आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भवताल:‘त्या’ वार्तेच्या प्रतीक्षेची वेळ न येवो!

कामिल पारखे8 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

मा झा एक खूप जुना छंद आहे. आपली बाग फुलवण्याच्या, झाडं लावण्याच्या आणि त्यांची देखभाल करण्याच्या आवडीशी संबंधित हा छंद आहे. पावसाळा सुरू झाल्यावर दोन-तीन मोठे पाऊस होऊन गेले, की फिरायला गेल्यावर किंवा रस्त्याने कुठेही चालत असलो, की माझी नजर आजूबाजूला भिरभिरत असते. रस्त्याच्या कडेला, इमारतींच्या कुंपणांच्या भिंतींना लागून असलेल्या मातीत भरपूर गवत असते. त्याचप्रमाणे तेथे उगवलेली अनेक छोटी-छोटी रोपटी वाऱ्याच्या झुळकीने डोलत असतात. यातली काही रोपं, विशेषत: झेंडू, अबोली किंवा गुलबकावलीची रोपं मला आकर्षित करता. काही टमाट्याची, तर काही मिरच्यांची रोपं असतात. सणावाराला वापरलेली झेंडूची फुले सुकल्यानंतर अशीच कुठेतरी पडतात आणि मग त्यातल्या काही बिया पावसानंतर अशा रोपांच्या रूपाने प्रकटतात. मिरच्या आणि टमाट्याच्या बियांचेही असेच होत असते. पिंपळ, वड, उंबर आणि कडुनिंबांच्या अतिशय चिवट रोपांबद्दल तर बोलायलाच नको. जिथे कुठे मातीचा आसरा मिळेल, तिथे या झाडांची रोपे आपली मुळं घट्ट रोवत असतात. यापैकी झेंडू, टमाटे आणि मिरच्यांची रोपे अलगद मातीसह उपटून मी घरी आणतो आणि छोट्या-मोठ्या कुंड्यांमध्ये ती लावतो. यानंतर काही दिवसांत या नव्या जागेत ही रोपं तरारतात आणि गणपती उत्सवात, त्या नंतरच्या नवरात्र- दसऱ्याच्या सणांत शेजाऱ्यापाजाऱ्यांना वेगवेगळ्या रंगांतल्या अशा झेंडूची टपोरी फुलं खुणावत असतात. फुलं वाढवण्याची माझी साधनाही सार्थकी लागते. त्यामुळं एखाद-दुसरं फूल कुणी माझ्या नकळत नेले, तरी अशा वेळी फार त्रागा करायचा नसतो, हे मी शिकलो आहे.

आता मी सांगत असलेला माझा हा छंद लवकरच भूतकाळ होईल की काय, अशी भीती मात्र गेले काही दिवस वाटते आहे. याचे कारण आमचे शहर हे महाराष्ट्रातल्या स्मार्ट सिटींपैकी एक आहे आणि देशांतल्या स्मार्ट सिटींच्या स्पर्धेत वरचा क्रमांक गाठण्यासाठी येथे नवनवीन विकासाचे प्रयोग हाती घेतले जात आहेत. एक मात्र मान्य करायलाच हवे की या स्मार्ट सिटी कार्यक्रमामुळे शहरात बऱ्यापैकी स्वच्छता दिसायला लागली आहे. मात्र, याच अभियानांतर्गत शहरात ठिकठिकाणी काँक्रीटचे रस्ते बांधण्यात येत आहेत, या रस्त्यांना लागूनच सगळीकडं पेव्हर ब्लॉक टाकण्यात आले आहेत. त्यामुळं रस्त्यांवरची धूळ आता कमी झाली आहे. पण, याची एक उणी बाजू किंवा यातून बसलेला फटका असा, की या रस्त्यांच्या आजूबाजूच्या परिसरात जमीन आणि माती आता अजिबात दिसेनाशी झाली आहे. या रस्त्यांवर जी काही झाडं आधीच होती, त्यांच्या आळ्यांभोवती अशा प्रकारे काँक्रीट लावलं आहे, की त्यामुळे एकही थेंब पाणी जमिनीत झिरपू नये. सुरुवातीला हे काँक्रीट रस्ते काही ठराविक भागांतच असतील, असं वाटलं होतं; पण महापालिकेने ही मोहीम सर्व शहरभर राबवण्याचा धडाका लावला आहे आणि त्यामुळं पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टीने ही धोक्याची घंटा असू शकेल, असे वाटू लागले आहे. आता पावसाचे पाणी जमिनीत मुरण्याची शक्यता कितीतरी पटीने कमी होणार आहे. त्याऐवजी पावसाचे पाणी काँक्रीटच्या रस्त्यांवरुन, पेव्हर ब्लॉकवरून वाहून थेट नाल्यात आणि जवळच्या नदीत मिळणार आहे. याचाच अर्थ शहराची जमिनीखालच्या पाण्याची पातळीही कमी होणार आहे आणि शहराच्या अनेक भागांत बाराही महिने बऱ्यापैकी पाणी असणाऱ्या बोअरवेल आता कोरड्या राहणार आहेत.

शहरात पावसाचे प्रमाण चांगले असल्याने मोकळी जागा असेल, तिथे कितीतरी प्रकारची रोपे आणि झाडे उगवतात, काही छानपैकी तग धरून राहतात आणि मग चांगली मोठी होतात. अशा प्रकारची नैसर्गिक वृक्षारोपणाची प्रक्रिया आता मोकळी जमीन आणि मातीच शिल्लक नसल्याने ठप्प होणार आहे. त्यामुळे पर्यायाने हिरवे आच्छादन कमी कमी होत जाणार आहे. एक झाड किती पक्ष्यांना, प्राण्यांना आसरा देते, अन्न देते हे सांगायलाच नको. मी शहरात राहत असलो, तरी तीस-पस्तीस वर्षे जुन्या असलेल्या आमच्या कॉलनीत आजही गर्द झाडी आहे. त्या झाडांवर दिवसरात्र अनेक पक्षी - कोकीळ, पोपट, बुलबुल, खंड्या आणि हॉर्नबिल वगैरे - कायम संचार करत असतात. शेजारच्या वाहननिर्मितीच्या कारखान्यात असलेल्या झाडांमध्ये वटवाघळांची मोठी वसाहत आहे, सूर्यास्तानंतर हे निशाचर पक्षी आपली वसाहत सोडून अन्नाच्या, भक्ष्याच्या शोधात मोठ्या संख्येने बाहेर पडताना रोज दिसतात. दिवसभर पाच-सहा खारुताई जमिनीवरून, इमारतींच्या सज्जांतून, या झाडांवरून त्या झाडांवर सारख्या फिरत असतात. मानवी वसाहत वाढत गेल्याने काही वर्षांपासून तळमजल्यांवरच्या फ्लॅट्समध्ये नाग-साप सापडण्याचे प्रमाण कमी होत गेले आहे. शहरातले हरित आच्छादन कमी होत गेल्याने अशा कितीतरी पक्ष्यांचे - प्राण्यांचे अस्तित्वच नाहीसे होत जाणार आहे.

वाघ, सिंह, हत्ती, गेंडा, गवा वगैरे प्राणी त्यांच्या राहण्याच्या नैसर्गिक जागा कमी होत असल्याने नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. काही वर्षांपूर्वी शहरांत आणि गावांत मानवी वसाहतीचा अविभाज्य भाग असलेले गाय, बैल, म्हशी, घोडे, कोंबड्या, गाढव असे पाळीव प्राणीही संख्येने कमी होत चालले आहेत. खूप वर्षांपूर्वी मी या शहरात राहायला आलो, तेव्हा कॉलनीतल्या इमारतींच्या बांधकामासाठी माती, मुरुम वगैरे सामानाच्या वाहतुकीसाठी गाढवांचा सर्रास वापर होत असे. ती वाहतूक पाहताना, ‘गाढव मेलं ओझ्यानं आणि शिंगरू मेलं हेलपाट्यानं’ ही म्हण हमखास आठवायची. आज शहरात घोड्यांप्रमाणे गाढव हा प्राणी नाहीसा झाला आहे. गुजरातच्या सीमेवर असलेल्या दादरा, नगर, हवेली या प्रदेशात मी राहायला गेलो की तिथं रस्त्यांवर आणि सगळीकडं ‘चिवचिव’ करत उडणाऱ्या चिमण्या मी पाहतच राहतो. आमच्या शहरात चिमणी कितीतरी वर्षांपासून हद्दपार झाली आहे. हे सगळं होतं आहे, ते मानवजातीच्या विकासाच्या आणि सुखसोयींच्या नावाखाली. यात पृथ्वीतलावरच्या इतर छोट्या-मोठ्या प्राणिमात्रांना, वृक्षवल्लींना अजिबात स्थान नाही. मध्ययुगीन काळात हे संपूर्ण विश्व पृथ्वीकेंद्रित आणि मानवकेंद्रित आहे, असा समज होता. या विश्वात कितीतरी सूर्यमालिका आणि आकाशगंगा आहेत, हे सिद्ध झाल्याने आता हा समज गैरलागू ठरतो. मात्र, आपल्या सुखसोयी आणि विकासाचा पाठलाग करताना, आजही हे विश्व मानवकेंद्रित आहे असेच गृहीत धरले जाते, हे खूप वाईट आहे. बायबलमध्ये महाप्रलयाची किंवा जगबुडीची एक कथा आहे. ईश्वरी संकेतानुसार आधीच एक महाकाय नौका बांधलेला नोहा आणि त्याने आपल्याबरोबर घेतलेल्या प्रत्येक प्राण्याच्या आणि पक्ष्यांच्या नर-मादीच्या जोड्या या जगबुडीतून वाचतात. पाऊस आणि प्रलय ओसरल्यानंतर बाहेर काय स्थिती आहे, हे जाणण्यासाठी नोहा एका कबुतराला नौकेबाहेर सोडतो. हे कबूतर काही काळानं आपल्या चोचीत ऑलिव्ह वृक्षाची काही पाने घेऊन परतते. जगभर आजही ऑलिव्ह वृक्षाची फांदी चोचीत असलेले कबुतर सुख-शांतीचे प्रतीक समजले जाते, ते या कथेमुळेच. विकासाच्या नावाखाली पर्यावरणाचा आणि इतर प्राणिजनांचा समूळ नाश करत मानवजात आपल्या विनाशाच्या दिशेने जाते आहे. याबाबतची धोक्याची घंटा पर्यावरणवादी आणि इतर जागरूक लोक वाजवत असतात. अशावेळी या विश्वाच्या एखाद्या कोपऱ्यात, दूरच्या कुठल्या तरी ग्रहावर आश्रयासाठी आणि जिवंत राहण्यासाठी सुरक्षित ठिकाण आहे का, याची चाचपणी करण्यासाठी प्रयत्न खरे तर कधीच सुरू झाले आहेत. ऑलिव्ह वृक्षाची फांदी घेऊन नोहाकडे परतलेल्या कबुतराने नौकेबाहेर आता सगळे आलबेल आहे, अशी सुवार्ता आणली होती. पर्यावरणाचा नाश करण्याचा सध्याचा आपला धडाका मानवाने वेळीच थांबवला नाही, तर पुढच्या पिढ्यांना हताश होऊन कदाचित अशाच प्रकारच्या सुवार्तेची आतुरतेने वाट पाहावी लागेल. तो दिवस कधीही न यावा, यासाठी आपला विनाश जवळ आणणाऱ्या उपद्व्यापांना मानवाने तातडीने आवर घालायला हवा.

बातम्या आणखी आहेत...