आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रसिक ग्राऊंड रिपोर्ट:'तळीये' कव्हर करताना....'

एका वर्षापूर्वीलेखक: डॉ. कविता प्रभाकर राणे
  • कॉपी लिंक

ज्या मातीनं ८४ जणांना आपल्या काळमिठीत घेतलं, ज्या मातीने ३२ जणांवरची आपली ती मिठी सैल होऊ दिली नाही त्याच मातीच्या ढिगाऱ्यावर फुलं वाहून नातेवाईकांनी डबडबलेल्या डोळ्यांनी आपल्या प्रियजनांना अखेरचा निरोप दिला. गेले चार दिवस या मातीतून कोणीतरी जिवंत बाहेर येईल, आपल्या लाडक्यांचं अखेरचं दर्शन होईल अशी आशा लावलेल्या सगळ्या नातेवाईकांच्या सगळ्या आशा-अपेक्षांना पूर्णविराम मिळाला. ३२ जीव त्या ढिगाऱ्यात आता कायमचे विसावले होते... "तळीये' घटनेचे रिपोर्टिग करताना "एबीपी माझा'च्या पत्रकार कविता राणे यांचा हा हृदयद्रावक ग्राऊंड रिपोर्ट...

२१ जुलैची सगळी बुलेटीन्स ही पावसाच्या बातमीने सुरूवात करणारी होती. संध्याकाळपर्यंत राज्यभरातले पावसाचे अपडेट्स भीती वाढवणारे होते. चिपळूण आणि महाडमधली परिस्थिती तर भयावह होत होती. आठ वाजता ऑफिसमधून निघाले तेव्हा मोबाईलमध्ये रायगड, रत्नागिरीहून येणारे अनेक फोटोज अपडेट्स होते. काहीजण मेसेंजर वर माहिती विचारतही होते. मी खुद्द रायगडचीच असल्याने आणि रायगडमध्ये चार वर्ष रिपोर्टिंग केलेलं असल्यामुळे अनेकजण मला ओळखत होते आणि त्यामुळेच माहितीही देत होते. अचानक रात्री ११ नंतर एकाचा मेसेज आला, मॅडम पाऊस तुफान पडतोय, दरडी कोसळण्याची प्रचंड भीती वाटतेय. २००५ ची महाड आणि त्यानंतर माळीणची घटना आठवून जीवात कालवाकालव झाली. २२ जुलैला सकाळी उठताक्षणी पहिला विचार रात्रीच्या त्या मेसेजचा आला. फोन हातात घेतला आणि डोळे जेमतेम उघडत अपडेटस पहायला लागले. पुराचा जोर होता पण दरडीची काहीही बातमी नव्हती. मनातल्या मनात हुश्श करत कामाला लागले.

आजही सगळ्या बातम्या पावसाच्याच होत्या. थोड्याच वेळात स्क्रीनवर वाचलं. महाडमध्ये दरड कोसळून ३२ जणांचा मृत्यू अनेकजण बेपत्ता. तशीच कंट्रोल रूमकडे धावले. दरडीची बातमी असल्याने तीव्रता वाढणार याची खात्री होती. कंट्रोल रूममधून बातमी अपडेट करायला सुरूवात केली पण माझ्या डोळ्यांसमोर महाड आणि आजूबाजूचा परिसर पावसात भिजत होत. कोणाचेही फोन धड लागत नव्हते. प्रचंड गोंधळ सुरू झाला. दरड आदल्या दिवशी म्हणजे गुरूवारी संध्याकाळी साडेचार ते पाचच्या दरम्यान कोसळली होती. पण प्रचंड पाऊस, कोसळलेली संपर्कयंत्रणा आणि जागोजागी दरडी कोसळल्यामुळे बंद झालेले रस्ते यामुळे अशी काही घटना घडलेय हे समजायलाच दुसऱ्या दिवशीची म्हणजे शुक्रवारची जवळपास दुपार उजाडली. शुक्रवारी अकराच्या सुमारास प्रशासनाला या सगळ्या दुर्घटनेची कुणकुण लागली. तळीयेपासून दूर, दरडीने अडलेला रस्ता साफ करून प्रत्यक्ष गावात पोहोचायला दुपारचा एक वाजला होता. आम्ही दुपारी अडीच तीनपर्यंत महत्वाचे काही फोन घेतले आणि पटकन काहीतरी पोटात टाकावं म्हणून डबा घेऊन कँटीनमध्ये गेले. पाचच मिनिटात माझे डिपार्टमेंट प्रमूख माझ्यासमोर येऊन बसले. त्यांना काहीतरी सांगायचं होतं हे त्यांच्या चेहऱ्यावरूनच कळलं. काय अपडेट् आहे सर असं विचारलं आणि त्यांनी मला एकच वाक्य म्हटलं. खाऊन घे, खाली गाडी उभी असेल, त्यात बस, घरी जा, काही कपडे घे आणि त्याच गाडीने महाडकडे निघ. तुला तळीयेला जायचंय.

मुंबईतलं ट्रफिक कापत आम्ही निघालो तोपर्यंत संध्याकाळचे साडेपाच वाजले होते. माणगावला पोहोचेपर्यंत पावणेदहा वाजले होते. स्थानिक रिपोर्टरने सांगितले की पुढे जाऊ नको. बचावकार्य थांबवलंय आणि महाडमध्ये लाईट नाही. सगळा काळोख आहे. मी माणगावलाच थांबायचा निर्णय घेतला. सकाळी साडेपाच वाजता महाडच्या दिशेने निघाले. महाड शहराच्या हद्दीत शिरताच समोर दिसणाऱ्या विध्वंसाने अंगावर काटा आला. रस्त्याच्या दोन्ही बाजूला घरांच्या भिंती किमान नऊ, दहा फूट पाण्यात बुडून बाहेर आल्याच्या खूणा दाखवत होत्या. ट्रक, गाड्या अक्षरश: उलट्या पुलट्या पडल्या होत्या. पाऊस सुरूच होता पण पूर ओसरला होता. महाड एमआयडीसीकडून बीरवाडीला जायचा रस्ता पक़डला पण पुढे जाताच स्थानिकांनी तळीयेकडे जाण्याचा रस्ता दरडीमुळे बंद असल्याचं सांगितलं. तिथून मागे फिरलो आणि पुढच्या रस्त्याने निघालो. वाटेत एका ठिकाणी रस्त्यावरची दरड नुकतीच बाजूला केल्याच्या खूणा होत्या. सात-सव्वासातला मी तळीयेमध्ये पोहोचले. मिडियाच्या दोन गाड्या आणि पोलीसांच्या दोन गाड्या फक्त पोहोचल्या होत्या. गाडीपासून दरड कोसळलेल्या जागेपर्यंत म्हणजे तळीयेतल्या कोंढाळकर वाडीपर्यंत दोन-तीनशे मीटरचे अंतर चढ चढून जायचं होतं. कोंढाळकर वाडीसह सात वाड्यांच मिळुन तळीये गाव सजलंय. आम्ही कॅमेरा घेऊन वर पोहोचलो आणि समोरचं दृष्य पाहून माझे पाय जागीच थिजले. उजव्या बाजूला डोंगराचा एक लपका निघावा असा भाग मोकळा दिसत होता आणि समोर फकत मातीचा ढीग होता. माझ्यापासून किलोमीटरभर अंतरावर एक मातीनं माखलेलं घर दिसत होतं. इथे वस्ती असल्याची काहीही खूण दिसत नव्हती. मी आजबाजूला बघत अंदाज घ्यायचा प्रयत्न करत होते तेवढ्यात माझ्या मागे आलेल्या एका पंचवीसेक वर्षाच्या महिलेने जोरात हंबरडा फोडला, “ आई, बाबा, दादा, कुठे आहात, मला घ्यायला नाही आलात कोणी, मी आले की खालच्या रस्त्यावर मोटरसायकल घेऊन यायचात ना, आता का नाही आलात...”, कॅमेरा तिच्याकडे वळला होता. तळीयेची माहेरवाशीण होती ती, घटना ऐकून धडपडत माहेरी आली होती, पण समोर माहेर म्हणून काही काही शिल्लक नव्हते. थोड्या वेळात तिथे आलेल्या गावकऱ्यांनी सांगितलं की ते तिकडे झाड दिसतंय ना तिथे आमची घरं होती. ते जिथे दाखवत होते त्याच्या जवळपास दीड-दोन किलोमीटरच्या परिघात मी नजर फिरवली तर फक्त आणि फक्त ओल्या मातीचा चिखल दिसत होता.

घटना घडून ३५ तास उलटून गेले होते. बचावकार्याचा पत्ता नव्हता. आठच्या सुमारास फावडी घमेली घेऊन ठाणे आपत्ती प्रतिसाद दल (TDRF) चे पंधरा जवान तिथे पोहोचले. आमच्याशी बोलत ते आता मातीत गाडल्या गेलेल्या कोंढाळकर वाडीच्या दिशेने पावलं टाकायला लागले. पहिल्याच जवानाने टाकलेलं तिसरं पाऊल थेट मांडीपर्यंत आत चिखलात रूतलं. जवळपास एकही जेसीबी नव्हता जो किमान या जवानांसाठी रस्ता करू शकला असता. तसाच चिखल तुडवत ते पुढे जात होते. ते एवढ्या चिखलात घमेलं, फावड्याच्या सहाय्याने काय आणि कसं शोधणार असाच प्रश्न माझ्या मनात सतत येत होता. ज्या एनडीआरएफच्या पथकाकडे सगळेजण डोळे लावून बसले होते ते साडेनऊ वाजता पोहोचले. टीडीआरएफने तोपर्यंत काम सुरूही केलं होतं. साधारण चारपाच तास उलटले. डोंगरालाही पाझर फुटेल इतका नातेवाईकांचा प्रचंड आक्रोश सुरू होता. जितक्या लोकांशी बोलता येईल त्यांच्याशी बोलत होते. पाच महिन्यांच्या बाळांपासून ते साठीच्या आजोबांपर्यंत अनेकजण ढिगाऱ्याखाली अडकले होते. प्रत्येकजण हताशपणे ढिगाऱ्याकडे आणि दुरवर दिसणाऱ्या जवानांकडे डोळ्यात पाणी आणून बघत होता. जिओचं तुटक तुटक नेटवर्क सोडता कोणत्याही मोबाईलला नेटवर्क नव्हते. ऑफीसशी संपर्क व्हायला अडचणी येत होत्या. पाऊसाच्या सरी कोसळतच होत्या. कँमेरा आणि माईक न भिजू देण्याची प्रचंड कसरत होत होती. एका दोन ठिकाणी टीव्हीयुला नेटवर्क मिळाले की बातमी ऑफीसला पाठवत होतो. बातमी कव्हर करण्याची जागा आणि नेटवर्क मिळण्याची जागा या किमान सहा सातशे मीटरच्या अंतरात होत्या. सगळा रस्ता थेट चढाचा आणि दगडांचा होता. अर्ध्या रस्त्यात तर फक्त चिखल होता. दुपारी दोन पर्यंत हा रस्ता किमान वीस बावीस वेळा चढ उतर केला. पोटात सकाळी साडेपाच वाजता एक चहाचा घोट गेला होता त्यावर काहीही नाही. एक दोन बिस्कीट कुणीतरी हातात दिले ते खाल्ले. गाडीत काही खायचं सामान होतं पण गाडीपर्यंत जाऊन ते घ्यायलाही वेळ नव्हता. इतक्या तासांमध्ये वॉशरूमलाही गेले नव्हते. तीनच्या सुमारास कॅमेरामनला सांगून जरा रस्ता खाली उतरले. तिथे एक घर होतं. वॉशरूमला जाऊ का असं विचारलं तेव्हा आजी आत घेऊन गेली.

घराच्या बाहेरही नातेवाईकांचा हंबरडा काळीजाला चरे पाडत होता. अंगणातून रस्त्यावर आले आणि समोर जे दिसलं त्याने मी जागच्या जागी उभी राहिले. उताराच्या रस्त्यावरून टीडीआरएफचे जवान चिखलात माखलेल्या एका बाळाचं कलेवर हातात घेऊन खाली येत होते. शरीर तिथेच थांबलं पण मेंदूने सराईतपणे सुचना केली. आजूबाजूला कॅमेरामन न दिसल्याने मी हातातल्या मोबाईलमध्ये व्हिडिओ ऑन केला. जवान माझ्या बाजूने जावू लागले आणि नुकतीच मी ज्या घराच्या अंगणातून बाहेर आले होते तिथून कोणीतरी जोरात धावत आले. सात महिन्यांच्या विघ्नेशच कलेवर जवानांनी आणलं त्याचे वडील होते ते... विजय पांडेंनी माझा बबड्या म्हणत जवानांच्या दिशेने धाव घेतली तेव्हा पोलीस आणि बाकीच्यांनी त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला. पण एकाने बघुदेत त्यांना असं म्हटलं आणि विजय पांडेंनी पोराला हातात घेतल. विजय पांडे जमीनीवर पाय आपटत पोराला कवटाळत होते. "बबड्या उठ तुझा बाप आहे रे' असं म्हणत त्याला छातीशी लावत होते. एका हातात कॅमेरा पकडून दुसऱ्या हाताने तोंड दाबत मी हुंदका आवरायचा प्रयत्न करत होते. समोरचं दृष्य काळीज पिळवटून टाकणारं होतं. सगळ्यांच्या डोळ्यांतून धारा लागल्या होत्या. विघ्नेशला घेऊन विजय पांडे जिकडे सगळ मृतदेह ठेवले तिकडे गेले आणि मागून आलेल्या गावकऱ्यांनी मला सांगितलं की, विजय पांडेची आई, वडील, पत्नी, दहा वर्षांची पत्नी आणि सात वर्षांचा विघ्नेश सगळे दरडीखाली सापडले होते. मुलीचा मृतदेह सापडला होता पण बाकीच्या कुणाचा काहीही पत्ता नव्हता. शुक्रवारी बचाव पथकाला सापडलेला तो पहिला मृतदेह होता.

इतका वेळ होऊनही माणसं सापडत नाहीत म्हटल्यावर नातेवाईकांच्या आक्रोशात संतापाची भर पडत होती. जवळच जमलेल्या काही गावकऱ्यांनी मला बोलावले आणि त्यांची मुलाखत घेण्याची विनंती केली. त्यांचं म्हणणं होत की, ४२ तास उलटूनही प्रशासन काहीही करत नव्हतं. घटनेच्या तिसऱ्या दिवशी दुपारी बारा नंतर गावात पहिला जेसीबी पोहोचला होता. पोक्लेन मशीनची मागणी होत होती पण शेवटपर्यंत एकही पोक्लेन मशीन पोहोचलीच नाही. त्यांच्याशी बोलायला सुरूवात केली तेव्हा गर्दीतून एका तरूणाला काहीजणांनी पुढे आणलं. मला म्हणाले की मॅडम हा सैनिक आहे, याचंही सगळं कुटुंब अडकलंय. २८-३० वर्षांचा अक्षय कोंढाळकर, पुढे आला. “ इथे कोणी आमदार खासदार यायचा असता तर हेलिकॉप्टर उडाली असती पण इथे साधा जेसीबी आलेला नाही, का मदत करत नाही शासन” असा त्याचा उद्विग्न सवाल होता. अक्षय हिमाचल प्रदेश मध्ये इंजिनिअरिंग सेक्शनमध्ये पोस्टिंगला आहे. पाच वर्षांपूर्वी त्याचं लग्न झालं. शेती करणारा बाप आणि गावातल्या शाळेत पोषण आहार बनवणारी आई यांनी खुप कष्टाने अक्षयला शिकवलं. आई बापासाठी कर्ज काढून अक्षयनं गावात वीस लाखांचं घर बांधलं. बीएससी झालेली बहीणसुद्धा संरक्षण दलात प्रवेश करण्यासाठी धडपड करत होती. पण दरडीने अक्षयचं सगळ सगळं हिरावलं. ना घर राहिलं, ना घरातली माणसं. अक्षय पूर्णपणे उद्धवस्त झालाय. तीन दिवस मी अक्षयला बघत होते. अक्षय माझ्याशी बोलला ते मिडियाशी झालेलं त्याचं पहिलं आणि शेवटचं बोलणं. त्यानंतर अक्षय कुणाशीही बोलला नाही. तीन दिवसांत ना त्याच्या डोळ्यातून पाण्याचा थेंब आला, ना गळ्यातून हुंदका, ना तोंडातून शब्द. त्याच दिवशी संध्याकाळी मी अक्षयशी बोलले, पण त्याचं सांत्वन करायला मला शब्द सापडत नव्हते. राग, उद्विग्नता, दु:ख असं सगळं डोळ्यात घेऊन शुन्यात नजर लावून बसलेल्या अक्षयचा चेहरा मी कधीच विसरू शकणार नाही.

अक्षयचा सवाल चुकीचा मुळीच नव्हता. घटनेच्या तिसऱ्या दिवसापासून नेत्यांचे दौरे सुरु झाले. बहुतेक सगळे बडे नेते हेलिकॉप्टरने महाड एमआयडीसीपर्यंत यायचे आणि तिथून गाडीत बसून तळीयेपर्यंत. नेत्यांच्या गाड्या यायची वेळ झाली की, पोलीस सगळ्यांना बाजूला हटवायचे, घटनास्थळाच्या सगळ्यात जवळ जिथपर्यंत गाड्या जाऊ शकत होत्या तिथपर्यंत पोलीस रस्ता मोकळा करायचे. गाडीतून उतरल्यावर अधिकारी माहिती देत देत नेत्यांना त्यांचा पाय जेमतेम चिखलाला लागेल एवढ्याच अंतरावर न्यायचे आणि तिथून एक नजर डोंगराकडे टाकून नेते माघारी फिरायचे. प्रत्यक्ष बचाव कार्य तर नेत्यांच्या नजरेच्या कक्षेतही नव्हतं. पांढरे शुभ्र कडक इस्त्रीचे कपडे, अत्यंत महागडे चकचकीत पॉलीश केलेले बुट आणि कुणाचाही स्पर्श नेत्यांना होणार नाही याची काळजी घेत त्यांना कडं करून उभे राहणारे पोलीस आणि सुरक्षारक्षक असा एकुण लवाजमा. मुख्यमंत्री, राज्यपालांना तर थेट जाडजूड दोरीचं कुंपण घालून नेत आणि आणत होते. गाडीतून उतरून पाहणी करायला जायला दोन मिनिटं, प्रत्यक्ष घटनास्थळी दोन मिनिटं, मिडियाशी बोलायला दोन मिनिटं, लोकांशी बोलायला दोन मिनिटं आणि गाडीचा दरवाजा उघडून अर्धवट आत आणि अर्धवट बाहेर अशा अवस्थेत अधिकाऱ्यांना सुचना द्यायला दोन मिनटं असा प्रत्येक नेत्याचा कार्यक्रम. दहा-बारा मिनिटांपेक्षा जास्त वेळ एकही नेता त्या घटनास्थळी थांबला नाही. मुख्यमंत्री आणि राज्यपालही या सगळ्याला अपवाद नव्हते.

घटनेच्या चौथ्या दिवशी म्हणजे रविवारी सकाळी मी घटनास्थळी पोहोचले तेव्हा मात्र एनडीआरएफच्या जवानांचं काम सुरू झालं होतं. आदल्या दिवशी आलेल्या जेसीबीने थोडासा रस्ता करायला सुरुवात केली होती. पण जेसीबीने माती बाजूला सारली की जोरात पाऊस यायचा आणि माती पुन्हा खाली यायची. चिखल-मातीचा पुन्हा थर व्हायचा. आज मात्र मी प्रत्यक्ष काम सुरू आहे तिथे जायचं ठरवलं. कॅमेरामन अरविंद वारगे आणि मी निघालो. बाकी सगळे रिपोर्टर्स अजून पोहाचायचे होते. रविवारीच मुख्यमंत्री येणार होते त्यांच्या पोहोचण्याआधी मला आत जाऊन परत यायचे होते. पहिला पाय टाकला तो नडगीपर्यंत आत गेला. पायात गमबूटही नव्हते. पाय बाहेर काढताना बुट सोबत काढण्यासाठी कसरत होत होती. माझ्यापेक्षा माझा कॅमेरामन अरविंद वारगेची हालत आणखी खराब होती.. कॅमेरा सांभाळत तो पण पुढे येत होता. माझे शॉट्स घेत होता. माझ्या हातात एक छत्री आणि बुम माईक होता त्यामुळे दोन्ही हातही अडकलेले होते. अजून थोडी पुढे चालल्यावर एनडीआरएफच्या जवानांना मी दिसले. सगळे माझ्याकडे बघत राहिले. त्यांच्यापर्यंत तितक्या चिखलातून कोणी येईल याची त्यांना अपेक्षाच नव्हती. सगळे नजरेच्या टप्प्यात आले असं वाटतानाच माझा एक पाय गुडघ्यापेक्षाही जास्त चिखलात गेला. तो अजून खाली जातोय की काय अशी भीती वाटते तोपर्यंत मागचा पायही अडकला. आता मी पुरती अडकले होते. मागून येणाऱ्या अरविंदने मला हात देण्याचा प्रयत्न केला पण तोपर्यंत तो माझ्याहीपेक्षा खोल गेला होता. मी अरविंदला थांब सांगितलं. एक अधिकारी जरा माझ्या दिशेने आले. मी आवाजानेच त्यांनाही थांबवले आणि पुढे येऊ नका असं सांगितलं. आता एकतर माझा एक पाय चिखलातून बाहेर यायला हवा होता किंवा तो काढायला माझ्या हाताला काहीतरी आधार हवा होता. आजूबाजूला काहीही आधार नव्हता. जेसीबी काही अंतरावर होता. त्याचं ते अवजड तोंड गरकन फिरून माझ्यापर्यंत येऊ शकत होतं. मी त्याला खूण केली तसा त्याने प्रयत्न सुरू केला पण माझ्यापर्यंत वळण्याच्या प्रयत्नात तो असा काही कलंडला की तो उलटेल की काय अशीच आम्हाला भीती वाटली. मी हातानेच त्याला इकडे वळू नको अशी खूण केली. इतक्यात माझा मागचा पाय बाहेर आला आणि त्यानंतर हळूहळू मी पुढचा पायही बाहेर काढला. अरविंद अजूनही चिखलातच होता. मला बाहेर आलेलं पाहून त्यानेही जोर लावून पाय काढायचा प्रयत्न केला पण त्याचा बूट आतच राहिला. मी अरविंदला म्हटलं तु बुट काढून घे. पण कॅमेरा सांभाळून ते त्याला शक्य होत नव्हतं. तेवढ्यात पावसाची सर आली. अरविंदने त्याच्या बुटाला रामराम ठोकायचा निर्णय घेतला पण तसं झालं तर दिवसभर दगडांमध्ये त्याने काम कसं केलं असतं. मी त्याच्याकडे कॅमेरा मागितला. जेमतेम तो कॅमेरा माझ्या हातात आला. अरविंदने पुन्हा चिखलात पाय घातला आणि त्याचा बूट काढला.

हा सगळा उपद्व्याप करून मी खाली उतरले आणि एकदा मागे वळून पाहिले. गावातलं एकमेव वाचलेलं घर दूर उभं होतं. तिथपासून मी किलोमीटरपेक्षा जास्त लांब होते. माझ्या मागे जवान एका मृतदेहाला बांधत होते. इतक्या लांब ते अभागी जीव अक्षरश: माती पाण्याच्या रेट्यात वाहत आले होते. कोण कुठे असेल काही पत्ता नव्हता. जवान वासाच्या आधारे शोधायचे. जिथे वास यायचा तिथे खणायचे. अनेक वेळा तर खाली गाय, म्हैस, कुत्रा असायचं. काही काही वेळा अवयवांचे तुकडे सापडत होते. मी उभी राहून जवानांशी बोलत होते आणि बाजूलाच एक पायाचा तुकडा पडला होता. एका बाईचं पाऊल होतं ते. लक्ष्मीची पावलं म्हणून कुठल्यातरी घरातलं माप त्याच पायाने ओलांडलं असेल पण आज त्याचा एक तुकडा शरीरापासून वेगळा होऊन चिखल माती होऊन पडला होता. सगळ्या वातावरणात प्रचंड दुर्गंधी पसरली होती. बाहेर निघणारी कलेवरं आता कुजायला लागली होती. काही फुट खोल खणलं आणि मृतदेह सापडला तर वरून येणारं पाणी काही सेकंदात खड्डा भरायचं, त्या सगळ्यातून तो मृतदेह ओढून काढण्याच्या प्रयत्नात त्यांचे अवयवच हातात येत होते. जेसीबीचालकाने एका ठिकाणी जेसीबीचं तोंड मातीत घातलं आणि ते एका मृतदेहाला लागलं. त्यानंतर त्या मृतदेहाची अवस्था पाहून तो भडाभडा तिथेच ओकला.

शेजारी एक घर अर्धवट अवस्थेत होत. घरात चार पाच कोंबड्या तेवढ्या जिवंत होत्या. जेमतेम तीन खोल्यांच घर होतं. भिंतीवरचं घड्याळ नीट सुरू होत. किचन जसंच्या तसं होतं पण मागच्या खोलीत छपरापेक्षा जास्त उंचीचा मातीचा ढीग होता. दरड येऊन तिथे थांबली होती. तो दरडीचा शेवट असेल तर सुरूवातीचा थर किती मोठा आणि भयानक असेल याच्या कल्पनेनेच धस्स झालं. त्या भिजलेल्या जिवंत मुक्या जीवांकडे नजर टाकून मी बाहेर आले. गर्दीतला एकजण पुढे आला. शेजारचं घरही जेमतेम शिल्लक होतं. ते माझं घर आहे असं तो मला सांगत होता.

आम्ही तिथून मागे फिरलो आणि पुन्हा तितकाच चिखल तूडवत बाहेर आलो. दुपारनंतर एका पुरूषाचा मृतदेह सापडला, त्याच्या हातात घट्ट धरून ठेवलेली दोन नोटांची बंडलं होती. दुसऱ्या एका ठिकाणी आजोबांनी नातवाला घट्ट आवळून धरलं होतं. ती मिठी इतकी घट्ट होती की दोघांना ढिगाऱ्यातून बाहेर काढताना ती मिठी सोडवणं शक्य होत नव्हत. अखेर कशीतरी ती प्रेमाची, जीवाच्या आकांताची मिठी जवानांनी सोडवली खरी पण आजोबांचे हात तसेच बांधलेले होते. ज्या ठिकाणी ती प्रेतं एकत्र ठेवलेली होती तिथेही जवानांनी दोघांना शेजारीच ठेवलं. जेव्हा पोलीस त्या सगळ्यांना अंत्यसंस्कार म्हणून पुरायला गेले तेव्हा त्यांनाही ते सगळं पाहवलं नाही, त्यांनी पुन्हा एकदा ते बाळ आजोबांच्या मिठीत दिलं आणि दोघांना एकत्रच पुरलं. धो-धो कोसळणारा पाऊस आणि जेमतेम नावाला शिल्लक राहिलेली, धड ओळखही न पटवता येणारी कलेवरं, यांच्या चिता पेटवण्यापेक्षा ज्या डोंगराने त्यांना गिळलं त्याच्याच मातीत त्यांना सुपूर्द करण्याचा निर्णय गावकऱ्यांनी घेतला आणि एकच मोठा खड्डा करून त्यांना अखेरचा निरोप दिला गेला. रविवारची संध्याकाळ आली तरी अजून ३२ जण सापडायचे होते. गावकरी सांगतील तिथे जवान खोदत होते. पण कुठे जनावर, कुठे एखादा अवयव तर कुठे कुजलेलं शरीर सापडत होतं. अखेर सगळयांनी काळजावर दगड ठेवून एक निर्णय घेतला. आपल्याच लाडक्या जीवलगांचे असे तुकडे पाहण्यापेक्षा त्यांनी जिथे शेवटचा श्वास घेतला तिथेच त्यांना चिरशांती घेऊ द्यावी. संध्याकाळी सात वाजता जिल्हाधिकारी गावकऱ्यांच्या विनंतीवरून तिथे आल्या. गावकऱ्यांनी बचावकार्य थांबवा, मृतदेह आता नका शोधू अशी विनंती केली. शेवटची व्यक्ती सापडेपर्यंत आम्ही शोधण्याचं काम करू अशी भूमिका त्या मांडत राहिल्या पण गावकरी हात जोडून विनवणी करत होते की मृतदेहांची विटंबना थांबवा. मावळत्या सुर्याच्या साक्षीने ते सगळं संभाषण ऐकतानाही अंगावर काटा उभा राहत होता. नातेवाईक आशेचे सगळे पाश तोडत असताना गावकरीच नाही तर जिल्हाधिकाऱ्यांनाही आसवं थांबवता येत नव्हती.

सोमवारची सकाळ उजाडली तेव्हाही नातेवाईक येतच होते. गायब झालेल्या आपल्या गावाकडे बघून अश्रू ढाळत निघून जात होते. दुपार होता होता मात्र गाड्यांची गर्दी वाढायला लागली. प्रचंड संख्येने लोक तिथे येत होते. अनेकांना फक्त तिथे सेल्फी काढायचे होते. ते सगळं दृष्य पाहून मला संताप येत होता. मी तिथून निघाले. गाडीजवळ उभी राहिले. गावच्या संरपंचांशी तिथेच भेट झाली. राहिलेली माणसं कुठे राहतात याची माहिती मी विचारली त्यांनी सगळेजण आता इथेच आहेत असं सांगितलं. पण दुसऱ्या एकाने मला पुढच्या वस्तीत नेलं. जवळपास दीड किलोमीटर दगड माती डोंगराचा चढ तुडवल्यावर मी शेताच्या बाजूला असलेल्या एका घराजवळ पोहोचले. समोरचं चित्र पाहून माझ्या काळजात चर्र झालं. एक म्हातारी आजी, एक आई आणि तिची दोन लेकरं छोट्याश्या पडवीत बसून होते. दरडीतून आपला जीव कसाबसा वाचवला होता त्यांनी. त्या दोन मुलांचा बाप दरडीच्या ढिगाऱ्यात कंबरेपर्यंत अडकला होता. जीवाच्या भीतीने त्याला ओढून काढताना त्याला प्रचंड दुखापत झाली होती, त्यामुळे त्याला दवाखान्यात दाखल केलं होत. आता असंख्य प्रश्नांची मालिका मनात घेऊन सासू सुना दोन लेकरं घेऊन बसल्या होत्या. दोन तीन दिवसांपासून गावातल्या त्या रिकाम्या घरात कोण देईल ते खाऊन, लेवून आणि पांघरून रूग्णालयाकडे असणाऱ्या आपल्या माणसाची काळजी करत होत्या. थोड्या वेळात मुलांचे आजोबा आणि मामा त्यांना भेटायला आले तेव्हा बापाला बघून त्या लेकीने फोडलेला हंबरडा ह्रदय पिळवटून टाकणारा होता. त्यांना शांत करून तिथून निघाले आणि परत गावातल्या शाळेजवळ आले. रस्त्यात कोणीतरी हातात फुड पॅकेट दिलं. भूक तर लागली होती आणि आजूबाजूला काही मिळणार नव्हते. हातात आलेलं ते गरम अन्न मी मुकाट घेतलं. बाजूलाच चार बायका खात होत्या त्यांच्या सोबत खात होते तेवढ्यात १४ वर्षांची अक्षदा तिथे आली. तिच्याशी बोलायला सुरूवात केली आणि जणू दरड पुन्हा कोसळतेय की काय असा मला भास झाला. “....गुरूवारी सकाळपासून जोरदार पाऊस पडत होता, खूप पाणी वाढत होतं. आम्ही सगळे घरातच होतो. संध्याकाळी चारच्या सुमारास सगळीकडे अंधार पसरला होता. समोरचं काहीही दिसत नव्हत. तेवढ्यात माझी बहीण धावत आली. आमचा हात धरून ओढून पळा पळा सांगायला लागली. आम्ही बाहेर आलो तोपर्यंत लोट आलाच होता. आम्ही जीवाच्या आकांताने पळालो आणि मी कशालातरी लागून पडले. मी मातीत गाडली जाणार एवढ्या आईने मला कॉलर धरून खेचलं. आम्ही पळत राहिलो. आजूबाजूला किंकाळ्या एकू येत होत्या. थोडं पुढे माझ्या एका मैत्रीणीचा आवाज आला. ती चिखलात अडकली होती. आम्हाला वाचवा वाचवा म्हणून विनवणी करत होती. आईने तिला काढायला पाऊन पुढे टाकलं पण ती चिखलात रूतायला लागली. आईने तिला हात जोडले आणि म्हणली तुला वाचवायला गेली तर माझी लेकरं पण जातील, आता तुझ्या नशीबाची तू..........” अक्षदाच्या प्रत्येक वाक्यागणिक माझ्या हातातला माईक जड होत होता. पाचव्या दिवशी म्हणजे सोमवारी मी पोहोचले तेव्हा सगळी बचावपथकं येऊन थांबली होती. अखेरच्या सर्व्हेचे सोपस्कार पूर्ण झाले की बचावकार्य अधिकृतपणे थांबवलं जाणार होतं. नातेवाईकांचा आक्रोश आता हतबल झाला होता. काही वेळातच जिल्हाधिकाऱ्यांसोबत पुन्हा एकदा चिखल तुडवत आम्ही काल जिथे बचावकार्य थांबवलं होतं तिथपर्यंत गेलो. आज तिथे वावरणं अत्यंत कठीण होतं होतं. दुर्गंधीमुळे अवघ्या परिसरात उभं राहणंही शक्य होत नव्हतं. पावसाची सर आली की त्याच्यासोबत खाली येणारी माती अक्षरश: मनात भीती उभी करीत होती. जिल्हाधिकाऱ्यांनी तिथेच बचावकार्य संपलं असं घोषित केलं आणि संध्याकाळी शोकसभा घेऊ असं सांगितलं. दुपारी एक पीटीसी करायला मी दरड कोसळून खाली आलेल्या डोंगराच्या भागाच्या अगदी जवळ गेले आणि पहिल्यांदा मला भीतीची जाणीव झाली. तो माती कोसळलेला डोंगर जणू अजूनही आसूसलेला आहे असा भास होत होता. भीतीची तीच जाणीव अरविंदच्या आणि आमच्यासोबत आलेले आमचे ड्रायव्हर रमेश लाड यांच्या नजरेतही दिसली. अरविंदने कधी नव्हे ती मला विनंती केली की कविता रिटेक घेऊ नको पटकन आवर. मी जसा होईल तसा पीटीसी रेकॉर्ड केला आणि परत फिरले. आधी आमचे ड्रायव्हर, मग अरविंद आणि मागे मी चालत होते. कडक जमीनीवर चालतोय असं वाटत असतानाच माझा पाय भस्सकन गुडघाभर आत गेला आणि भीतीची लहर माझ्या सर्वांगातून गेली. अरविंद मागे आला आणि त्याने मला बाहेर काढले. काहीही न बोलता आम्ही बाकीचे लोक जिथे होते तिथे पोहोचलो. आता संध्याकाळचे पाच वाजत आले होते जिल्हाधिकारी आणि काही राजकीय नेते सगळया नातेवाईकांसोबत दरड कोसळलेल्या डोंगराच्या अगदी समोर आले श्रद्धांजलीच्या कार्यक्रमासाठी... काही भाषणं झाली, माझ्या मागे उभ्या असलेल्या एका व्यक्तीने मंत्रांचा उद्घोष केला आणि सगळेजण फुलं वहायला खाली वाकले. ज्या मातीनं ८४ जणांना आपल्या काळमिठीत घेतलं, ज्या मातीने ३२ जणांवरची आपली ती मिठी सैल होऊ दिली नाही त्याच मातीच्या ढिगाऱ्यावर फुलं वाहून नातेवाईकांनी डबडबलेल्या डोळ्यांनी आपल्या प्रियजनांना अखेरचा निरोप दिला. गेले चार दिवस या मातीतून कोणीतरी जिवंत बाहेर येईल, आपल्या लाडक्यांचं अखेरचं दर्शन होईल अशी आशा लावलेल्या सगळ्या नातेवाईकांच्या सगळ्या आशा-अपेक्षांना पूर्णविराम मिळाला. ३२ जीव त्या ढिगाऱ्यात आता कायमचे विसावले होते. आमच्यापासून थेट सरळ रेषेत काही अंतरावर असलेलं एक झाड फुलं वाहताना इतकं सळसळ करत हलायला लागलं की ते पाहून माझ्या मनात काहीशी विचित्र भावना आली. सगळेजण मागे फिरले तेव्हा अंधार व्हायला लागला होता मी मागे वळून पाहिलं तर आता तिथे कोणीही नव्हतं. दिवेलागणीची वेळ होत आली होती, माणसं घरी परत यायची वेळ झाली होती.. पण तळीयेतल्या कोंढाळकर वाडीवर कसलीच हालचाल नव्हती. प्रकाशाचा एकही किरण कुठूनही उजळत नव्हता. मुलांना हाका मारणाऱ्या आयांचे आवाज येत नव्हते. नाक्यावरच्या मुलांचं एकमेकांना टाळ्या देत खिदळणं सुरू नव्हतं, चुलीचा धुर नव्हता, म्हाताऱ्या बायांच्या गप्पांचा आवाज नव्हता, वाडीकडे येणाऱ्या मोटारसायकलींचा आवाज नव्हता.... ते सगळं खरंच तिथे नव्हंत की ते सगळं होतं पण मला दिसत नव्हतं. भास-आभासाच्या खेळात मी इतकी गुंग झाले की अरविंदची हाकही मला ऐकू आली नाही. अरविंदने पुन्हा मला हाक मारली आणि मी वळून त्याच्याकडे पाहिलं आणि पुन्हा एकदा गावाच्या दिशेने पाहिलं. अरविंद शांतपणे म्हणाला, कविता एकदा बघ, शांतपणे पाया पड आणि निघूया इथून... मी काही न बोलता डोंगराकडे पाहिलं, खाली वाकून जमीनीला स्पर्श केला आणि अरविंदसोबत चालायला लागले. काही पावलं पुढे चालत गेल्यावर पुन्हा एकदा मागे वळून पाहिलं तेव्हा मला जाणवली ती भयानक शांतता होती, स्मशानशांतता या शब्दाचा अर्थ बहुधा मला पहिल्यांदा कळाला.

लेखिका ‘एबीपी माझा’ या वृत्तवाहिनीच्या वृत्तनिवेदिका आहेत. kavitarane11@gmail.com

बातम्या आणखी आहेत...