आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गोष्ट सांगतो ऐका...:डस्टबिन

छत्रपती संभाजीनगर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

डस्टबिनसाठी प्रतीक एवढा आग्रही असू शकतो, हे मायराला पटणारं नव्हतं. खरं तर प्रतीक आपल्या एखाद्या निर्णयाला विरोध करू शकतो, हेच तिच्या कधी मनात आलं नाही. दिवसभर तिची चिडचिड होत होती. ऑफिसच्या कामात मन लागत नव्हतं. सारखं फोनकडे लक्ष जात होतं. तिला वाटत होतं की, प्रतीक मेसेज करेल, सॉरी म्हणेल. मला पण घरात डस्टबिन नको, म्हणून सांगेल. पण, असं काही घडत नव्हतं.

मा यरा आयटी सेक्टरमध्ये चांगल्या पदावर आहे. प्रतीक बँकेत मॅनेजर आहे. दोघंही एकाच क्लबमध्ये जात होते. तिथेच भेट झाली. मग एकाच क्लबमध्ये आणि एकाच पबमध्ये जायला लागले. ट्रॅफिकवर सुरू झालेल्या गप्पा वळण घेत घेत लग्नापर्यंत आल्या. दोघांचंही एकमेकांवर प्रेम आहे. एका भारी एरियात दोघांनी फ्लॅट पण बघून ठेवलाय. मायराला आधीपासून इंटेरिअरची आवड असल्याने घरात कुठल्या जागी कुठली वस्तू हवी, हे तिने ठरवून ठेवलं होतं. दिवसातून दहा वेळा तरी ती प्रतीकला वेगवेगळे फोटो पाठवायची. कधी रंग, कधी सोफा, कधी कप, कधी शेल्फ. प्रतीकला ते आवडत होतं. छोट्या तालुक्यातला आणि अतिशय मध्यमवर्गीय घरातला असल्याने त्याने घराचं स्वप्न एवढं बारकाईने पाहिलं नव्हतं. चार भिंती आणि छप्पर एवढी माफक अपेक्षा होती त्याची. मायरा ज्या रंगांची नावं सांगत होती, ते त्याने आयुष्यात पहिल्यांदा ऐकले होते. किचनमध्ये पण चिमणी असते, हे त्याला पुण्यात आल्यावर कळलं होतं. या सगळ्या गोष्टीचं त्याला हसूच यायचं आधी. पण, हे सगळं त्याला आवडत होतं, कारण हे मायरा ठरवत होती. दोघं मिळून एक सुंदर चित्र रंगवत होते घराचं. खरं तर रंग मायराचे होते. प्रतीक प्रेक्षक होता. मायरा जे म्हणेल त्याला होकार देणे एवढंच करत होता. आणि त्यात अडचण काही नव्हती. कारण मायरा हे सगळं खूप मन लावून करत होती. तासन‌्तास गुगलवर सर्च करून एक-एक वस्तू शोधत होती. प्रतीक एवढा वेळ देऊ शकत नव्हता. दिला असता तरी त्याला एवढ्या भारी गोष्टी शोधता आल्या नसत्या. म्हणून ती सगळी जबाबदारी मायरावर सोपवली होती त्याने. पण, आज दिवस वेगळाच उगवला...

मायरा आणि प्रतीकचे पहिल्यांदा मतभेद झाले. विषय सहज निघाला. डस्टबिनचा. मायरा म्हणाली, मला घरात डस्टबिन नको. प्रतीकला काही लक्षात आलं नाही. नको तर नको, असं म्हणाला असता. पण, त्याला उत्सुकता होती की, घरात डस्टबिन नसेल तर त्याला पर्याय काय? मायराकडे पर्याय काहीच नव्हता. तिचं म्हणणं होतं की, नवीन घरात डस्टबिन नको. प्रतीकला आधी हसू आलं. त्याला माहिती होतं, मायराला स्वच्छतेचं अतिरेकी वेड आहे. सतत हातावर सॅनिटायझर घेऊन हात स्वच्छ करणे, कायम वेट टिश्यू वापरणे अशा गोष्टी तो बघतच होता. पण, गोष्ट या थराला जाईल, याचा विचार त्याच्या डोक्यात आला नव्हता. आधी त्याला मायरा विनोद करतेय, असं वाटलं. पण मायरा तिच्या मतावर ठाम होती. प्रतीकने हसून विषय टाळायचा प्रयत्न केला. नंतर बोलू, असं म्हणाला. पण, मायरा ऐकायला तयार नव्हती. खूप वेळ ती तेवढ्याच विषयावर बोलत राहिली. ती एवढ्या आग्रहाने आणि गंभीरपणे बोलत होती की, प्रतीकला तिला विरोध करायची इच्छा झाली नाही. तो शांत राहिला. मायरा म्हणाली होती की, तुला माझं म्हणणं पटत नसेल, तर लग्न करण्यात काही अर्थ नाही. प्रतीक मग फार काही न बोलता घरी निघून गेला.

डस्टबिनसाठी प्रतीक एवढा आग्रही असू शकतो, हे मायराला पटणारं नव्हतं. खरं तर प्रतीक आपल्या एखाद्या निर्णयाला विरोध करू शकतो, हेच तिच्या कधी मनात आलं नाही. दिवसभर तिची चिडचिड होत होती. ऑफिसच्या कामात मन लागत नव्हतं. सारखं फोनकडे लक्ष जात होतं. तिला वाटत होतं की, प्रतीक मेसेज करेल, सॉरी म्हणेल. मला पण घरात डस्टबिन नको, म्हणून सांगेल. पण, असं काही घडत नव्हतं. लंच ब्रेक संपला, तरी प्रतीकने फोन केला नव्हता. दोघांची ओळख होऊन आठ महिने झाले होते; पण असा एकही दिवस गेला नाही की प्रतीकने मायराला सकाळी सकाळी फोन केला नाही. दिवसात पाच-सात वेळा फोनवर बोलणं व्हायचं. कितीही बिझी असला, तरी प्रतीक तिचा फोन उचलायचा. फोन करायचा. पण, आज प्रतीकने फोनच केला नाही. मायरा पण माघार घ्यायला तयार नव्हती. खरं तर दोघही सारखा सारखा फोन बघत होते. दोघांनाही मेसेज येईल, असं वाटत होतं, पण तसं घडत मात्र नव्हतं. एवढं प्रेमळ नातं तुटायची वेळ यावी, एवढं काय होतं त्या डस्टबिनमध्ये?

डस्टबिन म्हणजे नेहमीचा घरात असणारा कचऱ्याचा डबा नव्हता मायरासाठी. तिच्या मैत्रिणींच्या ग्रुपमध्ये डस्टबिन म्हणजे म्हातारे सासू-सासरे. ते घरात असले म्हणजे डोकेदुखी. घरात गरज म्हणून असतात, पण कधी बाहेर काढू अशी इच्छा होते, अशी वस्तू. या गोष्टीवर त्या तिघी मैत्रिणी कायम विनोद करायच्या. सासू-सासऱ्यांबद्दल थेट न बोलता ‘डस्टबिन’ शब्द वापरायच्या. एक म्हणायची, पाहुणे आले की आमचा डस्टबिन कुठे लपवू असं होतं, नाहीतर आलेल्या माणसाचं डोकं खातात चौकशा करून. दुसरी म्हणायची, आम्ही डस्टबिनला एवढे वैतागलोय की, नेहमी दाराबाहेर राहील याची काळजी घेतो.. खरं तर कुठून तरी ऐकलेला शब्द. सासू-सासऱ्यासाठी एक दोनदा वापरला आणि त्यावर त्या तिघींचे विनोद सुरू झाले. मुलं गमतीगमतीत बापाचे नाव अमरीश पुरी किंवा डॉन म्हणून सेव्ह करतात, तसं. पण, ही गंमत नव्हती. आपण कुणाला काय बोलतोय, याचं त्यांना भानच राहिलं नाही. सवयच झाली तो शब्द वापरायची. एकमेकींना विचारलं जायचं, तुमच्या घरात किती डस्टबिन आहेत? भान हरवत गेलं. एखाद-दुसरी सोडली तर बायकांना अशा प्रश्नांचा राग यायचा. पण, मायराला काही वाटायचं नाही. मायरासाठी तोच शब्द होता पालकांसाठी. डस्टबिन. पण, मायरा एवढी कडवट का झाली? कुणाच्या का असेना, आई-बापाला डस्टबिन म्हणण्याएवढी? प्रतीकने या गोष्टीचा शोध घेतला. त्याला मायराच्या मैत्रिणीने खरी गोष्ट सांगितली. २२ वर्षे झाली त्या गोष्टीला. एका मोठ्या सरकारी दवाखान्याच्या डस्टबिनमध्ये एक आठ-दहा दिवसांची मुलगी सापडली होती. आई-बाप सोडून गेले होते तिथे. कोण होते कधीच कळलं नाही. त्या परिसरातल्या लोकांनी मुलीची काळजी घेतली. मग अनाथाश्रमात सोडून आले. मुलीचं नाव मायरा ठेवलं गेलं. मायरा हुशार होती. खूप शिकली. चांगल्या नोकरीला लागली. परदेशात जाऊन आली. जग पाहिलं. पण, डस्टबिन विसरू शकली नाही. आई-बाप मग ते कुणाचेही असले, तरी डस्टबिनच वाटायचे तिला. प्रतीकला वाईट वाटलं. तो मायराला भेटायला गेला. तिने डस्टबिनमधून बाहेर यायला हवं, ती अजून तिथेच आहे मनाने. तिला कळलं पाहिजे की, जग सुंदर आहे. इथं चांगली माणसं आहेत, जी सोडून जात नाहीत, उलट तुमचे अपराध पोटात घेतात. प्रतीकने या गोष्टीचा शोध का घेतला? त्याची आई बेडवर असते. हालचाल करू शकत नाही. लग्न मोडलं हे सांगितल्यावर ती अस्वस्थ झाली. प्रतीकने तिला खरं कारण सांगितलं. मायराच्या मते डस्टबिन म्हणजे काय, हे ऐकून आई संतापली नाही. तिने प्रतीकला कारण शोधायला सांगितलं. एखादी मुलगी असा विचार का करते, ते समजून घ्यायला सांगितलं. म्हणून मायरा आणि प्रतीक पुन्हा एकत्र येऊ शकले. प्रतीकच्या आईच्या रूपात मायराला आयुष्यात पहिल्यांदा आई मिळाली.

अरविंद जगताप jarvindas30@gmail.com