आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

ढाई आखर प्रेम का...:प्रेम ना बारी उपजै, प्रेम ना हाट बिकाय।

डॉ. भालचंद्र सुपेकर16 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

अभिव्यक्तीच्या तऱ्हा बदलल्या असल्या तरी प्रेम हजारो वर्षांपासून अस्तित्त्वात आहे, अनेक प्रेमजोड्याही प्रसिद्ध आहेत. पण खऱ्या प्रेमाचं मूळ दिखावा, शारिरीक सौंदर्य यात नाही. ते नेमकं कुठं, कसं आहे याबद्दल कबीर खूप व्यापकतेनं नि गहिरेपणानं सांगतो...

पोथी पढि पढि जग मुआ, पंडित भया न कोय।

ढाई आखर प्रेम के पढे सो पंडित होय।

हा कबीराचा प्रसिद्ध दोहा. नुसती पुस्तकं वाचल्यानं ज्ञान मिळत नाही, प्रेमाचं आकलन होत नाही आणि ईश्वरप्राप्ती तर नाहीच नाही. जे वाचलं त्यावर चिंतन-मनन आणि कृती केली तर त्यातून काही मिळू शकतं, असं कबीराचं सूत्र. पण तरीही लोकं पुस्तकांना, म्हणजे भौतिक गोष्टी, दिखाव्याला महत्त्व देतात. पोहण्याची पुस्तकं वाचून जसं पोहायला येत नाही. पाण्यात उतरून चार हात मारल्याशिवाय आणि नाका-तोंडात पाणी गेल्याशिवाय चांगलं पोहता येत नाही, तसंच प्रेमाचं आहे. या दोह्यात ‘पढना’ हा शब्द कबीराने दोन अर्थांनी वापरलाय. पहिला अर्थ लिहिलेलं वाचणं आणि दुसरा न लिहिलेलं वाचणं. तर लिहिलेलं वाचून किंवा रटून काही फरक पडणारच नाही ही काळ्या दगडावरची रेघ. पण न लिहिलेलं, दुसऱ्याच्या मनातलं, त्याच्या-तिच्या डोळ्यातलं वाचता आलं तर मग जगण्यासाठी कुठलंच पुस्तक वाचायची गरज नाही. हे जमलं की तुम्ही नुसते पुस्तकी पंडित नाही तर जीवनाचे पंडित बनून जाता. समोरच्याच्या मनातलं नेमकं हेरून त्याला तातडीनं उचित असा प्रतिसाद देत त्याच्याशी संवाद साधणं, याशिवाय जगण्याची कला म्हणजे दुसरे काय? याबद्दलच कबीर खूप गहिरेपणानं या दोह्यातून सांगतोय.

प्रेम हे अपूर्णतेत परिपूर्णतेचं प्रतीक आहे. हे गणित साधंच आहे. दोन अपूर्णांक एकत्र आले की त्यांचा एक पूर्णांक होतोच. फक्त ते समान असले पाहिजेत. कबीराच्या भाषेत सांगायचं तर दोन्हीकडं प्रेमाची चाड तितकीच तीव्र असली पाहिजे. अर्धा आणि अर्धा मिळून एक होतो पण अर्धा आणि पाव मिळून पाऊण होतो, तसं.

कबीर कबीर क्या कहे, जा जमुना के तीर।।

एक एक गोपी प्रेम में, बह गये कोटि कबीर।।

या दोह्यात कबीर श्रेष्ठत्वाला प्रतीकात्मक सलाम करतोय. कबीर स्वतःच्या परिपूर्णतेपेक्षा श्रीकृष्णासाठी व्याकूळ झालेल्या गोपींच्या प्रेमाला मोठं मानतो. तो स्वतःच्या प्रेमभावनेला खूपच क्षुल्लक मानतो. एका गोपीच्या प्रेमासमोर माझ्यासारखे कोटी कबीर वाहून जातील, असं म्हणतोय. अर्थात प्रेमात श्रेष्ठ-कनिष्ठ असं काही नसतं. प्रेम सगळीकडं सारखंच. पण गोपी, प्रेमभावना यापेक्षा इथं स्त्रीला महत्त्व देण्याचं प्रयोजन निश्चित दिसतंय. कबीराला प्रेम म्हणजे रुढार्थानं शारिरीक, भौतिक असं काही अपेक्षित नाही हे इथं पुन्हा अधोरेखित करावं लागेल.

प्रेम ना बारी उपजै, प्रेम ना हाट बिकाय।

राजा प्रजा जेहि रुचै, शीश देयी ले जाय।।

प्रेम शेतात उगवत नाही की बाजारात विकत मिळत नाही. त्यासाठी सर्वस्वाचा त्याग करण्याची तयारी असावी लागते. त्यागाची तयारी ही त्यासाठीची अत्यावश्यक गोष्ट आहे. राजा असो की रंक त्याला त्यातून सुटका नाही. तुमच्या मनातला अहंकार, मी पणा, नकारात्मक गोष्टी यांना बाहेर फेकलं नि मेंदू-मनातली जळमटं स्वच्छ केली तरच प्रेम शक्य आहे. ‘शीश’ देण्याची भाषा त्यासाठीच कबीर वापरतो. आणखी एक म्हणजे प्रेम बुद्धीनं केलं जात नाही ती हृदयातून करायची गोष्ट आहे. बुद्धीच्या कसोटीवर चिकित्सा करत बसणारा कधीच प्रेम करू शकत नाही. मेंदू-मनाशी बंड पुकारून असं झोकून देण्यासाठी मग जीव देण्याचीही तयारी ठेवावी लागते.

तत्कालीक नसलेली, हृदयापासून निपजलेली, निखळ भावना हेच प्रेम. प्रेम किती निखळ असावं, याचं उदाहरण या कथेत आहे. एक दार्शनिक गुरू होते. प्रेमयोगावर प्रवचनं करत गावोगाव फिरायचे. अनेक गावांत त्यांचे अनेक शिष्य होते. असंच कुणालाही ते शिष्यत्व देत नसत. परीक्षेतून ते शिष्याची पारख करत. एक तरुणी त्यांच्या प्रवचनानं प्रभावित झाली. तिनं त्यांच्याकडं शिष्य बनवून घेण्यासाठी हट्ट धरला. सुरवातीला दोन-चार दिवस तर त्यांनी तिच्याकडं दुर्लक्ष केलं. त्यानंतर त्यांनी तिला सांगितलं, जेव्हा पूर्णपणे एकटी असशील तेव्हा माझ्या खोलीत ये. एक दिवस ती तरुणी एकांत बघून त्या गुरूंच्या खोलीजवळ गेली आणि तिनं दरवाजावर हळूच टकटक केलं. आतून प्रश्न आला, ‘कोण आलंय.’ तरुणीने उत्तर दिलं, ‘मी आलेय.’ आतून आवाज आला, ‘अजून तू एकटी नाहीयेस. पूर्णपणे एकटी होशील तेव्हा ये.’ त्या तरुणीनं त्यानंतर अनेकवेळा प्रयत्न केला पण तिला प्रत्येकवेळी हेच उत्तर मिळालं. नेमकं काय करावं हे तिला काही सुचेना. अखेर एक दिवस तिनं प्रवचन संपल्यावर हॉलमध्ये त्या गुरूला गाठलं नि त्याबद्दल विचारलं. तेव्हा त्या गुरूंनी सांगितलं की, मी जेव्हा जेव्हा तुला विचारलं की, कोण आलंय?, तेव्हा तेव्हा तू मला ‘मी आलेय,’ असं उत्तर दिलंस. हा ‘मी’ जेव्हा तुझी साथ सोडेल तेव्हा तू पूर्णपणे एकटी होशील. तसा परिपूर्ण एकांत निर्माण झाल्याशिवाय तू आध्यात्माच्या, प्रेमयोगाच्या मार्गात पुढं जाऊ शकणार नाहीस. गुरूंनी हे सविस्तर सांगितल्यावर त्या तरुणीला एकांताचा खरा अर्थ समजला.

असा एकांत, आपल्यासोबत-आपल्या आत जे जे काही आहे ते सगळं मागं टाकूनच मिळवता येऊ शकतो. तो साधता आला तरच दुसऱ्या कुणाला काही देता येतं आणि त्याच्याकडून काही घेता येतं. प्रेमात असं रितेपण असलं तरच शिरता येतं.

प्रेम पंथ मे पग धरै, देत ना शीश डराय।

सपने मोह ब्यापे नही, ताको जनम नसाय।।

या दोह्यात आणखी एक वेगळा विचार कबीर देतोय. एका जन्मात अनेक स्त्रिया/पुरुषांशी प्रेम करणारे लोक आपण नेहमी पाहतो. प्रत्येकाची आवड वेगळी, हव्यास वेगळा, नशा वेगळी. जोवर हे शारिरीक आहे तोवर ते नशेसारखं अंमल करणार, ती नशा चढणार नि काही वेळानं उतरणारही. पण प्रेमाच्या मार्गावर सगळं झोकून देऊन चालणाऱ्याला स्वप्न पडत नाहीत, आणि पुन्हा पुन्हा तीच गोष्ट करण्याची इच्छाही होत नाही. आंबा हे तुमचं आवडतं फळ असेल तर किती आंबे खाल्ल्यावर तुमची आंबे खाण्याची इच्छा तृप्त होईल? या प्रश्नाला जसं उत्तर नाही तसंच भौतिक प्रेमाचं आहे. पण खऱ्या प्रेमाचा रस जेव्हा चाखायला मिळतो चाखणाऱ्यात एक अभूतपूर्व, अनाहत पूर्णत्व भरून राहतं... कायमचं.

bhalchandrasauthor@gmail.com

बातम्या आणखी आहेत...