आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वर्ल्ड ऑफ वर्डस...:शब्द माझे सोबती...

(भाषांतर - अनंत घोटगाळकर)2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शब्दांकडे निव्वळ शब्द म्हणून आम्ही कधीच पाहिले नाही. शब्दांतून कल्पना आकारतात आणि शब्दांतूनच विचार प्रकट होतात हा विश्वास बाबांनी माझ्यात पेरला. जितके अधिक शब्द आपण जाणू तितक्या अचूकपणे आणि परिणामकारकपणे आपण आपले विचार व्यक्त करू शकतो. म्हणून हे शब्दांसंबंधीचे सदर. शब्द असतात मोहक कल्पनांचे स्रोत आणि संवादासाठी अनिवार्य असतात शब्द . खलीज टाइम्सच्या संपादकांनी शब्द आणि भाषा यावर एक सदर सुरु करायला मला आमंत्रित केले तेव्हा थोडा वेळ मला निर्णयच घेता येईना. शब्दांवरचे सदर ही कल्पना छानच होती. पण घनघोर व्युत्पत्तिशास्त्री अशी आपली अगोदरच बनलेली प्रतिमा कोणत्या राजकीय नेत्याला अधिकच दृढ करावीशी वाटेल? एका पत्रकाराने मला उत्तेजित स्वरात विचारले होते, “ तुमची शब्दयोजना मिम्स, कॉमेडी शोज यांचा विषय बनलीय. आता तर त्यावर पुस्तक येतेय. असे काही होईल अशी कल्पना तरी तुमच्या मनाला शिवली होती का हो?” खरं सांगायचं तर मुळीच नाही. हे मात्र खरे की अगदी लहानपणापासूनच मी शब्दांच्या प्रेमात पडलो होतो. समुद्रकिनाऱ्यावर उंडारणारा एखादा मुलगा सापडेल तो शंख हातात घेऊन फुंकू लागतो ना तसा मी समोर येतील ते सारे शब्द सहजच वापरत रहायचो. हे काही जाणीवपूर्वक होत नसे. पण याचा अनाहूत परिणाम असा झाला की भरमसाट शब्दसंग्रह असलेला माणूस म्हणून माझी कीर्ती पसरली. पात्रतेपेक्षा जरा जास्तच. अशी कीर्ती खरे तर दिसामासाने वाढते. पण एका विशिष्ट ट्विटमुळे तिची गती गुरुत्वाकर्षण भेदणाऱ्या एखाद्या रॉकेटच्या प्रवेगाने वाढली. एका स्वयंघोषित सर्वज्ञ असलेल्या टी व्ही पत्रकाराने माझ्याबद्दल एक बदनामीकारक कार्यक्रम सादर केल्याचा खूप राग आल्याने मी ते ट्विट केले होते. “ हे पत्रकाराच्या वेशातील एका तत्वहीन दिखावाखोर माणसाने केलेले ध चा मा करणारे, माहितीचे विकृतीकरण करणारे, धादांत असत्य पेरणारे प्रसारण आहे.” हे ट्विट नुसते लोकांना आवडून थांबले नाही. कसे कुणास ठाऊक त्यामुळे शब्दार्थ पाहण्याच्या जिज्ञासेची एक लाटच इंटरनेटवर उसळली. Farrago हा शब्द मी त्यात वापरला होता. ऑक्सफर्ड शब्दकोशात हा शब्द पाहण्यासाठी त्यांच्या सर्च इंजिनवर अभूतपूर्व गर्दी होत असल्याचे त्यांना आढळले. केवळ काही तासात दहा लाखाहून अधिक लोकांनी हा शब्द शोधल्याची त्यांच्याकडे नोंद झाली. त्यांच्यासाठीही हा आश्चर्याचा धक्काच होता. अशा रीतीने माझी कुकीर्ती रीतसर प्रस्थापित झाली. मी भारतवर्षाचा अगडबंब शब्दोबा ठरलो. आणि यानंतर माझे रूपांतर व्यंगचित्रातील पात्रात व्हायला वेळ लागला नाही. आपली सगळी रसाळ प्रतिभा जणू इंटरनेटवरील विडंबनातच वेचणाऱ्या अष्टपैलू कलाकारांचे की बोर्ड्स एकामागून एक मिम्स प्रसवू लागले. आपले देशी कल्पक कलावंत दिवाळीच्या शुभेच्छा असोत की भेळपुरीची वर्णने , सगळे काही शब्दबंबाळ, गलेलठ्ठ इंग्रजीत लिहू लागले आणि ते सगळे माझ्या नावाने खपवू लागले. एका चतुर मिमकर्त्याने टिनटिन या व्यंगचित्रमालिकेतील कॅप्टन हॅडॉक च्या तोंडी माझे एक ट्विट घातले. त्याच्या नेहमीच्या शब्दांच्या जागी भल्या मोठ्या शब्दांची त्यात रचना केली. ती ऐकून भांबावलेला टिनटिन त्याला म्हणतो, “ तरी मी तुला सांगत होतो. त्या शशी थरूरपासून जरा दूरच रहात जा म्हणून.” माझ्या आणि त्यावेळचे गृहमंत्री राजनाथ यांच्या भेटीचा एक फोटो टाकण्यात आला. त्यात राजनाथ यांच्या चेहऱ्याच्या वर एका लंबवर्तुळात काहीतरी निरर्थक पण भरगच्च बडबड टाकण्यात आली. आणि राजनाथसिंह अगतिकपणे असे म्हणताना दाखवले, “ आणि माझ्याकडे तर एखादा शब्दकोशसुद्धा नाही हो!” यापैकी बरेच मिम्स निरुपद्रवी गंमतीचे असले तरी ठरीव साच्याचे होते. पण त्यातले एक वेगळे मिम कदाचित सर्वोत्कृष्ट म्हणावे लागेल. त्यात विनोद असला तरी तो खिन्न करणारा होता. त्यात एक माणूस असे म्हणताना दाखवला होता, “ आजवर मला वाटायचे मी गरीब आहे. पण आता शशी थरूर यांना भेटल्यापासून माझ्या लक्षात आलंय की मी तर अन्नवस्त्रआश्रयवंचित आहे.” अशा रीतीने व्यंगचित्रांच्या भरतीची लाट तुमच्यावर सातत्याने कोसळू लागली की तुम्हाला दोनच गोष्टी करणे शक्य असते. एक तर चिडायचे आणि तुम्हाला असे विदूषकाच्या भूमिकेत घालू पाहण्याच्या प्रत्येक प्रयत्नाचा निकराने विरोध करायचा. किंवा मग या भूमिकेशीच मैत्री करायची आणि ती आपल्याला हितकारक बनवायची. मी दुसरा मार्ग निवडला. पाहतायचं की तुम्ही. खरंय. शब्दांना माझ्या आयुष्यात नेहमीच महत्त्वाचे स्थान राहिले आहे. माझ्या वडिलांचा- चंदन थरूर यांचा माझ्या जीवनावर मोठाच प्रभाव पडलेला आहे. मलबारच्या ग्रामीण परिसरात, प्रथम खेड्यात आणि मग छोट्याशा गावात त्यांनी आपले शिक्षण घेतले होते. त्यानंतर 1948 ला ते इंग्लंडला गेले. तेथे पुन्हा त्यांना अगदी सुरुवातीपासून इंग्लिश शिकावे लागले. तेच माझे शिक्षक, माझे मार्गदर्शक आणि माझे संशोधन सल्लागार बनले. त्यांनीच माझ्यात मूल्यें रुजवली. माझी श्रद्धा, माझे सामर्थ्य आणि माझे स्वत्वभान हे सारे त्यांच्याकडूनच मला मिळाले. जीवनाला आणि नवनव्या ज्ञानाला आज ज्या उत्साहाने मी सामोरा जातो तो सारा त्यांचाच वारसा आहे. आपल्या कामाच्या बाबतीतला माझा नैतिक दृष्टिकोन ही त्यांचीच देणगी. आणि होय, शब्दांवरील माझे प्रेम हीसुद्धा. माझ्या वडिलांना शब्दक्रीडांचे व्यसनच होते. ते शब्दांशी तऱ्हेतऱ्हेचे खेळ खेळत. वर्तमानपत्रातील शब्दकोडी सोडवत. माझ्या बहिणींसाठी आणि माझ्यासाठी ते वेगवेगळे शब्दखेळ बनवत. एखाद्या नऊ दहा अक्षरांच्या शब्दापासून चार किंवा जास्त अक्षरांचे किती शब्द आम्ही बनवू शकतो हे ते पहात. लांब कुठेतरी कारमधून निघालो की आणखी एक मजेदार खेळ आम्ही खेळत असू. एकाने कोणता तरी एक पाच अक्षरी शब्द मनात धरायचा. मग एकेक करून इतर सगळ्यांनी वीस पाच अक्षरी शब्द सांगायचे. प्रत्येक वेळी पहिल्याच्या मनातील शब्दातील किती अक्षरे त्या शब्दात आहेत हे त्याने सांगायचे. या माहितीच्या आधारे मग इतरांपैकी कुणीतरी त्याच्या मनातला शब्द ओळखायचा. शब्द आणि भाषा यांच्यावरील हे घट्ट प्रेम आणि ते प्रेम वापरातून व्यक्त व्हावे म्हणून बाबा योजत असलेल्या कल्पक क्लृप्त्या हे सारे त्यांच्या थोरल्या मुलात म्हणजे माझ्यात अपरिहार्यपणे उतरलेच. पण शब्दांकडे निव्वळ शब्द म्हणून आम्ही कधीच पाहिले नाही. शब्दांतून कल्पना आकारतात आणि शब्दांतूनच विचार प्रकट होतात हा विश्वास बाबांनी माझ्यात पेरला. जितके अधिक शब्द आपण जाणू तितक्या अचूकपणे आणि परिणामकारकपणे आपण आपले विचार व्यक्त करू शकतो. म्हणून हे शब्दांसंबंधीचे सदर. शब्द असतात मोहक कल्पनांचे स्रोत आणि संवादासाठी अनिवार्य असतात शब्द . भाषांतर - अनंत घोटगाळकर ("खलीज टाईम्स' मध्ये प्रसिद्ध झालेल्या खा. शशी थरूर यांच्या एका स्तंभाचे भाषांतर)

बातम्या आणखी आहेत...