आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ग्रंथार्थ:टपालकी-पत्रापत्रात हास्याची हमी देणारे टपाल !

6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

सॅबी परेरा ह्या नव्या व अतिशय उमद्या लेखकाचे "टपालकी' हे पुस्तक नुकतेच प्रसिद्ध झाले आहे. रसाळ निवेदनशैली,रूढी व परंपरांचा अचूक वापर, ओघवती विषय मांडणी ह्या साऱ्या बाबींचा चपखलपणे केलेला वापर नकळतपणे त्यांच्या लिखाणाला श्रेष्ठ विनोदी लेखकांच्या परंपरेत स्थान देणारा आहे.

सॅबी परेरा ह्या नव्या व अतिशय उमद्या लेखकाचे टपालकी हे पुस्तक नुकतेच प्रसिद्ध झाले आहे. दोन खट्याळ मित्रांमधील पत्रव्यवहार असा हा लेखनप्रपंच आहे. दादू आणि सदू हे दोन मित्र.दादू गावाकडे राहतो तर सदू मुंबईत. ह्या दोघांतील पत्रव्यवहार म्हणजे टपालकी. ह्या टपालकीची खरी नजाकत अतिशय अदृश्य आहे. ह्यातील सर्व पत्रे सदूने दादूला पत्रोत्तर म्हणून लिहिली असून, अश्या प्रत्येक पत्रात दादूचे जे कोणते पत्र सदूला आलेले असावे, त्या पत्रानुसार सदूची उत्तररूपी धमाल पत्रे टपालकीत आहेत. परक्याची पत्रे वाचण्याचे कुतूहल प्रत्येकाला असते. अश्या वाचनातून कुजबुज करता येते. अफवा सोडता येतात.भाष्य करता येते. नेमका हा धागा सॅबी परेरांना अचूक माहिती असावा म्हणूनच त्यांनी ह्या लेखनप्रकारातून आपला विनोद सहजपणे फुलवलेला आहे.

टपालकीतील ही सारी पत्रे पूर्वी सदर रुपात प्रसिद्ध होऊन गेली आहेत. सदर लेखन हा अतिशय अवघड लेखनप्रकार असून त्यातले लिखाण सहसा प्रासंगिक ठेऊन विनोद फुलवावा लागतो. प्रासंगिक लिखाण हे कधीही कालबाह्य होऊ शकते. परेरांना ह्याचे गांभीर्य उपजत असावे. प्रासंगिक घटनांचा उपयोग करून त्यांनी ते संदर्भ कालबाह्य होऊ शकतील ह्याचे भान ठेवून व असे संदर्भ फक्त निमित्त हे आकलून,आपला विनोद खुलवत नेला आहे. त्यांची लेखनशैली अतिशय प्रवाही असून उपरोध,उपहास,मिश्किलता ह्या अस्त्रांचा वापर करीत वाचकांच्या मनावर गारुड करण्यात यशस्वी झाली आहे. सोशल मीडियामुळे त्यांचा विनोद सर्वमान्य झाला ही प्रांजळ कबुली त्यांनी आपल्या मनोगतात देऊन भाषेच्या अभिसरणाला आता ह्या माध्यमाला दुर्लक्षित करता येणार नाही ह्याचा स्पष्ट इशारा त्यांनी आपल्या ह्या पुस्तकातून स्पष्टपणे दिला आहे .

परेरांनी आपली टपालकी जवळपास एकतीस पत्ररूपी लेखांतून वाचकांपर्यंत पोंचवली आहे. ह्यातील प्रत्येक लेखाचे (अर्थात पत्राचे) शिर्षक औत्सुक्य निर्माण करणारे आहे. सोशल शेअर मार्केट,तोंडाच्या वाफेवर चालणारा देश, बाकी सब फसक्लास है,लेझीस्तान झालाच पाहिजे अशी शीर्षके वाचकांना आधी स्मित हास्य फुलवण्यात यशस्वी झाली असून नंतर पुढे त्यातील मजकूर वाचताना गदगदून हसायला कारणीभूत ठरलीआहेत. टपालकीतील प्रत्येक लेख म्हणजे उत्कृष्ट विनोदाचा सहज अविष्कार असून परिचय म्हणून मुंबईच्या लोकल प्रवासाचा आधार घेऊन लिहिलेल्या चौथी सीट ह्या लेखातील एका वाक्यात परेरा म्हणतात की, एक ना अनेक नरक यातना मुंबई लोकलच्या प्रवासात आपल्या वाट्याला येतात. हे सारं काही विनातक्रार सहन केल्याने प्रचंड शारीरिक मानसिक ताण,अपेक्षाभंग आणि मनस्ताप झेलण्याची आपली वाढलेली कुवत संसारात खूप कामाला येते. त्यामुळेच मुंबईच्या लोकलने प्रवास करणाऱ्यांचा संसार यशस्वी होतो असे म्हणतात. 'दादू,तुला खरं सांगू,माझा 'यशस्वी संसार'या अंधश्रद्धेवर विश्वास नसला तरी मुंबईच्या लोकल प्रवाशांचे संसार बऱ्यापैकी टिकतात हे मी माझ्या डोळ्यांनी पाहिलंय. केल्याने पर्यटन ह्या त्यांच्या एका लेखाचा शेवट त्यांनी ज्या वाक्यांनी केलाय, त्यात ते म्हणतात की मराठी भाषेत ह्या परिस्थितीला आणीबाणी म्हणतात, इंग्रजी भाषेत त्याला इमर्जन्सी म्हणतात, विनोबांच्या भाषेत त्याला अनुशासन पर्व म्हणतात,आणि आम्हा नवरोबांच्या भाषेत त्याला व्हेकेशन म्हणतात.

परेरांच्या दोन लेखांच्या विषयांचा संदर्भ न देता आवर्जून ही वाक्ये उल्लेखली आहेत.टपालकीतील प्रत्येक लेख हा विषयानुरूप सूत्रबद्ध विनोद घेऊन अतिशय धमाल गतीने हसवत पूर्णत्वाला जातो. हे लेखकाच्या लिखाणकौशल्याचे यश असून ह्यामागे त्यांचे मिश्किल मन नक्कीच आहे.दैनंदिन व्यवहारातील उथळपणा वाढत जातोय ह्याचे अतिशय गांभीर्य ते राखून आहेत म्हणूनच अलीकडच्या जगण्यातील विसंगतीचा परिपूर्ण शोध ते घेऊ शकले आहेत. समाजजीवनात जे जे उपहासनीय असते त्याची कालानुरूप थट्टामस्करी करणे हे विनोदी लेखकाचे आद्य कर्तव्य मानायला हवे. सामाजिक जीवनात अतिप्रतिष्ठित म्हणून वावरणाऱ्यांची थट्टा करणे हे तर अतिशय धाडसाचे काम! ह्या कामात सॅबी परेरांनी आपल्या टपालकीतल्या प्रत्येक पत्रातून अतिशय चोख भूमिका बजावली आहे हे प्रकर्षाने लक्षात येते.आजचे समाजजीवन विशेषज्ञ ,राजकारणी,अतिधनाढ्य,समुपदेशक,अश्या अनेक नव्या जुन्या लबाड मुखवटाधाऱ्यांनी व्यापलेले असून त्यांच्याच हाती सामाजिक प्रगतीच्या दोऱ्या आहेत. ह्या आणि अश्या मंडळीतील लबाडांची नेमकी थट्टा करण्याचे धाडस परेरांनी केले आहे. दिवस बहिऱ्यांचे आहेत, ह्या लेखात त्यांनी ज्या धाडसाने कैकांचा मुखवटा फाडला आहे ते वाचून अवाक व्हायला होते.सभोवताली दाटलेल्या विसंगतीचा बुरखा उतरवताना प्रत्येक वेळी ते भाषेचा नेटका वापर करत हसवत राहतात आणि त्याचवेळी अंतर्मुख करून जातात.ह्यासाठी उदाहरण म्हणून मिशन टंगळमंगळ, ह्या लेखाचा दाखला देण्याचा मोह आवरता येत नाही.

मराठी भाषेवर प्रभुत्व असणारा हा लेखक आपल्या पहिल्याच पुस्तकातून अनोखा असा बाज ठेवून त्यात मिश्किल,तिरकस आणि भाबडेपणाची खुमारी पेरत आपले लिखाण घेऊन आलाय हे खूप चांगले घडले आहे. त्यांच्या विनोदाला विषयवैविध्याची झळाळी लाभलीय हेही वैशिष्ट्य आवर्जून नमूद करता येते. आपल्या टपालकीची सुरुवात करताना त्यांनी मनोगतातून त्यांच्या विनोदामागील गंभीर चिंतनशील स्वभावाची ओळख अप्रत्यक्षपणे देऊन टाकली आहे. ही ओळख म्हणजे बौद्धिक विनोदाचा वस्तुपाठ आहे. स्वतःचा विनोद दुसऱ्याने स्वतःच्या नावावर प्रसिद्ध करून घेण्याचा योगही त्यांनी प्राप्त करून घेतला आहे.हा अनुभव एकीकडे तर दुसरीकडे सुप्रसिद्ध कवी सौमित्र ह्यांची प्रस्तावना परेरांच्या टपालकीला लाभली असून त्यांनीही मनमोकळेपणाने त्यांना आनंद दिलेल्या विनोदावर यथोचित भाष्य केलेले आहे. स्वतःवर केलेला विनोद हा सर्वश्रेष्ठ विनोद असतो. जगाची निर्व्याज चेष्टा करताना परेरांनी स्वतःचीही यथेच्छ थट्टा केली आहे. जिम नास्तिक,आनंदी आनन गडे, बालपण नको रे बाप्पा,अश्या लेखात त्यांनी भाष्यकार बनून स्वतःचीच जी टर उडवली आहे त्याला तोड नाही.काहीवेळेस स्वतःच्या फजितीचे वर्णन करताना त्यांनी कल्पनाविष्काराचा व अतिशयोक्तीचा सम गाठला आहे.

रसाळ निवेदनशैली,रूढी व परंपरांचा अचूक वापर, ओघवती विषय मांडणी ह्या साऱ्या बाबींचा चपखलपणे केलेला वापर नकळतपणे त्यांच्या लिखाणाला श्रेष्ठ विनोदी लेखकांच्या परंपरेत स्थान देणारा असून त्यांचे हे लिखाण सदर रूपातून जरी पूर्वप्रसिद्ध झालेले असले तरी सर्वकालीन टिकणारे आहे ह्याची खात्री देता येते. एखादा लेखक जेव्हा एखाद्या नियतकालिकात सदर लिहितो तेव्हा ते लेखन त्या नियतकालीकांच्या वाचकांव्यतिरिक्त इतर वाचकांना वाचायला मिळणे अवघड असते.असे लिखाण जेव्हा पुस्तकरूपात येते तेव्हा मात्र अश्या लिखाणाला अनेक नवे वाचक मिळून जातात. परेरांचे हे पहिले पुस्तक आता उत्तम कसदार साहित्याची क्षुधा असलेल्या वाचकांसमोर सहजपणे उपलब्ध झाले आहे.मराठी वाङमयात आवर्जून नोंद घ्यावा अश्या ताकदीचा हा विनोद असल्याने "वाचाल तर नक्कीच हसाल" हे खात्रीपूर्वक म्हणता येते. टपालकीतून विनोदाची स्वारी हसवण्यासाठी दारी येतेय ही सोपी कल्पना देणारे निलेश जाधव ह्यांचे मुखपृष्ठही पुस्तक हाती घेताच मन प्रसन्न करून जाते. परेरांचे पहिलेच पुस्तक मराठी विनोदात आपले वैशिष्ठयपूर्ण स्थान प्राप्त करेल ह्यात शंकाच नाही.

टपालकी
लेखक:-सॅबी परेरा
मुखपृष्ठ:-नीलेश जाधव
प्रकाशक :-ग्रंथाली प्रकाशन,मुंबई
मूल्य:-२५० रुपये

डॉ. रवींद्र तांबोळी
ravindra.tamboli@gmail.com

बातम्या आणखी आहेत...