आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करादेशाचा राजकीय, सामाजिक आणि आर्थिक रंग झपाट्याने बदलत असताना राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेचे काही महत्त्व आहे? मी राजकीय हवामानशास्त्रज्ञ नाही, म्हणून मी या प्रश्नाचे विश्लेषण भाकीत म्हणून जबाबदारीने करू शकत नाही. पण, मला माहीत आहे की, कधी कधी स्वतःला शोधण्यासाठी व शक्तिशाली व्यवस्थेला तोंड देण्यासाठी विचित्र वेडेपणा गरजेचा असतो. राहुल यांनी निवडलेला यात्रेचा पर्याय अवघड, प्रतिमा बदलण्याची प्रक्रिया, सततच्या अपयशात भविष्याचा शोध आहे, परंतु इतिहास व अनुभव हेच सांगतात की, यात्रेची शक्ती काहीही बदलू शकते, फक्त व उत्कटता व स्पष्ट दृष्टी गरजेची आहे. राहुल गांधींची यात्रा सध्या राजस्थानात आहे, तिथे त्यांचेच सरकार आहे. राजस्थानातील पक्षांतर्गत मतभेद, राजकीय नृत्य स्पर्धांवर नंतर चर्चा करू. पण, राहुल राजस्थानात असताना गुजरात, हिमाचल आणि दिल्ली एमसीडीचे निवडणूक निकाल आले. गुजरात व दिल्लीतून अत्यंत वाईट बातमी आहे, तर हिमाचलमध्ये पक्षाचे अस्तित्व मजबूत झाले. यात्रेदरम्यान राहुल सतत जनतेच्या भेटीगाठी घेत संवाद साधत आहेत, पण मतदार काँग्रेसला पूर्णपणे राज्य करू द्यायला का तयार नाहीत, असा प्रश्न ते विचारत आहेत का? किंवा आत्मपरीक्षणही होत आहे की, काँग्रेस राजकीय व्यवस्थापन कौशल्य का विसरली? गंभीर राजकीय संकटातून जात असलेल्या काँग्रेससाठी राहुल यांच्या यात्रेतील काही पावलांनी राजकीय सत्याच्या खोलात जाऊन वास्तव स्वीकारण्याच्या दिशेने वाटचाल केली आहे का? यात्रेच्या गतीने लोकशाही प्रश्नांकडे दिखाऊ दृष्टिकोनातून पाहिल्यास ना कार्यकर्त्यांत अस्वस्थता निर्माण होईल, ना मतदारांमध्ये. पक्षांतर्गत नाराजीकडे लक्ष देण्याची यात्रेची दृष्टी नसेल तर एवढी पायपीट करूनही राहुल कुठेही पोहोचणार नाहीत, असे मानूया. राहुल गांधी राजस्थानकडे ज्या तटस्थ, थंड आणि उदासीन नजरेने पाहतात ते धोकादायक आहे. आपसातील मतभेद हा राजकारणाचा महत्त्वाचा भाग आहे, पण राजस्थानमध्ये हे डावपेच पक्षासाठी आत्मघातकी ठरले. राजस्थान काँग्रेस ज्या घरगुती कटुतेच्या टप्प्यातून जात आहे तो राजकीय षड््यंत्र आणि कुरबुरींचा कळस आहे. त्यामुळे काँग्रेसचे सर्वात सुरक्षित राज्य असुरक्षित होत चालले आहे. यंत्रणा-विकास यंत्रणा गोंधळलेली आहे. मुख्यमंत्री अशोक गहलोत व सचिन पायलट यांच्या राजकीय टोळीयुद्धामुळे पक्षाची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. राहुल यांनी आता या सगळ्याकडे दुर्लक्ष करू नये. राजस्थान सोडताना राहुल यांनी निर्णय घ्यावा की, येथे प्रमुख कोण होणार? मुख्यमंत्री अशोक गहलोत असतील तर हा संभ्रम दूर झाला पाहिजे. सचिन पायलट असतील तर तेही स्पष्ट व्हायला हवे. अनिश्चिततेचा चक्रव्यूह संपला पाहिजे. डिसेंबर २०२३ मध्ये निवडणुका आहेत. लवकरच निर्णय घेऊ, सांगेन, वाट पाहा, असे वाक्प्रचार चालणार नाहीत. राजस्थानच्या वाळवंटातून बाहेर पडताना राहुल यांनी इथली राजकीय अस्थिरता दूर केली तर हा प्रवास अप्रतिम होता, असे म्हणता येईल. प्रश्न फक्त राजस्थानचा नाही. यात्रेनंतर राहुल यांना हेही ठरवावे लागेल की, त्यांना जयप्रकाश नारायण व्हायचे की जवाहरलाल नेहरू? पक्षात मोठी जबाबदारी घेण्याऐवजी तात्त्विक युक्तिवाद करून आणि मोठे मुद्दे उपस्थित करून काँग्रेसला बळ द्यायचे, असे राहुल यांना वाटते. ठीक आहे, पण त्यांना समजून घ्यावे की, अध्यक्ष खरगे पक्षाचा चेहरामोहरा बदलण्याइतके दिग्गज आहेत का? भाजप व काँग्रेस या दोन्ही पक्षांत यात्रांचा इतिहास आहे. या दोघांनीही देशाच्या वाटांवर प्रचंड प्रवास केला आहे. पण, तेव्हा त्यांच्याकडे यात्रा करून पक्षाचे व्यवस्थापन करण्यासाठी नेते होते. मुख्य म्हणजे या यात्रा काल्पनिक स्वप्नांवर आधारित नव्हत्या. त्या वेळचे ते वास्तव होते, नेतृत्व होते, नेते होते. आज राहुल यांच्याकडे हे सर्व आहे का? यात्रांतून हवे ते मिळू शकते, पण लाटा व करिष्म्याच्या युगात मनाने नव्हे, तर दूरदृष्टीने मार्ग निवडून त्यावर चालावे लागेल.
लक्ष्मी प्रसाद पंत नॅशनल एडिटर, दैनिक भास्कर pant@dbcorp.in
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.