आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कबीर रिएक्सप्लोअर्ड ​​​​​​​:तो मैं पूजूं पहार...

डॉ. भालचंद्र सुपेकर7 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

जगातल्या कोणत्याही धर्मात मूर्तीपूजेचा उल्लेख नाही. सर्व धर्म आत्मरूपाच्या साक्षात्काराकडे निर्देश करतात. पण स्वतःचं आत्मरूप पाहायची इच्छा आणि धाडस नसल्यामुळे मूर्तीपूजा, कर्मकांड यांची रचना माणसाला गम्य वाटली. याच गम्यतेचा गैरफायदा घेत अनुचित गोष्टी प्रस्थापित करण्याचा प्रयत्न अनेक शतकं सुरू आहे. त्यावर कबीराचं भाष्य...

थेट, सडेतोड, चपखल भाष्य हे कबीराचं वैशिष्ट्य. कोणतीही गोष्ट तो फिरवून, आढेवेढे घेऊन सांगत नाही तर थेट विषयाला हात घालतो. हजारो वर्षांपासून चालत आलेल्या मूर्तीपूजा, कर्मकांड यावर प्रहार करताना कबीर म्हणतो,

पाहन पूजे हरि मिलै तो मै पूजू पहार।

ताते यह चाकि भली पीस खाय संसार।।

पाषाणाची (दगडाची) पूजा केल्याने ईश्वरप्राप्ती होते हे खरं असेल तर मी पहाडाची पूजा करायला तयार आहे, अशा शब्दांत कबीर मूर्तीपूजेची खिल्ली उडवतो. एखाद्या विशिष्ट आकाराच्या दगडाला देवत्व बहाल करून तिथं पूजा किंवा इतर कर्मकांडं करायला कबीराने अनेक दोह्यांतून टोकाचा विरोध केला आहे. त्याचं कारण देव किंवा ईश्वर ही शक्ती प्रत्येक प्राणिमात्राच्या आत वास करून आहे. अंतर्यामी दृष्टी न बाळगता कितीही सुगम्य असले तरीही केलेले बाह्योपचार हे मूर्खपणाचं लक्षण आहे असं कबीराचं स्पष्ट मत आहे.

यात आणखी एक सुक्ष्म विचार अनुस्यूत आहे. समजा एखाद्या दगडाला शेंदूर फासला आणि तो दगड म्हणजे देव आहे असं मान्य केलं तर ईश्वरप्राप्तीची शक्यताच पूर्णपणे नष्ट होते. एखादा शर्ट घ्यायचा असेल तरी आपण चार-पाच दुकानांमध्ये जाऊन पाहतो. वेगवेगळ्या डिझाईन्स, फॅशन्स, रंग, किंमत, गुणवत्ता अशा अनेक गोष्टींचा विचार करतो. कधीकधी मित्राने शिफारस केलेल्या दुकानातही आपल्या आवडीचे कपडे मिळत नाहीत. मग ईश्वरासारख्या इतक्या महत्त्वाच्या गोष्टीबाबत आपण अंधविश्वास का बरं ठेवतो? केवळ वर्षानुवर्षं, पिढ्यानपिढ्या एखादी गोष्ट सुरू आहे म्हणून..?

ईश्वर ही मूलतः खूपच वैयक्तिक गोष्ट आहे आणि ईश्वराची प्राप्ती ही वैयक्तिक घटना. त्यातही ईश्वर या संकल्पनेचे अर्थ व्यक्तिनिहाय वेगळे असू शकतात. विवेकानंद मानवसेवा हीच ईश्वरसेवा म्हणतात, भगवद्गीता कर्म हेच ईश्वर मानते, कुणासाठी प्रयोगशाळेत प्रयोग करत राहणं म्हणजे ईश्वर असेल तर कुणासाठी शब्द हा ईश्वर असू शकतो. त्यामुळे याबाबत मानकांवर अवलंबून राहायला नकोच. इथं अगरबत्ती, हार-फुलं यांचा आग्रह उपयोगी नाहीच. मनातल्या अस्थिरतेची फुलं आणि एकाग्रतेचा सुगंध असला की आत्मरूपाच्या जवळ जाणं होतंच.

मै तो पूजू पहार...मधून कबीर निसर्ग, पर्यावरण रक्षण अशा बाबींकडेही अंगुलीनिर्देश करतो. एकीकडे मूर्तीपूजकांची खिल्ली उडवण्यासाठी हे शब्द वापरले असले तरी दुसरीकडे एखाद्या मंदिरात स्थित देवाच्या दगडी मूर्तीपेक्षा पृथ्वी-आभाळाच्या विशाल मंदिरातले डोंगर-झाडं-वेली या नैसर्गिक मूर्ती खऱ्या अर्थाने पूजनीय आहेत, असंच कबीर सुचवतोय.

या दोह्याच्या पुढच्या अर्ध्या भागात कबीर जे सांगतोय तो या सगळ्यावरचा उपाय आहे. ‘ताते यह चाकि भली पीस खाय संसार।’ एखाद्या दगडाला देवपण देण्यापेक्षा घरात दळण दळण्याचं जे जातं आहे, ते या दगडाच्या देवापेक्षा जास्त चांगलं आहे, असं कबीर सांगतोय.

शेती, श्रम आणि स्त्रिया या तिन्हीची प्रतिष्ठा कबीर इथं अधोरेखित करतोय. जातं म्हणजे धान्य नि धान्य म्हणजे शेती आलीच. शेतकऱ्याच्या श्रमाशिवाय आणि स्त्रीच्या त्यागाशिवाय भाकर कोणाच्याही पोटात जात नाही. आपल्या घरातली स्त्री, श्रमिक आणि शेतकरी हे देवापेक्षा निश्चित कमी नाहीत. त्यांच्यात देवत्वाची जाणीव झाली तर जगातले शेकडो प्रश्न सुटू शकतात.

मूरत धरी धंधा रचा, पाहन का जगदीश।

मोल लिये बोलै नाही, खेटा बीसबाईस।

हा याच रचनेतला आणखी एक दोहा. यातही मूर्तीच्या नावानं धंदा सुरू असल्याचं कबीर सांगतो. दगडाचा हा देव पैसे (दक्षिणा) घेतल्यावरही काहीच बोलत नाही आणि अनेकदा खेट्या घालूनही काही हाती लागत नाही. पण तरीही धर्माच्या नावाखाली दिशाभूल करणाऱ्यांचा आणि करून घेणाऱ्यांचा हा खेळ सुरूच आहे.

रूझवेल्टने म्हटलंय ‘In free countries everyone has the right to express his opinion; but at the same time, every other person is entitled not to listen.’ लोकशाही देशांमध्ये प्रत्येकाला आपलं मत मांडण्याचा अधिकार आहे. पण त्याचवेळी इतर सर्वांना ते मत न ऐकण्याचाही अधिकार आहे. या न ऐकण्याच्या अधिकाराचा वापर होतच नाही, हे वास्तव आहे. कबीराने मात्र तो अधिकार वापरला आणि प्रत्येकाने तो वापरावा, असा आग्रहही धरला. कारण कोणत्याही कल्पनेची चिकित्सा त्या कल्पनेचं सर्वांत शुद्ध-सात्विक-हितकारक रूप साकारत असते. आपण धर्म-देव-मोक्ष अशा कल्पनांची चिकित्सा न करता रूढी-परंपरांचे अंध वाहक बनतो, हे कबीराला अजिबात मान्य नाही.

एक वाटसरू एका गावाहून दुसऱ्या गावाला जात होता. या दोन गावांच्या दरम्यान डोंगर आणि जंगल होतं. खूप वेळ चालून चालून वाटसरू दमला होता. त्याला खूप तहान लागली होती आणि जीव कासावीस झाला होता. जंगल संपलं नि त्याला एक घर दिसलं. तो लगबगीने त्या घरापर्यंत पोहोचला आणि त्याने पाणी मागितलं. घरातून घंटी वाजवल्याचा आवाज येत होता. वाटसरूने पाणी मागितलं तसं आतून एका पुरूषाचा आवाज आला, ‘पाणी मिळेल पण पूजा सुरू आहे. थोडा वेळ थांबा.’ वाट बघण्याशिवाय वाटसरूकडं दुसरा पर्यायही नव्हता. तो थांबला. पाच मिनिटांनंतर त्याने पुन्हा पाणी मागितलं. तो आतून आवाज आला, ‘आता एका देवाची पूजा संपलीये, अजून सहा-सात देवांची पूजा राहिलीये. तोवर थांबा.’

अंगणात एक पहार पडली होती. वेळ घालवावा म्हणून वाटसरू पहार घेऊन जमिनीत खड्डा खणू लागला. एका देवाची पूजा झाली की घंटीचा आवाज थोडा वेळ बंद व्हायचा. त्याचा अंदाज घेऊन वाटसरूने एका देवासाठी एक असे पाच-सहा खड्डे खणले. बऱ्याच वेळाने घरातून एक पुरूष तांब्याभर पाणी घेऊन बाहेर आला. वाटसरूने ढसाढसा ते पाणी प्यायलं.

‘हे खड्डे कोणी खणले?’, यजमानाने विचारलं.

‘मी’, वाटसरू.

यजमान म्हणाला, ‘इतके खड्डे खणण्यापेक्षा एकाच जागी खड्डा खणला असता तर इथंच पाणी लागलं असतं.’

वाटसरू म्हणाला, ‘आपणही एकाच देवाची पूजा केली असती तर आतापर्यंत ईश्वरप्राप्ती झाली असती.’ आता पूजा दगडाची करायची की पहाडाची की आत्मरूपाची हे तुम्हीच ठरवा.

bhalchandrasauthor@gmail.com

बातम्या आणखी आहेत...