आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

थेट भाष्य:भारताला युद्धनौकांची गरज आहे का ?

औरंगाबाद24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

जवळपास पाच दशके भारतीय ध्वज फडकवणाऱ्या नौदलाची पहिली विमानवाहू युद्धनौका आयएनएस-विक्रांतचा नवा अवतार दाखल होणे हा देशासाठी आनंद साजरा करण्याची संधी आहे. मूळ नौका १६,००० टनांची होती, मात्र ही त्यापेक्षा तिप्पट म्हणजे ४२,८०० टनांची आहे. सोबतच ही भारतात निर्मित सर्वात मोठी युद्धनौका असून रचनाही स्वदेशी आहे. तिने भारताला त्या विशिष्ट देशांच्या रांगेत बसवले आहे, जे अशा प्रकारची युद्धनौका तयार करण्यास सक्षम आहेत. सध्या अशा देशांत ब्रिटनही नाही. मात्र तातडीचे तीन प्रश्न उपस्थित होतात. भारताला विमानवाहू युद्धनौकांची गरज आहे का? जर असेल तर कोणत्या प्रकारच्या आणि किती? आणि तिसरा प्रश्न असा की, या युद्धनौकेतून आम्हाला कोणत्या प्रकारच्या संहारक अस्त्रांचा वापर करायला हवा आणि ती अस्त्रे कुठून येतील?

विमानवाहू युद्धनौका की पाणबुडी? ही चर्चा ७५ पेक्षा अधिक वर्षांपासून नौदलात सुरू आहे. दुसऱ्या महायुद्धात विशेषत: अमेरिका आणि जपानच्या विशाल युद्धनौकांनी सागरी युद्धाला नवे रूप दिले होते. जर्मनी अापल्या पाणबुड्यांवर जोर देत होता, ज्यांना यू-बोट म्हटले जायचे. युद्धनौकांचा वापर करून समुद्रावर नियंत्रण (‘सी-कंट्रोल’) कायम ठेवायचे की पाणबुड्यांचा वापर करून शत्रूला समुद्रावर नियंत्रण (‘सी-डिनायल’) करण्यापासून रोखायचे. पाश्चिमात्य देशांनी ‘सी-कंट्रोल’चा मूळ अमेरिकन सिद्धांत अंगीकारला, सोव्हिएत नौदलाने शत्रूला दूर ठेवण्याच्या उपायांवर मोठी गुंतवणूक केली. त्याने गाजावाजा न करता अत्यंत संहारक हल्ला करणाऱ्या पाणबुड्यांचा विशाल ताफा तयार केला. सोव्हिएत नेत्यांना माहीत होते की विशाल सागरी युद्धनौका आणि त्यावर तैनात केल्या जाणाऱ्या महागड्या हवाई अस्त्रांच्या निर्मितीत पाश्चिमात्य देशांसमोर त्यांचा टिकाव लागणार नाही. याशिवाय एक युद्धनौका नष्ट झाल्यानंतर होणाऱ्या प्रचंड नुकसानीचा त्यांना विचार करायचा होता. आम्हाला प्रामाणिकपणे माहीत आहे की, १९७१ च्या युद्धादरम्यान ‘यूएसएस एंटरप्राइज’च्या नेतृत्वात अमेरिकेचा ७ वा ताफा कशा पद्धतीने भारताच्या दिशेने आला होता आणि सोव्हिएत पाणबुड्यांनी त्याचा कशा प्रकारे पाठलाग केला होता. मात्र शीतयुद्धाच्या अंतिम दशकांत सोव्हिएत संघाने एक छोटी विमानवाहू युद्धनौका तयार केली होती, जी नंतर भारताला विकण्यात आली. तिला ‘विक्रमादित्य’ असे नाव देण्यात आले. आज ती भारताची अग्रणी विमानवाहू नौका आहे. तिला ४४,५०० टनांचा आकार दिला गेला. यादरम्यान भारतीय नौदलाने एक जुनी ब्रिटिश युद्धनौकाही मिळवली. तिला ‘आयएनएस विराट’ नाव देण्यात आले. ती २३,००० टनांची आहे आणि पहिल्या ‘विक्रांत’पेक्षा दीडपट मोठी आहे. १९४२ मध्ये रॉयल नेव्हीने ‘मॅजेस्टिक’ क्लास नावाने परिचित विमानवाहू नौकांना दाखल करून घेतले. युद्ध संपले तेव्हा अनेक नौका अर्धवट तयार झाल्या होत्या. यापैकी एक भारताने खरेदी केली आणि तिची बेलफास्टमध्ये पूर्णपणे निर्मिती केली. हीच पहिली ‘आयएनएस विक्रांत’ बनली.

अशा पद्धतीने भारतीय नौदलात एक दशकापेक्षा अधिक काळापासून विमानवाहू की पाणबुडी ही चर्चा सुरू होती, त्याचा निर्णय झाला, मात्र तो अडचणीचा होता. १९६५ चे युद्ध असे होते, ज्याबाबत भारतीय नौदलाला बोलायची इच्छा नसेल. क्रूझर ‘पीएनएस बाबर’च्या नेतृत्वात पाकिस्तानी नौदलाच्या सात युद्धनौकांचा टास्क फोर्स गुजरातच्या किनाऱ्यावर द्वारकानगरीच्या खूप जवळ येऊन ठेपला होता आणि त्याने ५.२५ इंचांच्या तोफा तैनात केल्या होत्या, ज्याला आव्हान मिळू शकले नाही. ‘विक्रांत’ त्या वेळीही कोरड्या बंदरावर (ड्राय डॉक) होती. त्या वेळी उपमहाद्वीपावर तैनात एकमेव पाणबुडी ‘पीएनएस गाझी’पासून धोका होता. त्यानंतर भारताने आपली पहिली पाणबुडी सोव्हिएत ‘फॉक्सट्रोट्स’ मिळवली. मात्र १९७१ मध्ये पुन्हा ‘विक्रांत’ला ‘गाझी’ आणि फ्रेंच पाणबुडी ‘देफ़्नेस’च्या भीतीने अरबी समुद्रापासून दूर न्यावे लागले होते. एका ‘ऑपरेशन’नुसार दिशाभूल करून ‘गाझी’ला विशाखापट्टणमला नेऊन तेथे बुडवण्यात आले होते.खर्च, निर्मितीची क्षमता नसणे आणि राजकीय बदलांमुळे एका वेळी दोन विमानवाहू ठेवण्याबाबत कधी विचारच झाला नव्हता, मात्र नवीन ‘विक्रांत’ या स्थितीत बदल घडवू शकतो. हे आपल्याला पुन्हा त्या तीन प्रश्नांकडे नेतो, ज्यावर मी वर चर्चा केली आहे. मी हा प्रश्न ‘कार्नेगी एंडाऊमेंट’चे अॅश्ले टेलिसच्या समोर मांडला होता, ज्याच्याशी धोरणात्मक गट परिचित आहेत. त्यांचे उत्तर होते, अगोदर तुम्हाला हे ठरवावे लागेल की, भारताचे भू-राजनीतिक लक्ष्य काय आहे? जर तुम्ही द्वीपकल्पाच्या १००० हजार किलोमीटर दूरपर्यंतच्या अंतरात मर्यादित असाल तर तुम्हाला विमानवाहू युद्धनौकांची गरज नाही. नि:संशयपणे हे कराची आणि ग्वादरला आपल्या टप्प्यात आणू शकते. तुम्हाला जर जास्त दूरपर्यंत खेळायचे असेल तर विमानवाहूंची गरज भासेल. भारतीय नौदलाने आतापर्यंत महागडी आणि छोटी विमाने खरेदी केली आहेत. मोठ्या संख्येने सैनिकांना तैनात करावे लागते. (ही लेखकाची वैयक्तिक मते आहेत.) शेखर गुप्ता एडिटर-इन-चीफ, ‘द प्रिंट’ Twitter@ShekharGupta

बातम्या आणखी आहेत...