आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गझलेच्या गावात:गझलेतील भरारी

एका वर्षापूर्वीलेखक: बदीऊज्जमा बिराजदार (साबिर सोलापुरी)
  • कॉपी लिंक

भरारी अन् उभारी ही मानवी विकासाच्या मार्गातील उन्नतावस्था असते. कल्पनेची भरारी घेण्यात गझलकार निष्णात असतात. जे जगाला जाणवत नाही, दिसत नाही ते त्यांना बरोबर दिसत असतं. भरारीच्या संबंधानं गझलकाराचं आकलन, त्यांनी त्याच्या शेरामधून नोंदवलेलं निरीक्षण इथं घेताहोत.

अनेक प्रकारची असते भरारी... शब्दांची भरारी... कल्पनेची भरारी... प्रयत्नांची भरारी... स्वप्नांची भरारी... आशेची भरारी... उषेची भरारी... यशाची भरारी... भरारीला मुळी नसते सीमा... भरारीच करते फत्ते कैक मोहिमा... भरारी अन् उभारी ही मानवी विकासाच्या मार्गातील उन्नतावस्था असते. झेप, उड्डाण ही त्याचीच रूपं आहेत. प्रयत्न अन् कर्म हे जीवनाचे पंख आहेत. यामुळेच मनुष्य समृद्धीच्या आकाशात सहजतेनं उडू शकतो. क्षेत्र कोणतंही असो उंची गाठण्यासाठी झेप घ्यावीच लागते. उंची गाठणं म्हणजेच शिखरावर पोहोचणं असतं. आपण भरारी घेण्याच्या पवित्र्यात असू तर जगही आपल्याला उडताना पाहू शकतं. निरंतर भरारी घेणाऱ्या पक्ष्यांना आकाशही वंदन करते. एका जागी स्वस्थ बसून उडता नाही येत. त्यासाठी हातपाय हलवावे लागतात. कसोशीनं प्रयत्न करावे लागतात. भरारी घेताना पडण्याची भीती बाळगण्याचं कारण नाही. जो पडतो तो पुन्हा उठतो. यालाच तर उभारी म्हणतात. भरारी घेताना इच्छाशक्ती क्षीण होऊ द्यायची नसते. आपण उडू शकतो की नाही अशी शंका जेव्हा मनात उत्पन्न होते त्याक्षणी उडण्याची क्षमता विलयाला जाते. ज्याचा प्रयत्नांच्या पंखावर ठाम विश्वास असतो. त्याला गगनही ठेंगणं वाटू लागतं. ध्येयाशी एकनिष्ठता साधता आली की, भरारी घेण्याची जिद्द आपोआप निर्माण होते. जगानं आपल्याला कायमस्वरूपी स्मरणात ठेवावं, असं वाटत असेल तर भरारी घेणं अगत्याचं ठरतं. कल्पनेची भरारी घेण्यात गझलकार निष्णात असतात. जे जगाला जाणवत नाही, दिसत नाही ते त्यांना बरोबर दिसत असतं. भरारीच्या संबंधानं गझलकाराचं आकलन, त्यांनी त्याच्या शेरामधून नोंदवलेलं निरीक्षण इथं घेताहोत.

गिधाडांना उंच उडण्यासाठी माणसाचे पंख घेण्याचा मोह व्हावा म्हणजे मुळात तो माणूस भरारी घेण्यात किती निष्णात असला पाहिजे हेच यावरून दिसून येते. अशा माणसाच्या मनात उंच झेपावण्यासाठी असीम जिद्द असते. गिधाडांनी जरी त्याचे पंख घेतलेले असले तरी तो पंखाविनाही भरारी घेऊ शकतो. इतकी त्याची प्रबळ इच्छाशक्ती असते. गिधाडांनी माझे पंख घेतले आता मी कशी भरारी घेऊ, असा प्रश्न त्याला चुकूनही नाही पडत. ज्याला आत्म्याची शक्ती तारतम्यानं जाणून घेता येते त्याला हारवणं कुणालाही सहजतेनं शक्य नाही होत. अशा माणसाला पंखाविनाही आकाशाला स्पर्श करण्याची कला अवगत असते. सुरेश भट यांचा शेर याहून निराळा नाही पंख माझे लावती आता गिधाडे ही सुरू पंखाविना माझी भरारी

गरुड हा सर्वाधिक उंच उडणारा पक्षी आहे. मजबूत पंखाचं त्याला वरदान लाभलंय. गरुड कधीच स्वतःसाठी घरटं नाही बांधत. आकाश हेच त्याचं घरटं असतं. आपल्या पंखभूत सामर्थ्यावर गरुडाचा विलक्षण विश्वास असतो. म्हणून तर त्याच्या उड्डाणाला गरुडझेप असं म्हणतात. पंखात आभाळ सामावून घेणारा गरुडच जेव्हा भरारी विसरून जातो तेव्हा खरी पंचाईत होते. याचं गझलकारालाही आश्चर्य वाटतं. माणसचंही अनेक वेळा असंच होत असतं. अंगात काठोकाठ कार्यक्षमता असूनही माणूस त्याचा सदुपयोग न करता ती अक्षरशः वाया घालवतो. ही सर्वार्थानं मोठी हानी असते. अंतरंगातल्या अफाट ऊर्जेची ज्याला ओळख पटत नाही अशा माणसाची 'असून अडचण नसून खोळंबा' अशीच अवस्था होऊन जाते. आबिद मुनशी थेट गरुडालाच प्रश्न विचारतात.

खोल अपुले पंख बळकट तू गरूडा विसरूनी गेला कशी रे तू भरारी?

पाखरांच्या निळ्या नभातल्या भरारीची मोजदाद माणसाला नाही करता येतं. याचा सगळा हिशेब अंबराकडं नोंदवलेला असतो. प्रत्येक पाखराची भरारी किती झोकदार, किती दमदार, किती खरी किती खोटी हे सगळं अंबर बारकाईने पाहात असतो. माणसाचाही कस लागतो तो यशाची किती उंची गाठतो यावरूनच. म्हणून पायथ्याशी पडून राहण्यापेक्षा माणसाची नजर आभाळाकडं असली पाहिजे. आभाळाचा वेध घेता आला की, यशाची मालिका पायाशी लोळण घेते. माणसाची प्रगती घरट्यात कण्हत-कण्हत बसण्यात नाही तर आकाशात नवं घर शोधून काढण्यात असते. हे आपण अंबराच्या रुजवातीनं पाखराकडून शिकलं पाहिजे. व्यंकट देशमुख म्हणतात

पाखरांची भरारी किती अंबराला विचारा किती?

यश हे एकट्याचं कधीच नसतं. त्याच्या यशात अनेकाचं योगदान असतं. कित्येकांचं श्रेय असतं. हे यशाच्या शिखरावर पोचलेल्या माणसानं कधीही विसरता कामा नये. आपल्या हितचिंतकांचा सल्लाही बहुतांशी फलद्रूपच ठरत असतो. तेव्हा भरारी घेण्यापूर्वी हितचिंतकांशी सल्लामसलत करणं लाखमोलाचं असतं. यशासाठी प्रयत्न तर सगळेजणच करत असतात परंतु सगळ्यांनाच यशाचं आकाश कवेत नाही घेता येतं. यासाठी भरभक्कम पूर्वतयारीची प्रमुख अट वाटते. नाही म्हटलं तरी एकट्याच्या यशाला मर्यादा येतातच. यशाचं आकाश अधिक समृद्ध करायचं असेल तर हितचिंतकांना टाळून नाही चालत. असा सल्ला मधुसूदन नानिवडेकर देतात.

ही तुझी नाही भरारी एकट्याची घेत जा सल्ला जरा हितचिंतकाचा

आपण एखाद्या मोहिमेवर जाण्याची मनापासून तयारी करत असतो. त्यात आपण यशस्वी कसं होऊ याचं सगळे आडाखेही बांधून झालेले असतात. आपण अगदी सज्ज असतो. भरारी घेण्याच्या तयारीत असतो. ध्यानीमनी नसताना ऐनवेळी मात्र वादळ येतं. अन् सारी योजनाच विस्कटून जाते. आशा-आकांक्षांचा चुराडा होतो. मनाला खूप यातना होतात. उमेद गळून पडते. भरारी घेण्याचं स्वप्नं भंग पावतं. आपण फक्त जे घडतं ते सारं पाहाण्यापुरते उरतो. अनाहुतपणे घडणाऱ्या गोष्टी आपल्या आवाक्यात नसतात. भरारी जिथल्या तिथं थांबली की आपल्यात गोठलेपणा येतो. मन पावलांची साथ करायला राजी नसतं. पंख छाटलं गेल्याचं हे अतीव दुःख असतं. धावपळ, वादळ, प्रकोप, प्रलय विनाशाकडं घेऊन जाणारे असतात. ही खंत कवीला स्वस्थ बसू नाही देत. लक्ष्मण जेवणे म्हणतात.

मी भरारी घ्यावयाला सज्ज अन् वादळाने पंख माझे छाटले

जसं माणसासाठी चालणं अपरिहार्य ठरतं. तसं पाखरांसाठी उडणं आत्यंतिक गरजेचं असतं. पाखरं आपल्या उड्डाणानं आकाश व्यापतात म्हणून माणसांनी गगन झेप घेऊ नये असं नाही. माणूस आपल्या बुद्धीकौशल्यावर काय नाही करू शकत? त्यांनं उडण्याचा पक्का इरादा केला तर तोही भरारू शकतो. पाखरंही अचंबित होऊन जावीत अशी तो आकाशव्यापी झेप घेऊ शकतो. किंबहुना भरारी घेण्याच्या बाबतीत तो पाखरांचाही पराभव करू शकतो. माणसात इतकी क्षमता भरलेली असते. परंतु दुर्दैवानं माणूस कोणतंही काम पूर्ण क्षमतेने नाही करत. माणसाचा अभ्युदय त्याच्या मनगटात असतो. तो आपल्या इच्छाशक्तीचा वापर किती ताकदीनं, आत्मविश्वासानं करतो यावर पुढच्या सगळ्या गोष्टी अवलंबून असतात. माणसाच्या कर्तबगारीसमोर सर्वकाही फिकं अन् थिटं वाटतं. मैदान असो की आकाश त्यानं मनाचा हिय्या करून उतरण्याची, उघडण्याची आवश्यकता असते. अखेर विजय त्याचाच ठरलेला असतो. माणसानं आपले बाहू पसरून पूर्णत्वाला कवटाळावं अशीच त्याच्याकडून अपेक्षा असते. हे एकदा त्यानं ध्यानात ठेवलं की, समोरची सारी धुसरता नष्ट होत जाते. अभिषेक उदावंत यांचा शेर माणसाला हीच प्रेरणा देतो.

पाखरांची शेवटी रे हार झाली माणसांनी घेतली जेव्हा भरारी

परिस्थितीच्या पिंजऱ्यात सदैव बंदिस्त राहणं म्हणजे आपल्या स्वातंत्र्यावर स्वतः टाच आणण्यासारखंच आहे. भरारीत मुक्तता असते. मुक्त झाल्याशिवाय मुक्ताविष्कार करता नाही येत. तेव्हा पाखरानांही हेवा वाटावा एवढी स्वप्नांची उत्तुंग भरारी माणसाला घेता आली पाहिजे. ज्याच्यात भरारी घेण्याची धमक असते त्याचं जीवन सहज सुंदर होऊन जातं. गझलकारांनीही भरारीच्या बाजूनंच आपला कौल दिलाय.

contact@sabirsolapuri.com

बातम्या आणखी आहेत...