आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘ती’च्या गोष्टी:संपादिका मैत्रीण

औरंगाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

प्रत्येक लेखकाला चांगला संपादक मिळायलाच हवा, तसं जर का झालं, तर लेखक स्वत:च्या क्षमतेपेक्षा दोन टप्पे किंवा कधीकधी तर त्यातूनही जास्त टप्पे वर चढू शकतो, असं माझं मत आहे. किंबहुना मी असं म्हणीन की, पुरुष लेखकाला स्त्री संपादिका मिळायला हवी, त्याच्यासाठी ते फार चांगलं असतं. माझ्या स्वानुभवाच्या भक्कम आधारावर मी हे विधान करतो आहे. कारण माझ्या सर्व कथा-कादंबऱ्यांचं तसंच बहुतांश भाषांतराचं संपादन स्त्री संपादकांनी केलेलं आहे आणि त्याचा मला फार आनंद वाटतो. कारण अनेकदा या संपादिका मैत्रिणींनी केलेल्या सूचना किंवा सुचवलेले बदल यामुळे मी माझ्या ‘पुरुषी कम्फर्ट झोन’मधून बाहेर येण्यास उद्युक्त झालो आहे. याचं ताजं उदाहरण द्यायचं तर माझी नुकतीच प्रकाशित झालेली कादंबरी ‘चतुर’. या कादंबरीच्या संपादनाचं काम केलं ते अनुजा या माझ्या संपादक मैत्रिणीनं. अनुजा हे एक मोकळढाकळं, खाऊनपिऊन आयुष्य एन्जॉय करणारं व्यक्तिमत्त्व! आर्किओलॉजी विषयातलं औपचारिक शिक्षण घेतलेली अनुजा पुस्तक संपादनासारख्या विषयाकडे वळली ते आवड आणि करून पाहू, या अशा दृष्टिकोनातून. आडवाटेने जाऊन पाहण्याची तिची एकुणातली फिलॉसॉफी पाहता, तिने असं काहीतरी करणं हे अगदी स्वाभाविकच होतं. ती मला पहिल्यांदा भेटली तेव्हा तिचं दडपण आलं होतं माझ्यावर हे स्पष्ट आठवतं. कारण तिचं भारदस्त व्यक्तिमत्त्व. कुरळे-दाटसर केस, मजबूत बांधा, पावणेसहा फुटाच्या आसपास उंची आणि बोलायला बिनधास्त. म्हणजे तिला वाटेल तो प्रश्न ती विचारणार. अर्थात तो विचारताना समोरच्याला ती असं का विचारतेय हे स्पष्ट करणार. लेखक-संपादक यांच्यातलं बाॅडिंग शक्य तितकं मोकळं, पारदर्शक असावं असं तिचं मत. म्हणजे मग लेखकाने काय भूमिकेतून पुस्तक लिहिलं आहे, हे संपादकाला नीट कळतं आणि त्याचबरोबर संपादक लेखकाला काय भूमिकेतून सूचना करतो आहे, हेही लेखकाला स्पष्ट होतं. एकदा ती म्हणाली होती की, लेखकाचा ईगो सांभाळून त्याला आपण केलेल्या सूचनांमुळे पुस्तकात आणखी व्हॅल्यू अॅडिशन कशी होणार आहे, हे सांगणं यात संपादकाचं कौशल्य पणाला लागतं. शेवटी पुस्तक लेखकाचंच असतं, तोच सूचनांनुसार पुन्हा लेखन करणार असतो. त्याचाच हक्क असतो संहितेवर, पण कधीकधी, खास करून मराठीत संपादक लेखकाच्या वरचढ होतो, त्याची गरजच काय असं काहीतरी लेखकांना वाटतं. तारेवरची कसरतच असते ती.

अशाप्रकारे अनुजा पुस्तक संपादनाकडे गंभीररीत्या पाहते. पण तिचा दृष्टिकोन गंभीर असला, तरी ती त्याचं उगाच अवडंबर माजवण्यातली नाही. ती भरपूर बोलते, भरपूर हसते, जे आवडलं ते मोकळेपणाने सांगते आणि नाही पटलं तर त्याबद्दल प्रश्न विचारते आणि का पटलं नाही हेही सांगते. संपादक म्हणजे गंभीर चेहरा करून असलेला, न हसणारा, मोजकं बोलणारा प्राणी या प्रतिमेला तिने तडा दिलेला आहे. मला जेव्हा साहित्य अकादमीचा युवा पुरस्कार मिळाला, तेव्हा ती संध्याकाळी ऑफिसातून घरी जाताना मिठाई घेऊन हजर! तर माझ्या कादंबरीचा, चतुरचा अंतिम खर्डा अनुजाला वाचायला दिला आणि तिच्या उत्तराची वाट पाहत मी थांबलो. याआधी तिने माझ्या तीन पुस्तकांचं संपादन केलं असल्याने तिच्या कामाची पद्धत मला माहिती होती - वाचून झालं की ती मला तिचे मुद्दे कागदावर लिहून देणार. तरी या वेळी मी जरा अस्वस्थ होतो. कारण ही कादंबरी माझ्यासाठी माझ्या लेखनातला महत्त्वाचा टप्पा होता. शिवाय, त्यातला आशयही मृत्यू, निरागत्वाचा लोप असा वेगळा, गंभीर होता. कदाचित ती वाचताना काहीतरी मेसेज करेल, असं मला वाटलं; पण तसा मेसेज काही आला नाही. त्यामुळे जरा खट्टू झालो. मग थोड्या दिवसांत तिचा मेसेज आला. कादंबरी वाचून झालीय. खरं तर मला तुला या कादंबरीबद्दल पत्रच लिहायचं आहे, पण आपण भेटून अधिक बोलू या.

आम्ही भेटलो तेव्हा तिने कादंबरीत येणारा मृत्यू, त्यावरचं चिंतन, घडणारे प्रसंग, त्यातून उभी राहणारी चित्रणं वगैरे खूप चांगली झाल्याचं व मनापासून आवडल्याचं सांगितलं. मग कादंबरीबद्दल काही प्रश्न विचारले. मी त्याला उत्तर दिली आणि कादंबरीबद्दलची माझी भूमिका इत्यादी सांगितलं आणि त्यानंतर ती म्हणाली, ‘प्रणव, यामध्ये रमाचं म्हणजे जे स्त्रीचं पात्र आहे ना, त्याच्याबद्दल आणखी जास्त लिहायला हवं. तिला काय वाटतं, तिचं-त्याचं रिलेशन याबद्दल आणखी लिहिलंस तर या कादंबरीचा तोल नीट साधला जाईल. विचार कर...’ मी विचार केला आणि होकार दिला. मग ती म्हणाली, ‘आणखी एक, रमाच्या भाषेवर जरा आणखी विचार कर. असं वाटतंय की तूच तिच्या तोंडी बोलतो आहेस!’ मी जरासा दुखावलो या कमेंटने. किती काम केलं होतं मी! पण जेव्हा घरी जाऊन कादंबरीचा खर्डा परत वाचू लागलो, तेव्हा मात्र तिचं म्हणणं पटलं आणि त्यानुसार पुनर्लेखन केलं, रमाचे मोनोलॉग्ज वाढवले, भाषा बदलली. आता चतुर कादंबरीतला तिचा-त्याचा तोल चांगला साधला गेला होता. (मी काय म्हणतोय हे कादंबरी वाचलेल्यांना किंवा वाचणाऱ्यांना समजेल.) पुरुष लेखकाला स्त्री संपादिका हवी असं मी म्हणालो त्या मागचं कारण हेच - कदाचित एखाद्या पुरुष संपादकाला अनुजाने ज्या सूचना केल्या, त्या कराव्याशा वाटल्या नसत्या... किंवा त्याने विचारच केला नसता त्याचा. त्याला स्त्री पात्राची भाषा तितकी खटकली नसती. मग अंतिम कादंबरीला कदाचित तितकी भावनिक खोलीही मिळाली नसती. त्यामुळे थँक्स अनुजा... पण अजून तू मला चतुरबद्दलचं पत्र पाठवलेलं नाहीयेस. त्याची वाट पाहतोय….

प्रणव सखदेव संपर्क : 7620881463

बातम्या आणखी आहेत...