आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Opinion
  • Dr Bharati Gore Madhurima Special Article Baat Purani, Divya Marathi Special | Madhurima Baat Purani Article In Marathi, Divya Marathi 

मधुरिमा स्पेशल:बात पुरानी... फिर भी नई सी

6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

तथाकथित संवेदनशील म्हणवणाऱ्या लेखक-विचारवंत, समाजसुधारकांच्या मनातील कप्प्यात दडून बसलेला स्त्री-विरोध अचानक, त्यांच्याही नकळत उफाळून येतो आणि वरवर साध्या भासणाऱ्या वाक्या-प्रसंगातील घोर स्त्री-विरोध हिमनगाचं फक्त टोक असल्याचं जाणवतं.

“नि: संतान माणसा, कुठं फेडशील रे ही पापं? मरताना मुखी पाणी घालायला कुणी नाही आणि एवढी हाव कसली रे तुला ? जगू दे की दुसऱ्याला सुखानं....” शेजारचे उच्चविद्याविभूषित काका संतापाने थरथर कापत होते. कुणावर तरी भयंकर चिडले होते ते. चिडण्याचं कारण तसं रास्तच होतं म्हणा, पण या संतापाच्या भरात सरस्वती नांदणाऱ्या जिभेवर शिव्यांचं तांडव सुरू झालं होतं. त्यातील “नि:संतान’ शब्द ऐकून काकांच्या रागाची मजा घेणाऱ्या कुणीतरी पुटपुटत चुकीची दुरुस्ती केली - “अहो, ज्यांना शिव्या घालताय ते नि:संतान नाहीत. एक मुलगी आहे त्यांना..’

“असू दे की... मुलगा कुठाय? त्याच्या चितेला अग्नी देणारा कुणी नाही आणि हा...’ वैचारिकदृष्टया बऱ्याचदा काकांशी सहमत असलेली मी त्यांच्या या उद्गाराने अक्षरशः स्तब्ध झाले. बाकी मुद्दा काहीही असो, पण मुलगी असणं म्हणजे नि:संतान असणं, हा जो काही रोख होता तो काळीज चिरून गेला. खूप शिळ्या असलेल्या मुलगा-मुलगी भेदावर पुन्हा नव्याने काय बोलावं, किती आणि कितीदा बोलावं? तरीही काही आयाबायांशी बोलले. या मुद्द्यावर पुरुषांशी बोलण्याची हिंमत आणि इच्छा नव्हतीच. वाटलं, पुरुषांशी बोलण्याची वेळ अजून खूप दूर आहे. आधी बायकांच्या मनातील या भेदाची रेषा कितपत पुसट झालीये, ते तरी पाहू.. आणि धक्काच बसला. त्यांतील कुणीही ठसठशीतपणे मुलीच्या जन्माच्या विरुद्ध वगैरे नव्हती. पण मुलगा हवा, हा आग्रह मात्र होताच होता... कदाचित याच आग्रहापोटी दर काही दिवसा-महिन्यांनी कुठल्या कुठल्या गावाच्या दवाखान्याजवळ पुरलेले कोवळे सांगाडे सापडत असतील. हे केवळ हरियाणा, पंजाब, यूपी, बिहारातील चित्र नाही. याला महाराष्ट्रासारखे प्रगत राज्यही अपवाद नाही.

गर्भात वाढणारा अंकुर मुलगा नाही, हे कळताच त्याला खुडून मोकळे होणारे सर्वच लोक काही अडाणी-अशिक्षित नसतात. अशा कैक लाख कळ्या खुडल्या जाण्याची सामाजिक-सांस्कृतिक-आर्थिक- धार्मिक कारणं चिक्कार आहेत. काळाबरोबर ती कारणं बळकट होताना दिसताहेत. मुलगा म्हणजे म्हातारपणाची काठी, मुलाने अग्नी दिला तरच मोक्ष मिळतो, मुलगाच घराण्याचं नाव आणि वंश पुढे चालवतो, शिवाय मुलीला द्यावा लागणारा हुंडा, काळानुरूप मुलीला धड अडाणी ठेवता येत नाही आणि शिक्षण द्यावं तर ती “डेड इन्व्हेस्टमेंट’ वगैरे वगैरे जुनी-पुराणी कारणं तर आहेतच. हल्ली त्यात काही नवी कारणं जोडली जात आहेत. मुलीला “सांभाळणं’ (?), तिची “सुरक्षा’ आदी बाबींचा विचार करता, यापेक्षा “नकोच ती मुलीची ब्याद’ या निष्कर्षावर येणाऱ्यांची संख्या वाढतेय. शिवाय आजकाल नवरा-बायको दोघेही ‘करिअर ओरिएंटेड’. अशात एकच मूल परवडते आणि मग ते एकुलते एक मूल मुलगाच असावे अशी तीव्र इच्छा मनात दाटून असते. याला आपली मानसिकता, आपला दृष्टिकोन बदलणं हा जालीम उपाय आहे, असं म्हणतात. जोडीला स्त्री सक्षमीकरणाच्या दृष्टीने आवश्यक सर्वांगीण प्रयत्न म्हणून शासन-प्रशासन-पोलिस यांचे धोरण, कायदे, आरक्षण असे काहीबाही उपायही चर्चिले जातात.

स्त्रियांच्या आर्थिक स्वावलंबनामुळे चित्र बदलेल अशी अपेक्षा केली जाते. या गोष्टीमुळे झालेला बदल नाकारता नक्कीच येणार नाही, पण तो खरंच अगदी किरकोळ आहे. मग अामूलाग्र बदल कधी, कसा, केव्हा घडेल? हे खरंच एवढं सोपं आहे का? माझ्या जन्माच्या वेळी माझ्या घरातील वातावरण कसं असेल, कशा प्रतिक्रिया उमटल्या असतील, याचं आक्राळविक्राळ चित्र दिसू लागतं.

सतत जाणवत राहतं की भाषणातून कुणी कितीही गमजा मारू देत, पण आपली मानसिकता बदलण्यासाठी आणखी किती शतकं (दशकं म्हणत नाहीये मी) वाट पाहावी लागेल, कोण जाणे? कारण या मानसिकतेचा आणि डिग्र्यांच्या भेंडोळ्याचा अर्थाअर्थी काहीही संबंध नाही. आमच्याकड़े सुरेंद्र वर्मांसारखा तगडा लेखक स्त्री समर्थनार्थ लेखणी चालवतो म्हणून केवढा गाजावाजा होतो. “मुझे चाँद चाहिए’ ची सक्षम आणि बोल्ड (या “बोल्ड’ प्रकरणावर मी पुढे वाचकांशी संवाद साधणारच आहे) नायिका वर्षा वशिष्ट चित्रपटसृष्टीत संघर्ष करून स्थान मिळवते, पुढे प्रेमप्रकरणातून अविवाहित मातृत्व स्वीकारते तेव्हा सुरेंद्र वर्माच्या धाडसी लेखणीची किती चर्चा होते. पण मेलेल्या प्रियकराचं म्हणजे हर्षचं मूल का जन्माला घालायचं, त्यासाठी कुमारी माता म्हणून लांछन का स्वीकारायचं, याचं उत्तर देताना वर्षा म्हणते की तिला तिच्या प्रियकराचा “वंश चालवायचा आहे’...

आणि कमाल पाहा, नायिकेला मुलगाच होतो... प्रियकराचा वंश अबाधित राहतो. हुश्शsssचुकून पोरगी-बिरगी झाल्याचं दाखवलं असतं सुरेंद्र वर्मांनी तर बुडाला असता की हो प्रियकराचा वंश! पण हे महापाप या लेखकाने नाही केलं. स्त्री सक्षमीकरणाचे ढोलताशे पिटणाऱ्या अशा हजारो साहित्यकृती आहेत. खरंच उच्च शिक्षण, उदार विचारधारा, संवेदनशीलता नेमकं काय असावं आपल्यात म्हणजे आपला दृष्टिकोन बदलेल हो? समुपदेशन, उपक्रम, चळवळी... काय अन् कित्ती. मात्र सगळे फोल. कुचकामी. समुपदेशकाची पाठ फिरली की त्याची कशी टाळ्या देऊन टर उडवली जाते, हे मी अनुभवलंय. मग पुन्हा तोच प्रश्न - कशानं बदलू आपण? आपली मानसिकता? शिक्षण, आधुनिकता आणि शहाणपण यांचा परस्परांशी काडीचाही संबंध नाही, हे तर कैकदा सिद्ध झालं आहे. मग उपाय काय?

मला माझी आई आशेचा किरण वाटते. डोईवरून पदर घेणारी, जेमतेम दहावी शिकलेली, आयुष्याच्या पूर्वार्धात हातचे पुस्तक सोडून शेतात राब-राब राबलेली माझी माँ कौटुंबिक खेळीमेळीच्या गप्पांमध्ये अचानक जेव्हा मला सांगते की, “माझे अंतिम संस्कार तूच करायचे बरं... मी तसं लिहून ठेवलं आहे..’ मीही हसतच बोलते - “भारीच आहेस की.. मी का ? तुला तर मुलगा आहे न..” अत्यंत ठाम सहजपणे माँ उत्तर देते - “थोरले मूल करते न म्हणे हे संस्कार... माझ्या दोन मुलांपैकी तू थोरली, मग तूच माझ्या चितेला अग्नी देणार’ मी अवाक्.

जगभरात स्त्रीद्वेष अधिकाधिक टोकदार होत असताना माझ्या माँने ही खरी आणि आतून आलेली आधुनिकता कुठून मिळवली? आता ही आधुनिकता शिकण्यासाठी मी कोणत्या विद्यापीठात जाऊ? आणि जगात हे शिकवणारी विद्यापीठं निर्माण करण्यासाठी काय करावं लागेल?

स्त्री सक्षमीकरणाचे ढोलताशे पिटणाऱ्या हजारो साहित्यकृती आहेत. उच्च शिक्षण, उदार विचारधारा, संवेदनशीलता... नेमकं काय असावं आपल्यात म्हणजे आपला दृष्टिकोन बदलेल हो? समुपदेशन, उपक्रम, चळवळी. काय अन् किती? पण, सगळे फोल. कुचकामी.

डॉ. भारती गोरे, फोर्थ डायमेन्शन
{संपर्क : drbharatigore@gmail.com

बातम्या आणखी आहेत...