आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रसिक स्पेशल:राजकीय तटबंदीत समाजांचे ‘गड’ !

एका वर्षापूर्वीलेखक: शेखर मगर
  • कॉपी लिंक

विशिष्ट धर्माच्या, जाती-समुदायांच्या श्रद्धास्थानांना धार्मिकतेसोबतच सांस्कृतिक आणि सामाजिक अधिष्ठान असते. अशी ठिकाणे समाजाची भावनिक, मानसिक, शैक्षणिक जडणघडणही करीत असतात. या स्थानांच्या अलिप्ततेमध्येच त्यांचे पावित्र्य आणि संबंधित समाजाच्या तळागाळातील माणसाचा उत्कर्ष दडलेला असतो. हे उद्देश साध्य व्हायचे असतील, तर अशा समाजांच्या गडाभोवती उभी राहिलेली मतपेढीच्या राजकारणाची तटबंदी नष्ट व्हायला हवी.

‘सत्ता मिळवण्यासाठी कधीही धर्माला साधन केले जाऊ नये. कारण धर्म हा मुख्यत: नीतिमूल्ये सांगण्यासाठी असतो. धर्माचा वापर सत्तेसाठी केला जातो तेव्हा त्याचे अध:पतन होतेच; शिवाय आपणही खऱ्या राजकीय जबाबदाऱ्यांपासून दूर लोटले जातो.’

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे हे विधान धर्म आणि राजकारण यामध्ये संविधानकर्त्यांना अपेक्षित असलेला फरक अधोरेखित करते. सामान्य माणसाला केंद्रस्थानी ठेऊन सत्तेत येण्याचा प्रयत्न केला तर प्रजासत्ताक भारत नक्की निर्माण होईल, असा बाबासाहेबांचे विचार होता. स्वातंत्र्योत्तर काळात मात्र ईश्वर, धर्म, समाज, पंथ, संप्रदाय आणि जातवर्चस्व हे सत्तेत येण्यासाठीचे राजमार्ग बनले. किंबहुना, राजकीय नेत्यांनी सामान्यांच्या प्रश्नांना बगल देऊन धर्म- समाज- जातींचा वापर करण्यास सुरूवात केली.

आता तर साधुंचे मठ, महंतांचे वास्तव्य असलेल्या गडांचाही राजकारणासाठी वापर होत आहे. वंजारी आणि बंजारा समाजांचे श्रद्धास्थान असलेले अनुक्रमे ‘भगवानगड’ आणि ‘पोहरागड’ हे अलीकडे याच कारणाने चर्चेत आहेत. पूर्वी फक्त सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक अधिष्ठान म्हणून या गडांकडे पाहिले जात होते. पण, आता ही ओळख धूसर होत असल्याचे दिसते. समाजातील नेता, त्याचे अनुयायी आणि अनुयायांचे श्रद्धास्थान असलेल्या गडांभोवती आता राजकीय तटबंदी तयार झाली आहे. आपली प्रगती आणि एकूणच सामाजिक स्थान उंचावण्याची आस लागलेले वंजारी आणि बंजारा हे दोन समाज राजकारणाच्या मार्गाने त्यावरील उपाय शोधत आहेत. त्यासाठी गेल्या काही वर्षात हे गड माध्यम ठरले. भाजपचे नेते गोपीनाथ मुंडे यांनी सुमारे दोन दशके वंजारी बांधवांना भगवानगडावर संघटित करुन त्यांच्या अशाच जाणिवा, आशा- आकांक्षांना नवी दिशा दिली. नुकताच मंत्रिपदाचा राजीनामा दिलेले शिवसेनेचे संजय राठोड यांनीही वाशिम जिल्ह्यातील ‘पोहरागड’ला समाजबांधवांच्या आकांक्षांचे केंद्र बनवले. स्वाभाविकच या गडांशी राजकारणही जोडले गेले. तथापि, या दोन्ही गडांचे धार्मिक, सामाजिक महत्त्वही तितकेच उल्लेखनीय आहे.

गोपीनाथ मुंडे यांचे ३ जून २०१४ ला दिल्लीत अपघाती निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार झालेल्या ठिकाणी आता भव्य स्मारक उभाण्यात आले आहे. पंकजा मुंडे यांनी त्याला ‘गोपीनाथगड’ असे नाव दिले. त्यामुळे भगवानगडाचे महंत आणि पंकजा यांच्यात वादाची ठिणगी पडली. त्यानंतर महंतांनी, ‘गडावरून आता कुणीही राजकीय भाषण करणार नाही’ असा पवित्रा घेतला. ‘भगवानगडाचा राजकीय स्वार्थासाठी वापर होऊ देणार नाही. राजकारणासाठी गोपीनाथगड आणि श्रद्धेसाठी भगवानगड..!’ अशी घोषणाच त्यांनी २०१५ मध्ये केली. दुसरीकडे, यावर्षीच्या २८ फेब्रुवारीला संजय राठोड यांनी वनमंत्रिपदाचा राजीनामा देण्याआधी ‘पोहरागडा’वर हजारोंची गर्दी जमवली. पोहरादेवी, सेवालाल महाराज, रामराव महाराजांचे समाधिस्थळ आणि नुकतेच गादीवर बसलेले महंत बाबूसिंग महाराज यांचे त्यांनी दर्शन घेतले. त्यांच्या या कृतीने बंजारा समाजाचा हा गडही अचानक चर्चेत आला.

ज्ञानदानाचे केंद्र ठरलेला भगवानगड ः
ज्यांच्या नावाने भगवानगड ओळखला जातो, त्या भगवानबाबांचे मूळनाव आबा तुबाजी सानप असे आहे. त्यांचा जन्म १८९६ च्या ऑगस्टमध्ये बीड जिल्ह्याच्या पाटोदा तालुक्यातील घाट सावरगाव येथे झाला. वारकरी संप्रदायातील आबांना बालपणीच अध्यात्माची गोडी लागली. नारायणगडाचे महंत माणिकबाबा होते. त्यांचे उत्तराधिकारी बंकटस्वामी महाराज होते. बंकटस्वामींचे शिष्यत्व आबांनी स्वीकारले. वयाच्या ११-१२ व्या वर्षापासून ते ४० व्या वर्षापर्यंत त्यांचा मुक्काम नारायणगडावर होता. नारायणगडाचे तत्कालीन महंंत नगद नारायण महाराज यांच्यानंतर आबा तथा भगवानबाबांची महंंतपदी वर्णी लागणे अपेक्षित होते. पण, तसे झाले नाही. त्यानंतर १९५१ दरम्यान ते जवळच असलेल्या खरवंडीच्या डोंगरावर आले. धौम्य ऋषींच्या नावाने हा डोंगर ओळखला जात होता. धौम्यगड अशीही त्याची ओळख होती. १९५१ ते ५८ दरम्यान भगवानबाबांनी २२ एकरांच्या या डोंगरावर मंदिरे उभारली. विठ्ठल मूर्तीच्या प्रतिष्ठापनेसाठी १ मे १९५८ ला यशवंतराव चव्हाण यांना निमंत्रित केले. तत्कालीन मंत्री बाळासाहेब भारदे यांनी चव्हाणांना येथे आणले. या गडावर यशवंतरावांच्या रूपाने पहिल्यांदाच राजकीय नेत्याचे पाऊल पडले. त्यांनी येथे निवासी शाळेची पायाभरणी केली. त्यांनी आपल्या भाषणातून या गडाला ‘भगवानगड’ असे नाव दिले. त्यानंतर तेथे अनेक वर्षे ज्ञानदानाचे कार्य सुरू राहिले. १९५१ ते ६५ पर्यंंत भगवानबाबा महंत होते. पुढे राजपूत समाजाचे भीमसिंग महाराज यांनी १९६५ ते २००३ पर्यंत गादी सांभाळली. भगवानबाबांच्या जन्मशताब्दीनिमित्त (१९९६) घाट सावरगाव येथे काल्याचे कीर्तन आयोजित केले होते. तत्कालीन उपमुख्यमंत्री गोपीनाथ मुंडे यांनी नामदेवशास्रींना भीमसिंग महाराजांच्या उत्तराधिकाऱ्याच्या रूपात सादर केले. त्यांनी दिलेला प्रस्ताव भीमसिंगांनी स्वीकारला. पुढे भीमसिंग महाराजांच्या निधनानंतर ३ नोव्हेंबर २००३ ला नामदेवशास्री महंतपदी विराजमान झाले.

समाजशक्तीचा लाभ अन् विकासही...
२००३ ते १४ पर्यंत ११ वर्षे नामदेवशास्त्रींनी गोपीनाथ मुंडे यांना वेळोवेळी भगवानगडावर आमंत्रित केले. मुंडेंना गडावर येणाऱ्या समाजशक्तीचा लाभ झाला आणि त्यांनीही गडाच्या विकासाला मोठा हातभार लावला. मुंडे यांच्या निधनानंतर काही काळाने पंकजा मुंडे यांच्याशी झालेल्या विवादातून नामदेवशास्त्रींनी गडाचा राजकीय वापर थांबवला. त्यामुळे पंकजा यांचे नुकसान आणि धनंजय मुंडे यांना फायदा झाल्याची चर्चा होत राहिली.
वास्तविक, पंकजा आणि धनंजय यांनाही या श्रद्धास्थानावर राजकीय हेतूने पाऊल टाकण्यास मनाई करण्यात आल्याचे सांगितले जाते. भगवानगडाला २०२६ दरम्यान ७५ वर्ष पूर्ण होत आहेत. या अमृत महोत्सवानिमित्त भव्य सोहळा होणार आहे. त्यावेळी देशातील सर्व प्रमुख राजकीय नेते, मंत्र्यांना गडावर आमंत्रित केले जाईल. त्यावेळी स्वाभाविकच राजकीय भाषणे होतील आणि हा एकमेव अपवाद असेल, असे स्पष्ट करण्यात येत आहे. महंंत डॉ. नामदेवशास्रींनी या सोहळ्यासाठी आत्तापासूनच तयारी सुरू केली आहे.

राजकारणाला प्रतिबंध की छुपी मदत ?
गोपीनाथ मुंडे यांच्या निधनानंतर २०१४ - १५ दरम्यान पंकजा यांनाही तिथे त्यांच्याइतकाच मान होता. पण, पुढे नामदेवशास्रींनी गडावरुन एकही राजकीय भाषण होणार नसल्याची भूमिका घेतली. त्याचा पंकजा यांना २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत फटका बसल्याचे जाणकार सांगतात. पंकजांचा पराभव होऊन धनंंजय मुंडेंना मोठे मताधिक्य मिळाले. पंकजांचे गडावरील राजकारण थांबवून महंतांनी छुुप्या पद्धतीने धनंजय यांना पाठिंबा दिल्याचे बोलले जाऊ लागले.

निसर्गाच्या कुशीत वसलेला पोहरागड ः
देशात सर्वत्र आढळणारे समाज खूप कमी आहेत. पण, बंजारा समाज देशातील प्रमुख राज्यांमध्ये आहे. काही राज्यांत तुरळक प्रमाणात का होईना तो आहे. वाशीम जिल्ह्यातील पोहरागड हे बंजारा समाजाचे श्रद्धास्थान आहे. संत सेवालाल महाराजांनी १७६१ दरम्यान त्याची स्थापना केली. म्हैसूर प्रांतातील सुरगोंडण कोप्पा (ता. कुन्नळी, जिल्हा शिमोगा) येथे सेवालाल महाराजांचा जन्म झाला. त्यांना १७३९ दरम्यान वडील भीमानायक यांनी घोंगडी आणि काठी हाती देत दीक्षा दिली. ३ हजार ७५५ इतक्या पशुधनाच्या आधारे सेवालाल महाराजांनी त्या काळी मालवाहतुकीचा व्यवसाय केला. कर्नाटकसह महाराष्ट्र, हैदराबाद, निजामाबाद, मध्य प्रदेशात त्यांनी भ्रमंती केली. महाराष्ट्रात पुणे, नागपूर, नाशिक, कळमनुरी आदी ठिकाणी त्यांचे वास्तव्य होते. सुमारे २२ वर्षांनी त्यांचे पोहरादेवी गावात आगमन झाले. तेथे त्यांनी पोहरादेवी मंदिराची प्रतिष्ठापना केली. गावाजवळच्या रुहीगड येथे सेवालाल महाराजांचे देहावसान झाले. पोहरगडला त्यांचे समाधिस्थळ आहे. त्यांचे वंशज डॉ. रामलाल महाराजांनी अखेरपर्यंत फक्त दूध आणि फळे हाच आहार घेतला. ३० ऑक्टोबर २०२० ला मुंबईत त्यांचे निधन झाले. बाबूसिंग महाराज हे त्यांचे उत्तराधिकारी आहेत. बंजारा समाज आणि देवीच्या स्थानांचे अतूट ऋणानुबंध आहेत. कुलस्वामिनी जगदंबा, तुळजामाता, मतराल माता, हिंगळज माता, कालिंका माता, रेणुका माता, चामुंडी माता, सरसीरमरम्मा आदी मातांची बंजारा समाज भक्ती करतो. महाशिवरात्री ते रामनवमी दरम्यान ४१ दिवस उपवास करून देवींची आराधना केली जाते. रामनवमीला गडावरील यात्रेसाठी बंजारा बांधव पायी येतात.

विकासाच्या बाबतीत आजही दुर्लक्षित ः
डॉ. रामराव महाराजांच्या सोबत राहिलेले शेखर महाराज यांनीही, आपणच त्यांचे खरे उत्तराधिकारी आहोत म्हणून तप सुरू केले आहे. रामराव महाराजांसोबत त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली होती. देशभर वेगवेगळ्या वर्गवारीत असलेल्या या समाजाचा समावेश आरक्षणासाठी अनुसूचित जमातीत करावा, अशी मागणी त्यांनी केली होती. भगवानगडाच्या तुलनेत पोहरागडावर पायाभूत सुविधांचा प्रचंड अभाव आहे. चारी बाजूंनी डोंगर, सागवानाचे घनदाट जंगल अशा निसर्गाच्या कुशीत पोहरागड असला, तरी विकासाच्या बाबतीत मागे राहिला आहे. पोहरादेवी मंदिराच्या जीर्णोद्धाराचे काम रामराव महाराजांच्या निधनामुळे अपूर्ण आहे.
वास्तविक विशिष्ट धर्माच्या, जाती-समुदायांच्या श्रद्धास्थानांना धार्मिकतेसोबतच सांस्कृतिक आणि सामाजिक अधिष्ठान असते. अशी ठिकाणे समाजाची भावनिक, मानसिक, शैक्षणिक जडणघडणही करीत असतात. या स्थानांच्या अलिप्ततेमध्येच त्यांचे पावित्र्य आणि संबंधित समाजाच्या तळागाळातील माणसाचा उत्कर्ष दडलेला असतो. हे उद्देश साध्य व्हायचे असतील, तर अशा समाजांच्या गडाभोवती उभी राहिलेली मतपेढीच्या राजकारणाची तटबंदी नष्ट व्हायला हवी.

नाईकांनी राजकीय वापर टाळला ः
पोहरादेवीचे मंदिर आणि संत सेवालाल महाराजांचे समाधिस्थळ यामुळे बंजारा समाजासाठी या स्थानाला काशीइतकेच महत्त्व आहे. त्यामुळे देशभरातून या ठिकाणी समाज मोठ्या संख्येने येतो. १९६३ ते ७५ दरम्यान मुख्यमंत्री राहिलेल्या वसंतराव नाईक यांनी पोहरागड येथे कधीही राजकीय सभा घेतली नाही. १९९१ ते ९३ दरम्यान सुधाकरराव नाईक मुख्यमंत्री होते. त्यांनीही या गडाला राजकारणाचे केंद्र होऊ दिले नाही. समाधिस्थळाच्या दर्शनासाठीच त्यांनी तेथे भेट दिली. अलीकडच्या काळात मात्र पोहरागडाभोवती राजकारण केंद्रित झाले असल्याचे बंजारा चळवळीचे अभ्यासक सांगतात.

बातम्या आणखी आहेत...