ट. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आमचे प्रोजेक्ट होतील की नाही, याची शंका होती. विभागाच्या सकारात्मकतेमुळे हे शक्य झाले. पण, नियमांची बंधने खूप होती. शॉर्टफिल्म विद्यापीठ परिसरातच शूट करायची, त्यात कमीत कमी पात्रे आणि इतर टीम हवी, फिल्मचा कालावधी आठ मिनिटांच्या आत असावा, शूटिंगसाठी एकच दिवस मिळणार.. अशा सर्व नियमांच्या चौकटीत बसणारी एक कथा आम्हाला शोधायची होती. आणि अशातच आम्हाला ‘कागद’ची कहाणी गवसली...

एका अशिक्षित सफाई कामगाराच्या आयुष्यावर बेतलेली ही कहाणी. त्यातील प्रसंग माझ्या ओळखीच्या एका व्यक्तीसोबत घडला होता. मी तो सिद्धांत आणि संकेतला ऐकवला. त्यांनाही तो आवडला. या विषयावर शॉर्टफिल्म करायची ठरल्यावर कथा, पटकथा आणि संवाद मीच लिहिले. फिल्मच्या प्री-प्रॉडक्शनसाठी खूप कमी वेळ होता. त्यात बरेचसे काम पूर्ण करायचे होते. सर्वांत महत्त्वाचे होते ते लोकेशन्स. कथेच्या गरजेनुसार सगळी लोकेशन विद्यापीठात आणि तीही परवानगीसह मिळाली. पण, महत्त्वाच्या असलेल्या शाळेच्या लोकेशनला परवानगी मिळाली नाही. विद्यापीठातील शाळेचा मालकी हक्क बाहेरील एका संस्थेकडे आहे. त्या संस्थेला अर्ज करून तीन-चार दिवस झाले होते. पाच-सहा वेळा संस्थेच्या ऑफिसला चकरा मारल्या. पण, उत्तर मिळत नव्हते...

चित्रीकरण दोन दिवसांवर आले. ऐनवेळी दुसऱ्या लोकेशनची शोधाशोध सुरू झाली. पण, कथेच्या आसपास जाणारी एकही इमारत आम्हांला विद्यापीठात आढळली नाही. शेवटी नाईलाज म्हणून कोणत्या तरी एका इमारतीबाहेर चित्रीकरण करणे भाग होते. पण, अखेर एक दिवस आधी त्या शाळेत चित्रीकरणाची परवानगी मिळाली. आमच्यासाठी दुसरा महत्त्वाचा भाग होता पात्रांची निवड. कथा लिहितानाच मुख्य पात्रासाठी माझ्या डोक्यात बंडू झिंजुरके होता. बंडू आणि मी पाच वर्षांपासून सोबत नाटक करायचो. तो सध्या विद्यापीठातच ललित कला केंद्रात शिकत होता. मित्रांच्या ओळखीतून प्रवीण कांबळे आणि राज गायकवाड सारखे उत्तम कलाकार आम्हाला मिळाले. सर्वांनी कसदार अभिनय केला. अजय, कृष्णा, रोहन, अतुल, अनुज, प्रवीण, दीपक, वैभव, सूरज, महेश, शुभम, अभिषेक, श्रीकांत, गजानन, स्वाती यांचा फिल्म निर्मितीतला वाटा मोलाचा होता. प्रा. समर नखाते, डॉ. माधवी रेड्डी, प्रा. अमित सोनवणे, प्रा. सत्यजित जाधव, प्रा. पारुल शर्मा यांचे विशेष मार्गदर्शन मिळाले. 'कागद' शॉर्टफिल्मच्या निर्मितीमधील एक प्रसंग माझ्या कायम लक्षात राहील. चित्रीकरणादरम्यान सुरुवातीच्या काही प्रसंगांना खूप वेळ गेला. त्यामुळे दुपारच्या सुटीनंतर साठ टक्क्यांपेक्षा जास्त चित्रीकरण बाकी राहणार होते. लोकेशनची परवानगी तर फक्त सायंकाळी पाचपर्यंतची होती. राहिलेले चित्रीकरण पूर्ण होणे अशक्य वाटत होते. अशा परिस्थितीत आमच्या झपाटलेल्या टीमने जेवणाची सुटीही न घेता काम सुरू ठेवले आणि भूक लागली असतानाही आधी फिल्म पूर्ण केली. तसे पाहता ही एक साधी आठवण. पण, माझ्यासाठी खूप महत्त्वाची. आता ती कॉलेज कॅम्पसमधील झाडाला लगडून बसलीय. मला सौमित्र यांची कविता राहून राहून आठवते...

मला अजूनही ठावूक नाही भूक खरी की तहान माझी अजून मजला आठवते ती चटणी, भाकर आणिक आजी अजून होते ओली जीभ आठवताना आंबट बोरे तसे सोबती असती सारे भूक, आठवण आणिक तारे... ----------- पार्श्वसंगीत वापरलेच नाही…

राहुल शेलारसोबत आमच्या फिल्मच्या छायामुद्रणासंदर्भात सखोल चर्चा होत होती. कथेच्या आशयानुसार आम्ही एक कलर टोन ठरवला. त्या रंगानुसार पात्रांची वेशभूषा आणि लोकेशन निवडले. फिल्ममध्ये पूर्णपणे सेटवर रेकॉर्ड केलेला सिंक साऊंड वापरला. अन्य पार्श्वसंगीत न वापरता फक्त अॅम्बियन्स साउंड आणि अॅक्च्युअल रेकॉर्ड केलेला साउंड घेतला. ही फिल्म प्रेक्षकांना खिळवून ठेवते, त्यात या साउंडचा वाटा मोठा आहे. याचे पूर्ण श्रेय ध्वनिमुद्रणकार तुषार कढणे याला जाते. सिद्धांत पाटीलने फिल्मचे संकलन अगदी अचूक पद्धतीने केले. (संपर्कः ९८३४०४०५९३)

बातम्या आणखी आहेत...