आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Opinion
  • Divyamarathi Rasik Special Article : Dalit Writer Wants To Clean The Face Of This Country

रसिक स्पेशल:दलित लेखक या देशाचा चेहरा स्वच्छ करु इच्छितो...

एका वर्षापूर्वीलेखक: शरणकुमार लिंबाळे
  • कॉपी लिंक

वयाच्या २५ व्या वर्षी लिहलेल्या 'अक्करमाशी' या आत्मनिवेदनामुळे स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केलेल्या जेष्ठ साहित्यिक डॉ. शरणकुमार लिंबाळे यांना त्यांच्या "सनातन' या कादंबरीसाठी प्रतिष्ठित असा के. के. बिर्ला फाऊंडेशनचा "सरस्वती' पुरस्कार जाहीर झाला आहे. देशातल्या २२ भाषांमधील पुस्तकांचे अवलोकन करून दरवर्षी एका लेखकाला हा पुरस्कार दिला जातो. याआधी विजय तेंडुलकर आणि महेश एलकुंचवार यांना हा पुरस्कार मिळाला होता. पुरस्काराच्या पार्श्वभूमीवर शरणकुमार लिंबाळे यांनी व्यक्त केलेले हे मनोगत...

माझं आयुष्य हे निश्चितच सामान्य नव्हतं, मात्र तरीही लहानपणापासून मला लिखाणाची सवय होती. हायस्कुलमध्ये असताना प्रेम कविता लिहायचो... तु सुंदर, तुझे डोळे, तुझे गाल सुंदर... अशा टाईपच्या त्या कविता असायच्या. हे सगळं चित्रपट बघून यायचं. चित्रपटांचा मोठा प्रभाव होता माझ्यावर. हेमा मालिनी, वहिदा रेहमान, मीना कुमारी या माझ्या आवडत्या कलाकार... हीच माझी दुनिया होती जी वास्तविक माझी दुनियाच नव्हती! बीए शिकत असताना हे मी काय कचरा लिहितोय आणि काय कचरा पाहतोय, ज्यात माझे कष्टकरी आई-बाप नाहीत... माझे अश्रू नाहीत, आमच्या समाजाचे प्रश्न नाहीत अन् परिस्थितीही नाही असा विचार करत असताना माझ्या लक्षात आले की हजारो वर्षांपासून आमच्यावर काही लिहिलेच गेलेले नाही. जेव्हा मी डॉ. बाबासाहेब आंबेडकर वाचले तेव्हा माझ्यात एक नवीन चेतना निर्माण झाली. त्याचक्षणी मी माझ्या सर्व प्रेमकविता आणि कथा जाळून टाकल्या आणि लेखणी फक्त दलित जाणिवांसाठी सुरू केली. माझं लिहिलेलं साहित्य जेव्हा शिक्षकांना दाखवायचो तेव्हा ते म्हणायचे, अरे हे का फालतू लिहिलयं. तुला तर अिजबातच लिहिता येत नाही. तु सगळ्यात अगोदर कर्ता, कर्म आणि क्रियापदावर मेहनत घे. व्याकरण शिक... तेव्हापासून मी हे व्याकरणंच मोडीत काढलं. प्रमाणभाषेचा मी तिरस्कार करतो कारण त्यावर अभिजनांचे आणि श्रीमंतांचे वर्चस्व आहे.

मी इतिहासाचा विद्यार्थी आहे. इतिहासावर माझं नेहमीच प्रेम राहीलं आहे, पण मी माझ्या शालेय जीवनापासून ते कॉलेजपर्यंतच्या अभ्यासक्रमात जो इतिहास शिकलो त्यात मला कुठेही दलित, आदिवासी समाज दिसला नाही. मी फक्त राजे रजवाड्यांचा इतिहास वाचला. स्वातंत्र्यलढ्यातही मला कुठेच आदिवासी आणि दलित दिसले नाहीत. आमचा इतिहास हा सरळसरळ नाकारला गेलायं. या नाकारलेल्या इतिहासावर कादंबरी लिहावी अशी माझी खूप दिवसांपासूनची इच्छा होती. विशेषकरून भीमा कोरेगावचा जो गौरवशाली इतिहास आणि लढा आहे तो मला सतत आकर्षित करत होता. त्यामुळे भीमा कोरेगावच्या लढ्याला २०० वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने "सनातन' कादंबरी लिहली आणि १ जानेवारी २०१८ रोजी ती कादंबरी प्रकाशित झाली. या कादंबरीत दलित-आदिवासी समाजाने जो जगण्यासाठी संघर्ष केलायं, समाज निर्मिती आणि राष्ट्रनिर्मितीसाठी जो संघर्ष केलायं तिथपासून ते शंभूक आणि भीमा कोरेगावपर्यंत आमचे जे नायक आहेत त्यांच्या योगदानाचा शोध घेऊन मांडण्याचा प्रयत्न केलायं. मला वाटत, मी इतिहासातील नव्या नायकांचा शोध घेतला आहे, दडपून टाकलेले नायकांचे शौर्य, त्यांचे स्वाभिमान या निमित्ताने पुढे आणण्याचा प्रयत्न केलाय.

आत्तापर्यंतचा इतिहास हा वंचिताना दुय्य्म ठरवणारा, आमच्यावर अन्याय-अत्याचार करणारा होता. आमच्यातील वीर शौर्य पुरुषांची ओळख करून देण्याचे काम मी सनातन या कादंबरीच्या निमित्ताने केला आहे. भीमा कोरेगावला २०० वर्षे झाली त्याच दिवशी सनातन ही कादंबरी प्रकाशित झाली. भीमा कोरेगाव निमित्ताने ज्या दंगली झाल्या, जे वातावरण निर्माण झाले त्यामुळे या कादंबरीकडे दुर्लक्ष झाले. या कादंबरीमध्ये भीमा कोरेगाववर एक प्रकरण असून दलित आदिवासींनी या लढ्यासाठी जे योगदान दिले आहे त्याचे स्मरण मी या कादंबरीत केले आहे.

पूर्वीसारखा काळ राहीला नसला तरी एकंदरित दलित-आदिवासी समाजाबद्दल मी फार आशावादी आहे. जेव्हा आपण दलित चळवळींबद्दल बोलतो तेव्हा महाराष्ट्र किंवा आंबेडकरी समाजाला समोर ठेवून बोलतो. पण बाबासाहेब हे संपूर्ण भारताचे आहेत. आज बाबासाहेबांचा गौरव देश-विदेशातही होतोय. पूर्वीचा काळ असा नव्हता... एकेकाळी आम्ही दलित आहोत हे सांगण्याची आणि बाबासाहेबांचा गौरव करायची हिम्मत नसायची. माझ्या बालपणी मी जयभीम म्हणायचो नाही. पण सध्या परिस्थिती बदलली आहे. आता जेएनयू सारख्या ठिकाणीही जयभीमचे नारे गरजतात. बाबासाहेबांच्या प्रेरणेने सध्या देशातच नाही तर जगभरातील दलित समाज हा स्वाभिमानाने पेटला आहे. तो स्वातंत्र्य, समता आणि बंधुभावासाठी संघर्ष करत आहे.

आम्ही केवळ दलितांचे प्रश्न घेऊन दलितांसाठी लढत आहोत ही जी आमची मांडणी केली जाते ही अत्यंत चुकीची आहे. देशामध्ये असंख्य लोकांना वंचित शोषित ठेवून हा देश महान होऊ शकत नाही. जर देशाला महान व्हायचे असेल तर वंचित शोषित घटकांचा, दुबळ्या लोकांचा विचार करावाच लागेल. महात्मा गांधी म्हणायचे, 'या देशावर जातीयतेचे काळेकुट्ट ढग आहेत. ते स्वच्छ झाले पाहिजेत'. दलित लेखक या देशाचा चेहरा स्वच्छ करु इच्छितो. आम्ही जातीव्यवस्थेच्या विरोधात बोलतो लिहतो म्हणजेच आम्ही एका सुंदर राष्ट्रनिर्मितीच्या ध्येयाने बोलतो. एका सुंदर राष्ट्राच्या निर्मितीसाठी प्रत्येक दलित साहित्यिक, विचारवंत, चळवळीचा कार्यकर्ता झटतोय अशा पद्धतीने आमच्या कामाकडे पाहिले पाहिजे. सध्याच्या काळात मला कधीकधी वाटते की, चळवळीला थोडी मरगळ आली आहे पण जेव्हा मी संपूर्ण भारताकडे आणि भारतातील दलित समाजाकडे पाहतो तेव्हा दलित तरूण आणि आजची भारताची तरुण पिढी ही वेगळ्या पद्धतीने विचार करतेय आणि समतेसाठी लढू पाहते हे मला महत्त्वाचे वाटते.

ज्या महाराष्ट्राने देशाला दलित साहित्य आणि दलित चळवळ दिली त्याच महाराष्ट्रात दलित साहित्याचा खून झालायं असं खेदाने म्हणावं लागतयं. दलित शब्दाविरुद्ध फार मोठा आक्रोश होता. मधल्याकाळात दलित शब्दावर बंदी घालण्यात आली होती. त्यामुळेच दलित साहित्याची संमेलनं होत नाहीत, परिसंवाद होत नाही. लोक घाबरतात. ज्या प्रदेशात दलित साहित्याची निर्मिती झाली तिथेच ते नष्ट होत चाललं आहे. हा एका कटाचा भागही असू शकतो. 'दलित' शब्दाला जो विरोध केला गेला ते अत्यंत चुकीचे होते. 'दलित' शब्दाचा डिक्शनरीतला अर्थ घेऊन त्याला विरोध करण्यात आला. पण खरा अर्थ पाहिला तर कालपर्यंत जो दलित होता, गुलाम होता पण आज त्या गुलामी विरोधात बोलणारा स्वाभिमानी म्हणजे 'दलित' असा अर्थ आहे. हल्ली दलित हा शब्द एक अंब्रेला टर्म झाला आहे. त्यात दलित आदिवासी बहुजन समाजाचा समावेश होतो. संपुर्ण देशात हा शब्द स्वीकारला गेला. महाराष्ट्रात फक्त या शब्दाला विरोध झाला. क्रांतिकारी शब्द दडपून टाकण्याचा हा एक प्रकार आहे.

आजचे मराठी साहित्य विश्व फार गढूळ झाले आहे. साहित्यिकांचे गट पडलेले आहेत. मराठी भाषेचा सन्मान व्हावा ही माझी नेहमी भावना राहीली आहे. नवीन लेखकांना नेहमी प्रोत्साहन दिले गेले पाहिजे. माझ्या साहित्याची दखल ही जगभरात,देशभरात घेतली गेली पण महाराष्ट्रात फारशी घेतली गेली नाही याची मला खंत वाटते. कारण मराठी साहित्यावर काही ठराविक गटाची मक्तेदारी दिसून येते. मराठीत नवचैतन्य आणायचे असल्याच साहित्यात नवीन प्रयोग होण्यासाठी बळ देणे गरजेचे आहे. पूर्वीच्या काळी वेगवेगळ्या चळवळी घडायच्या त्यातून साहित्याची निर्मिती होत होती. नामांतराची चळवळ झाली नसती तर मी लेखक म्हणून घडलो नसतो. आज ग्रामीण, आदिवासी, दलित, स्त्रीवादी लेखकांना चळवळीने बळ दिले पाहिजे. जाणकार लोकांनी त्यांच्या पाठीशी उभे राहिले पाहिजे. कारण कलावंत एकाकी पडला तर तो निराश होतो आणि जर कलावंत निराश झाला तर हे समाज आणि संस्कृतीसाठी घातक असते.

दलित साहित्य हे पारंपारिक साहित्यापेक्षा खूप वेगळे आहे. मेनस्ट्रीम साहित्यात आमचं स्थान शून्य होतं. दलित साहित्य हे नाव घेऊन आम्ही लिहलं त्यामुळे आमचं एक अस्तित्व निर्माण झाले आणि एक स्वतंत्र्य प्रवाह निर्माण केला. असे प्रवाह साहित्यात निर्माण झाले पाहिजे हेच साहित्याचे जिवंतपणाचे लक्षण आहे. आज सरस्वती सन्मान मिळाल्यामुळे दलित साहित्य हे कसदार, जीवनमुल्यांसोबत,कलामुल्यांसोबत आपली वेगळी मोहोर उमटवणारे साहित्य आहे हे सिद्ध झाले.सध्याचे जातीयवादी विचार अधिक शक्तीशाली होत असताना मला वाटते की, आम्ही कलावंत, लेखक माणसं कुठतरी कमी पडतोय. पण या परिस्थितीत न घाबरता बोलणार त्यावेळीच परिवर्तन होईल. (सौजन्य - एबीपी माझा)

शरणकुमार लिंबाळे यांची साहित्यसंपदा

कवितासंग्रह - उत्पात, श्वेतपत्रिका, उद्रेक, धुडगूस कथासंग्रह - बारामाशी, हरिजन, रथयात्रा, दलित ब्राम्हण कादंबरी - भिन्नलिंगी, उपल्या, हिंदू, बगुजन, झुंड, ओ, सनातन, रामराज्य आत्मनिवेदने - अक्करमाशी, राणीमाशी, पुन्हा अक्करमाशी, संपादने - दलित प्रेमकविता, दलित पँथर - भूमिका आणि चळवळ, दलित चळवळ, दलित साहित्य, प्रज्ञासूर्य, रिपब्लिकन पक्ष - वास्तव आणि वाटचाल, विवाहबाह्य संबंध - नवीन दृष्टीकोन, गावकुसाबाहेरील कथा, ज्ञानगंगा घरोघरी, शतकातील दलित विचार, साठोत्तरी मराठी वांड्मय प्रवाह, सांस्कृतिक संघर्ष, भारतीय दलित साहित्य समीक्षा : दलित साहित्याचे सौंदर्यशास्त्र, साहित्याचे निकष बदलावे लागतील, ब्राम्हण्य, दलित आत्मकथा एक आकलन, वादंग, दलित साहित्य आणि सौंदर्य.

बातम्या आणखी आहेत...