आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दृष्टिकोन:नैतिकतेवर भारतातील लोक विश्वास ठेवत नाहीत का?

औरंगाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

अटलबिहारी वाजपेयींनी एकदा विचारले होते की, भारतातील लोकांना नैतिकतेचे संकट आहे का? वेगळ्या शब्दांत, ते स्वविवेकाने नैतिक आहेत की भीती किंवा दबावामुळे सर्व काही योग्य करतात? भारतात भ्रष्टाचार ही काही अनोखी गोष्ट नाही. अनोखी गोष्ट म्हणजे त्याची स्वीकारार्हता आणि ज्या पद्धतींनी तो कायम ठेवला जात आहे त्या पद्धतींची ‘सर्जनशीलता’. भारतातील लोक स्कँडिनेव्हियन देशांतील लोकांप्रमाणे नैतिक आणि न्याय्य वर्तनावर विश्वास ठेवत नाहीत, असे दिसते. इतर लोक करतात तेव्हा भ्रष्टाचार आपल्यासाठी वाईट असतो. सर्वसाधारणपणे आपले वर्तन नैतिकतेपेक्षा उपयुक्ततेवर अधिक आधारित असते.

आपल्याला व्यवहारज्ञान असले पाहिजे, कारण काळ वाईट आहे आणि तो आपल्याशी न्यायाने वागेलच असे नाही, असे सांगून आपण नैतिकतेपासून सूट घेतो. अशा परिस्थिती संधी कमी असतात, स्पर्धा चुरशीची असते, भ्रष्टाचाराचे वर्चस्व असते आणि यश पद्धतशीरपणे विकत घेता येते, तेव्हा जगाकडून आपल्याला हवे ते मिळवा, असे मानले जाते. त्या बदल्यात तुम्हाला जे काही द्यायचे आहे, ते कसेही टाळता येणार नाही. बहुधा आज ऑनलाइन व्यवहार हे असे क्षेत्र राहिले आहे, जिथे मर्यादित मानवी हस्तक्षेपामुळे प्रामाणिकपणाला वाव राहिला आहे. कारण आज आपल्या विवेकबुद्धीनुसार नैतिकता आचरणात आणणारे लोक फार कमी राहिले आहेत.

महात्मा गांधींचा साधन-शुचितेवर विश्वास होता आणि साधन हे साध्याइतकेच महत्त्वाचे आहे, असे ते म्हणायचे. त्यांच्या नैतिक श्रेष्ठतेचे कौतुक झाले, परंतु त्यांना खूप अनुयायी मिळाले नाहीत. हा विचार भारतीय परंपरेच्या विरोधात होता म्हणून का? कौटिल्याचे अर्थशास्त्र सत्तेच्या नैतिक आधारावर चर्चा करण्यात वेळ घालवत नाही. याउलट समता-दाम-दंड-भेद यातून सत्ता मिळवण्याच्या आणि टिकवण्याच्या पद्धतींचा ते पुरस्कार करते. महाभारतात श्रीकृष्णाने नैतिक साधनांपेक्षा कौरवांचा पराभव करण्यास प्राधान्य दिले. युधिष्ठिराला एक खोटे बोलण्यास सांगितले तेव्हाच कौरवांचे गुरू द्रोण यांना मारता आले. द्रोणाचार्यांचे पुत्र अश्वत्थामावर खूप प्रेम होते. अश्वत्थामा मारला गेल्याचे द्रोणाचार्यांना सांगितले तर त्यांचे मनोधैर्य खचून जाईल हे कृष्णाला माहीत होते. युद्धात अश्वत्थामा नावाचा हत्ती मरण पावला होता. अशा प्रकारे युधिष्ठिर म्हणाला की, अश्वत्थामा मारला गेला तेव्हा तो खोटे बोलत नव्हता. पण, या वाक्यात असलेल्या लबाडीबद्दल तो अनभिज्ञ नव्हता.

त्याचप्रमाणे कर्णाच्या रथाचे चाक जमिनीत रुतले आणि ते काढण्यासाठी तो खाली उतरला तेव्हा त्याचा वध करण्यात आला. नि:शस्त्र व्यक्तीवर वार करणे युद्धाच्या नियमांच्या विरुद्ध होते, परंतु जे स्वतः अनैतिकतेचा आश्रय घेतात त्यांच्याशी नैतिकतेने वागण्याची गरज नाही, अशी कृष्ण-नीती होती. भीमाशी झालेल्या लढाईत दुर्योधन मारला गेला. समोरासमोरच्या युद्धात भीम दुर्योधनाबरोबर जिंकू शकत नव्हता म्हणूनच नियमांच्या विरुद्ध असतानाही त्याने दुर्योधनाच्या मांडीवर प्रहार केला. कौरव हे अधर्माचे प्रतीक असल्याने त्यांचा पराभव करण्यासाठी अयोग्य मार्गांचा वापर करणे योग्य मानले गेले होते.

हिंदूंच्या दृष्टीने धर्म ही एक अत्यंत शुद्ध कल्पना आहे. ती आपल्यासमोर नैतिक आचरणाचा आराखडा ठेवतेच, पण त्याबरोबरच योग्य संदर्भात उपयुक्त ठरवता येईल अशा व्यवहारकुशलतेलाही परवानगी देते. ख्रिश्चन परंपरेच्या विपरीत आपल्याकडे दहा आज्ञा नाहीत. पाच भावांमध्ये आपली वाटणी करणे धर्माच्या विरुद्ध आहे, असे महाभारतात द्रौपदी युधिष्ठिराला सांगते, तेव्हा युधिष्ठिर म्हणतो, धर्म सूक्ष्म आहे, द्रौपदी. याची व्याख्या कोण करू शकले? पण आज धर्मातील बौद्धिक बारकावे विसरून त्यांचे सामान्यीकरण झाले आहे. सत्ता, प्रतिष्ठा आणि संपत्तीसाठी नैतिकता धाब्यावर ठेवली गेली आहे. त्यामुळेच आज पालकही आपल्या पाल्यांसोबतच त्यांच्या उत्तरपत्रिकेची फुटलेली प्रत मिळवण्याचा प्रयत्न करू लागले आहेत. किंवा राजकीय पक्ष योग्य-अयोग्य याचा विचार न करता येन-केनप्रकारे सत्ता मिळवण्याचा प्रयत्न करतात. या नैतिक पतनाला आपण सर्व मिळून जबाबदार आहोत. (ही लेखकाची वैयक्तिक मते आहेत.) पवन के. वर्मा लेखक,मुत्सद्दी, माजी राज्यसभा खासदार pavankvarma1953@gmail.com

बातम्या आणखी आहेत...