आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

माझी शॉर्टफिल्म:भावनांचा नितळपणा गढुळतो तेव्हा...

एका वर्षापूर्वीलेखक: डॉ. देवप्रिया देशमुख
  • कॉपी लिंक

प्रत्येकाला आपल्या आयुष्यात एक अशी व्यक्ती हवी असते, जिच्यासमोर आपण पाण्यासारखं पारदर्शक राहू शकू. पण, आमच्या पिढीचं दुर्दैव हे की आम्ही सोशल लाइफ नि सोशल मैत्रीच्या गुंत्यात भावनांची ही पारदर्शकताच गढुळ करून टाकलीय. त्या गुंत्यात गुरफटून मरतोय अन् त्याला सगळे आत्महत्या म्हणतायत. तसंच काहीसं माझ्यासोबत झालं असावं... त्या अस्वस्थतेची कहाणी म्हणजेच ‘विषाद’.

तेव्हा आई-बाबा गावी असायचे. मी एकटी जालन्यात. नोकरीचा वीट आलेला. पण, फीस भरायची असल्याने ती करावी तर लागणारच होती. लहाणपणापासून आई-आजीनं एवढं जपलं, की एकटं राहणं काय, हेच माहीत नव्हतं. आई गावी गेल्यावर स्वतःला व्यक्त करणंच बंद झालं. त्यातून एकटेपणा एवढा वाढला, की कधी काळी हसणारी, खेळणारी मी शांत झाले. हे मला स्वतःलाही समजलं नाही. तेव्हा आम्ही कसल्याशा नाटकाची तालीम करत होतो. मी एकटी शांत बसलेली, कुठल्या तरी विचारात गढलेली. तेव्हा मागून आवाज आला, ‘पिरे, तू ठीक आहेस ना..?’ कानाचे आणि मनाचे दरवाजे उघडल्यासारखं झालं. अचानक डोळ्यांवरच्या झापडा निघाल्यासारखं वाटलं. तो आवाज होता, आमच्या मॅडम शर्मिष्ठा कुलकर्णी यांचा. त्यांनी ते सहज म्हटलं, पण ती साद अमृतासारखी वाटली. मी घरी येऊन यावर खूप विचार केला. वाटलं आपल्यासारखे असेच किती तरी लोक असतील. या जगात ज्यांना एकटेपणा खायला उठला असेल. आपले लोक असूनही ते एकांतात जगत असतील. त्यांना गरज आहे ‘तू ठीक आहेस ना?’ म्हणायची. या विचारातूनच मला ‘विषाद’ची कहाणी सुचली.

मी लगेच मित्रांना सांगितलं, की आपण यावर शॉर्टफिल्म करायची. पण, लॉकडाऊन झाले. त्यानंतर सुशांतसिंह राजपूतने आत्महत्या केल्याची बातमी आली. तेव्हा या विषयाच्या आणखी खोलात गेले. तयारी सुरू केली. आमच्या पुढे आव्हान होतं कॅमेरा आणि कास्टचं. आमचे मित्र राहुल आणि विशालने ती सोय केली. भर पावसात पवन, सिद्धांत कॅमेरा, लेन्स घेवून आले. नोकरी करत सर्वांनी तयारी सुरू केलेली. एका मेसेजवर, कॉलवर जमायचो. तेव्हा काही तरी कमावल्याचा विश्वास आला. बाहेर कोरोनाची आणीबाणी. आम्ही जोशात कामाला लागलेलो. ऐनवेळी आमचं चित्रीकरणाचं स्थळ रद्द झालं. त्यामुळे सगळे हादरलो. तेव्हा श्रुतीच्या आई- बाबांनी आम्हाला त्यांचं घर दिलं. पात्रांची निवड केली. शूट सुरू झालं. आमचा मित्र पवन खांदेनं कधी सिगारेटही हातात धरलेली नव्हती. त्याला मी डायरेक्ट ती ओढायला सांगितली. त्याने हूं की चूं न करता एका टेकमध्ये सीन करून आमची मनं जिंकली. पवन आणि सिद्धांत यांनी उत्तम छायाचित्रण केलं. ती आमची सर्वांत जमेची बाजू. कधीही कॅमेऱ्यासमोर न गेलेली श्रुती मोठ्या धिटाईनं वावरली. आम्हाला विश्वासच बसला नाही, ही आमचीच श्रुती आहे याचा. प्रीतेशच्या डोळ्यावर सूज आलेली. ती वाढली. त्याला खूप त्रास होत होता. त्याचाच सर्वांत पहिला टेक होता. त्याच्या निरागस चेहऱ्याने ‘विषाद’ अजूनच खुलला. समाधानचा सीन होता. त्याला खूप वेळ लागला. आम्ही सगळेच बिचकलेलो. त्याने संयम ठेवला. अर्धा तास खुर्चीवर उभा राहिला. म्हणतात ना, मनात एकदा जिद्दीची गाठ बांधली की त्या पुढे ऊन, वारा, पाऊस, वादळ काहीच दिसत नाही. तसंच काहीसं आमच्याबाबतीत झालं. प्रतीकची मदत मोलाची ठरली. वैष्णवीचा आवाज आम्ही शॉर्टफिल्मसाठी घेतला. तिच्याकडून खूप मेहनत करून घेतली. सर्वांनी म्हणजेच श्रुती, वैष्णवी, पवन खांदे, समाधान, प्रीतेश, प्रतीक, पवन, सिद्धांत यांनी मी सांगेन ते ऐकलं, काम केलं. जशी ‘विषाद’ मी कल्पनेत रंगवली, अगदी तशीच हुबेहुब साकारली.

हसू अन् आसू...
शॉर्टफिल्ममधील शेवटचा सीन सिद्धांतचा होता. त्यात त्याला दचकायचं होतं. ६० टेक झाले, पण त्याला जमेचना. मी शक्कल लढवली. लाथ मारली, की त्यानं दचकायचं. त्यानं अक्षरश: आठ लाथा खाल्ल्या, तरीही काही जमेना. संताप, संताप झालेला. मात्र, अखेर त्यानं चांगला सीन दिला. दुसऱ्या दिवशी भेटला तर लाथा खावून सुजलेला दिसला. हे आठवलं तरी आजही ओठात हसू आणि डोळ्यांत आसू येतात.

बातम्या आणखी आहेत...