आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ग्रंथार्थ:तणस झालेल्या वर्तमानाचे कथन

एका वर्षापूर्वीलेखक: केदार काळवणे
  • कॉपी लिंक

नवभांडवली व्यवस्थेने येथील सर्वहारा वर्गाचा जीवनरस शोषून घेत त्याला कसे कुपोषित केले, त्याच्या जगण्याचा कसा कचरा केला या वास्तवाचे अधोरेखन महेंद्र कदम यांची 'तणस' ही कादंबरी करते.माणसासोबतच त्याच्या मंगलमय जगण्यासाठी अस्तित्त्वात आलेल्या सामाजिक व्यवस्थांचेही ‘तणस’झाल्याची जाणीव ही कादंबरी ठळक करते.

महेंद्र कदम हे मराठी साहित्यात समीक्षक,भाषा अभ्यासक आणि कवी-कथा-कादंबरीकार म्हणून सर्वपरिचित आहेत. त्यांच्या समीक्षेला सामाजिक-सांस्कृतिक परिप्रेक्ष्याची विचारचौकट आहे. लोकसाहित्य, बोलीशास्र आणि शैलीवैज्ञानिक दृष्टीकोनातून त्यांनी केलेले साहित्यवाचनही महत्वपूर्ण ठरलेले आहे. कृषिकेंद्रीत समाजजीवन आणि संस्कृती हे त्यांच्या सर्जनशील साहित्य निर्मितीचे आशयकेंद्र आहे. ग्रामीण संवेदनशीलतेतून त्यांनी लिहिलेल्या कविता-कथा-कादंबरीने मराठी साहित्य वर्तूळात आपली स्वतंत्र नाममुद्रा उमटवलेली आहे.कादंबरी लेखनाची भूमिका विशद करताना ते म्हणतात, “कादंबरी लेखन हे सांस्कृतिक हस्तक्षेपाचे महत्त्वाचे हत्यार आहे. त्या-त्या काळाचा सामाजिक-सांस्कृतिक इतिहास अधोरेखित करणारा हा वाड्मयप्रकार आहे. कादंबरीतून वंचित -शोषितांचा इतिहास प्रकट होत असतो.”या भूमिकेला सुसंगत असाच आशय त्यांच्या कादंबऱ्यांमधून प्रकटलेला आहे.‘धूळपावलं’ही त्यांची पहिली कादंबरी.वर्तमान गाव आणि त्यातील राजकारण-जातकारणाने विदीर्ण झालेला,भयभित झालेला सर्वसामान्य माणूस या कादंबरीच्या केंद्रस्थानी आहे.बदलत्या वर्तमानात तगून राहणाऱ्या धनू शेळकेची गोष्ट यातून साक्षात होते.’आगळ’ही त्यांची दुसरी बहुचर्चित कादंबरी.या कादंबरीनेच त्यांना कादंबरीकार म्हणून ओळख प्राप्त करून दिली.‘आगळ’मधून त्यांनी समकालीन समाजवास्तवाचा लेखाजोखा मांडलेला आहे.सोलापूर आणि परिसराचा भाषिक प्रदेश कवेत घेत ही प्रयोगशील कादंबरी साकारली आहे.मकरंद सराटे या पात्राचे अनुभवविश्व प्रकट करत अकारलेली ही कादंबरी वर्तमान माणसांसमोरील पेच आणि ग्रामीण-अर्धनागरी जगाच्या पडझडीची गोष्ट मुखरित करते.त्यांची ‘तणस’ही तिसरी कादंबरी अलिकडेच प्रसिध्द झालेली आहे. आशय-आविष्काराच्या अनेक शक्यता या कादंबरीने आजमावलेल्या आहेत.

जागतिकीकरणानंतर जगासह भारतीय समूहात अनेकविध बदल झाले.या बदलाच्या मुळाशी अर्थकारण दडलेले होते.या अर्थकारणाने भौतिकतेचा सोस वाढवला.नैतिक मूल्यव्यवस्थेचा ऱ्हास केला.गरीब अधिक गरीब आणि श्रीमंत आधिकाधिक गबर होत गेले.माणसापेक्षा बेगडी भौतिकतेला महत्त्व प्राप्त झाले.या बदलत्या भारतात सर्वसामान्य माणसाच्या जगण्याचे तणस झाले.हाच आशय घेऊन बदलत्या वर्तमानातील सामाजिक,सांस्कृतिक,राजकीय, शैक्षणिक,कौटुंबिक,पर्यावरणिक पडझडीचा आलेखपट ही कादंबरी मांडते.अस्तित्त्वहीन-परात्म-विखंडीत जगाचा नकाशा उभा करते.देव-धर्म-जात-लिंग-प्रदेश-प्रेम-व्देष यांच्या अस्तित्त्वाचा शोध घेत मानवी वर्तनाच्या वर्तमानाचा अर्थ लावू पाहते.गाव आणि शहराच्या मधोमध उभा असलेला संघर्ष उजागर करते.शहराचे गावात घुसणे,वंचितांची आभावग्रस्तता वाढत जाणे आणि वाढलेले बकालपण,माणसाच्या हव्यासी वृत्ती-प्रवृत्ती,पारंपरिकता आणि नवतेचा झगडा,बेकारीने काळवंडून टाकलेले चेहराविहीन जगणे,मूल्यांचा पराकोटीचा संघर्ष,व्यवस्थेत माणसाचे मूल्य कमी झाल्याची जाणीव अशा अनेकविध आशयसूत्रांना कवेत घेत ही कादंबरी साकारते.व्यवस्थेशी टकरा घेत,धडका देत जगत सर्वसामान्यांमधे नवा आशावाद जागवणारा स्वरही या कादंबरीतून उमटतो;परंतु या माणसांचे पिचलेपणाच या कादंबरीतून अधिक ठळक होते.सुष्ट-दुष्ट माणसांमधील ताण्याबाण्याला मुखरित करणारी ही कादंबरी वर्तमानाने भोवंडून टाकणारे वास्तव रेखाटते.हा काळ अनेक संभ्रमांचा आहे.या संभ्रमवादी काळातील जगण्याचा विविध कोनातून तळशोध महेंद्र कदम यांनी घेतला आहे.काळ आणि अवकाशाच्या व्यापक पटाला कवेत घेत समकालाचे अनेकमुखी पेच ही कादंबरी साक्षात करते.

जागतिकीकरणानंतरच्या काळात एकूणच माणूस आणि समूहाचे कसे ’तणस’झालेले आहे,हे या कादंबरीतून सूचित होते.या कादंबरीचे शीर्षकच मोठे अर्थसूचक आहे.या शीर्षकाने कादंबरीतील आशयाला नेमकेपणाने प्रेक्षेपित केले आहे. ‘तणस’या शब्दाचे दोन अर्थ आहेत.एक धान्य काढल्यानंतर राहिलेला ‘भूसा’;तर दुसरा अर्थ शेतात उगवलेले ’तण’ असा आहे.‘भुसा’हा शब्द `कचरा’या शब्दाला असणाऱ्या अर्थाचे सूचन करतो.‘तण’हे शेतातील पीकांचा जीवनरस शोषून घेत त्याला कुपोषित करत असते. नवभांडवली व्यवस्थेने येथील सर्वहारा वर्गाचा जीवनरस शोषून घेत त्याला कसे कुपोषित केले, त्याच्या जगण्याचा कसा कचरा केला या वास्तवाचे अधोरेखन ही कादंबरी करते.माणसासोबतच त्याच्या मंगलमय जगण्यासाठी अस्तित्त्वात आलेल्या सामाजिक व्यवस्थांचेही ‘तणस’झाल्याची जाणीव ही कादंबरी ठळक करते.माणसासाठी उभी राहिलेली समग्र व्यवस्थाच कशी दुबळी झाली आणि या व्यवस्थेने त्याची कशी घुसमट केली या अस्वस्थ भवतालाला ही कादंबरी मुखरीत करते.शाश्वत जगण्याची फरपट आणि जीवन उन्नत करणाऱ्या मूल्यसंचिताचा ऱ्हास याचा विविध कोनातून शोध ही कादंबरी घेते.माणूस म्हणून असणाऱ्या अस्तित्त्वाचे झालेले तणस आणि भांडवलीकरणाने वाढवलेले निरोपयोगी तण या दोहोंच्या संघर्षातून आकारलेल्या भवतालाची बखर म्हणून या कादंबरीचे महत्त्व लक्षात घ्यावे लागते.हा काळ कसा घडत-बिघडत गेला याचा आलेखपट या कादंबरीतून उभा राहतो.

कादंबरी हा विस्तृत सामाजिक-भाषिक अवकाशाला कवेत घेणारा वाड्मयप्रकार आहे.सांस्कृतिक जीवनाशयाचा अन्वयार्थ लावणारा दस्तावेज आहे.याचे चांगले भान महेंद्र कदम यांना असल्याचे तणसमधून अधोरेखित होते.आपल्या समकाळाला शब्द देताना त्यांनी वर्तमानातील विविध समाजस्तर,त्यातील व्यामिश्रता आणि त्याच्या तळाशी असणाऱ्या कारणांची मीमांसा करत वास्तवाधारित कलात्मक जग साकार केले आहे.सामाजिक-सांस्कृतिक विश्वाचा वाचकांना गरगरून-गोठून टाकणारा नकाशाच या कादंबरीतून महेंद्र कदम यांनी साकारलेला आहे.पर्यावरणाचा विनाश, माणसांची स्वार्धंता,ड्रायव्हर लाईनचे विश्व आणि बांधकाम व्यवसायातील भ्रष्टाचाराचे चित्रण यातून येते.

परंपरागत दलित-सवर्ण जातसंघर्ष,गरीब-श्रीमंत वर्गीय ताणतणावाचेही चित्र यातून साकारते.समाजात वाढलेले कुरूप राजकारण,पतसंस्थांच्या माध्यमातून केली जाणारी लूट,शैक्षणिक संस्थांचे होणारे अध:पतन आणि त्यातून आलेल्या व्यापारीवृत्तीचे संवेदन ही कादंबरी अधोरेखित करते.सरंजामी मानसिकता,कुटूंब-समूहाची विस्कटलेली वीण,ग्रामीण-अर्धनागरी जगाचा होणारा कोंडमारा याचा वेध ही कादंबरी घेते.जागतिकिकरणोत्तर काळातली तरूणाई अनेक संभ्रमांनी वेढलेली आहे.या संभ्रमांनी त्यांचे जीवन दिशाहीन करून टाकलेले आहे. या व्यवस्थेने त्यांच्या आशा-आकांक्षांना मारून टाकत त्यांना भ्रमिष्ट केले आहे.अशा या भ्रमिष्ट झालेल्या, अपेक्षाभंगाचे ओझे घेऊन वावरणाऱ्या,स्वप्नांचा चुराडा झाल्याची सल घेऊन जगणाऱ्या नव्या पिढीचे प्रश्नायण या कादंबरीने ध्वनित केले आहे. कोणत्याही कादंबरीचे कथानक पात्रांच्या आधारे विकसित होत असते.कादंबरीतील पात्रेच कादंबरीला कादंबरीपण देत असतात.कादंबरी लेखकाने पात्रांचे व्यक्तिमत्त्व किती सामर्थ्यशीलपणे रेखाटले यावरही कादंबरीचे मूल्य ठरत असते.त्यातूनच कादंबरीला सजीवता येत अनुभव जिवंतपणाने साक्षात होत असतो.

‘कादंबरी आणि लोकशाही’या दीर्घ लेखात मॅनेजर पांडेय लिहितात,“चांगल्या कादंबरीत प्रत्येक पात्राचा दृष्टीकोन व स्वर याचं स्वतंत्र स्थान असतं.त्यातूनच त्या त्या पात्राचं मनुष्यत्त्व व त्याने लावलेला जगण्याचा अर्थ जन्म घेत असतो.”या मतानुसार ‘तणस’मधील सर्व पात्रांचा दृष्टीकोन आणि स्वर यांचे स्थान नेमकेपणाने महेंद्र कदम यांनी ठळक केले आहे.या कादंबरीतील प्रत्येक पात्रं आपापला स्वतंत्र दृष्टीकोन घेऊन जगण्याचा अर्थ लावत कादंबरीचे कथन मूल्यवान करत जातो.तळमध्यमवर्गीय समूहातील सुशिक्षित बेकार असलेला दिनकर देसाई हा तरूण या कादंबरीच्या केंद्रवर्ती असला तरी या कादंबरीतील इतर पात्रांनीही कादंबरीच्या आशयाला तोलून धरलेले आहे.अभावग्रस्त दलित समाजगटातील मनोज जावळे आणि सवर्ण समूहातील अमर शेंडे पाटील हा श्रीमंत वर्गातील आहे.या तीनही पात्रांना कादंबरीत स्वतंत्र व्यक्तिमत्त्व प्राप्त करून देण्यात महेंद्र कदम कमालीचे यशस्वी झालेले आहेत.या तिघांच्या स्व-स्वरीय संघर्षातून या कादंबरीचे कथन साकारते. उत्तमराव शेंडे,गजाननपंत कुलकर्णी, शिवाजीराव काळे,दिनकरचे वडिल याही पात्रांना स्वत: चा चेहरा आहे.शेवंताबाईची संघर्षशील आई, दिनकरची सोशिक आई ,बाजीरावची खंबीर पत्नी, शिक्षित असणारी नवस्री उर्मिला ही स्रीपात्रे कादंबरीत उठून दिसणारी आणि कादंबरीला बहुस्वरीय बनवण्यात हातभार लावणारी महत्त्वाची पात्रे आहेत.कादंबरीत आलेली ही सर्व पात्रे प्रातिनिधिक आणि निमित्तमात्र आहेत.कादंबरीतून प्रकट होणारा भवताल हा या कादंबरीगत पात्रांपुरता मर्यादित नाही.तर समकालीन समाजजीवनात वावरणाऱ्या त्यांच्यासारख्या असंख्य जनांचा हा भवताल आहे.‘तणस’झालेल्या वर्तमानाचे हे कथन आहे. प्रवाही भाषेमुळे ही कादंबरी वाचनीय झालेली आहे. निवेदन आणि शैलीच्या वेगवेगळ्या प्रयोगातून या कादंबरीचे कथानक घडत-विकसित होत जाते.दंतकथा, मिथके,लोककल्पना,म्हणी,वाक्प्रचार यांचा वापर;तसेच मनोविश्लेषण-मॅजिकलपणा-स्वगते यासह अनेक घटक रिचवत या कादंबरीचा रूपबंध घडत जातो. वास्तव मांडताना चिंतनशीलता आणि वैचारिकतेच्या सेंद्रीयत्त्वामुळे या कादंबरीला प्रबोधनमूल्यही प्राप्त झाले आहे.समकाळाला आणि त्यातील वैविध्यपूर्ण गुंत्याला समजून घेण्याचा एक महत्त्वपूर्ण प्रयत्न या कादंबरीने केलेला आहे.

तणस(कादंबरी) लेखक : महेंद्र कदम मुखपृष्ठः सतीश भावसार प्रकाशक : लोकवाङ्मय गृह पृष्ठं : २२७ किंमत : ३०० रु.

Kedar.kalwane.28@gmail.com

बातम्या आणखी आहेत...