आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Opinion
  • Economy Now Has To Go Along With Ecology | Article By Dr. Anil Prakash Joshi

दृष्टिकोन:इकाॅनाॅमीला आता इकाॅलाॅजीला सोबत घेऊन चालावे लागेल

औरंगाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

आपत्ती आता गंभीर होत आहेत. नैसर्गिक आपत्तीचा सामना करावा लागला नाही असा वर्षातील कोणताही महिना नसेल. अलीकडे मध्य प्रदेश-राजस्थान-गुजरात इ. ठिकाणी झालेली अतिवृष्टी सामान्य नव्हती. ३२ तास सतत पाऊस कोसळल्याने रेड अलर्टची परिस्थिती निर्माण झाली होती. वादळाच्या पाण्याची तीच डीप डिप्रेशन सिस्टिम आता पाकिस्तानात कहर करत आहे. तेथे ११०० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. हिमालयात मान्सूनमुळे झालेला कहर आपल्यासमोर आहे. उत्तराखंड, हिमाचल प्रदेशात अचानक आलेल्या पुरामुळे झालेला विध्वंस सर्व काही ठीक नसल्याचे दर्शवतो. पावसाळा सोडला तर प्रचंड उकाड्याने सारी व्यवस्थाच विस्कळीत होत आहे, एकीकडे आग जंगले भस्मसात करत आहे, तर दुसरीकडे उष्णतेच्या लाटा निर्माण होत आहेत. आपत्ती आणि आपल्या गरजा यांना पुन्हा नव्याने जोडून पाहण्याची वेळ आली आहे, कारण अशा घटनांमध्ये आपण फारसे गांभीर्य दाखवले नाही. आपण देशात आपत्तीच्या वेळी मदत आणि संरक्षण देणारे विभाग निर्माण केले आहेत, परंतु सर्वात मोठी गरज ही आहे की आपण आपत्तींचा अभ्यास करून तीन स्तरांवर काम करावे, जेणेकरून आपण त्यांचा प्रभाव कमी करू शकू. दुसरी गोष्ट म्हणजे आपले आपत्ती व्यवस्थापन कसे असावे आणि तिसरे म्हणजे आपण जनजागृती मोहिमांतर्गत आपत्तीची कारणे सर्वांना सांगितली पाहिजेत. आता बघा, उत्तर भारत असो की दक्षिण, तिथली राज्ये कोणत्या ना कोणत्या स्वरूपात आपत्तींना बळी पडतात. गेल्या दोन दशकांपासून उत्तर भारतात सतत अतिवृष्टी ही एक मोठी समस्या झाली आहे, तर हिवाळ्यात केरळ आणि तामिळनाडूचे पूर काय सूचित करतात? याचे कारण म्हणजे आपण संपूर्ण परिसंस्था पूर्णपणे अस्थिर केली आहे आणि यामागे आपली विकासाची अपूर्ण समज आहे. आज आपण आपली व्यवस्था समजून घेणे आणि आपल्या विकासाची शैली ठरवणे अत्यंत आवश्यक झाले आहे. कारण आपले विकासाचे दावेही अचानक या आपत्तींना बळी पडतात.

अर्थव्यवस्था आणि पर्यावरणाला एकत्र जोडून भविष्यासाठी आराखडा तयार करण्याची वेळ आली आहे. हे जाणून घेणेदेखील महत्त्वाचे आहे की, जगातील सर्वात महत्त्वाची परिसंस्था कोणती आहे? जगातील २७ टक्के जमीन पर्वतांची आहे आणि केवळ १५ टक्के लोकसंख्या त्यांच्यावर राहते, परंतु ८० टक्के पाण्याच्या गरजा पर्वतांद्वारे भागवल्या जातात. जगभरात आढळणारे पर्वत आपल्या परिसंस्थेचे नियंत्रकसुद्धा आहेत. त्यामुळे आता तयार होणाऱ्या आणि बिघडत चाललेल्या परिस्थितीत आपण कुठे तरी गांभीर्याने विचार केला तर कदाचित आपल्याला पर्वतरांगांतून आपली परिसंस्था सुधारण्याचे मार्ग शोधावे लागतील. कारण हेदेखील स्पष्ट आहे की, दोन सर्वात महत्त्वाच्या गोष्टी इकोसिस्टिममध्ये मोठी भूमिका बजावतात - एकीकडे पर्वत आणि दुसरीकडे समुद्र.

पृथ्वीच्या पृष्ठभागाचा ७० टक्के भाग हा महासागर आणि २७ टक्के भूभाग पर्वतीय आहे. या दोन्हींचे एकमेकांशी खूप जवळचे नाते आहे. पृथ्वीच्या इतिहासाचा शोध घेतला तर आपल्या लक्षात येईल की समुद्रामधूनच पर्वत तयार झाले आहेत आणि हे पर्वतच आर्थिक, सामाजिक आणि पर्यावरणीय बदल घडवून आणल्यानंतर समुद्रातच मिसळतात. त्यामुळे आपण आपत्तींच्या कचाट्यात असतो आणि बदलती परिस्थिती आपल्याला आव्हान देत असते तेव्हा विकास आणि पर्यावरण यांच्या समन्वयाशिवाय आपण फार काळ तग धरू शकत नाही. आंतरराष्ट्रीय बातम्या आपल्यासमोर आहेत. आज जगात महापुराचा फटका बसला नाही असा एकही देश नाही, हे आपण पाहतो. दुसरीकडे, वायू प्रदूषण हाही आंतरराष्ट्रीय स्तरावर महत्त्वाचा मुद्दा झाला आहे. पर्यावरणाचे सर्व आधारस्तंभ आज कमकुवत झाले आहेत. म्हणून हे अशा प्रकारे समजून घेतले पाहिजे की, ज्या साधनांवर जीवन आणि जग टिकून आहे, ते कमकुवत होऊ लागले तर त्यांचा नाश होण्याची वेळ येईल. त्यामुळे पर्यावरणाचे संकट हे आजचे सर्वात मोठे आव्हान म्हणून पाहिले पाहिजे.

१८ व्या शतकात आर्थिक असुरक्षितता हे सर्वात मोठे आव्हान होते, तर आज कदाचित पर्यावरणीय असुरक्षितता हे जगातील सर्वात मोठे आव्हान झाले आहे. (ही लेखकाची वैयक्तिक मते आहेत.) डाॅ. अनिल प्रकाश जोशी पद्मश्रीने सन्मानित पर्यावरणतज्ज्ञ dranilpjoshi@gmail.com

बातम्या आणखी आहेत...