आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अग्रलेख:मुळावर घाव

6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

भाजपचे चाणक्य अमित शहा परवा मालवणात आले अन् शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी खोटे कसे रेटून नेले, हे सांगून गेले. त्याच्या मोठ्या बातम्या झाल्या. अनेकांचे छाती काढून झाले. तरी ‘मातोश्री’ मात्र गप्प. अनेकांना वाटले... बघा, अमितभाई खरे तेच बोलले. आता कशी बाेलती बंद झाली! पण, एक तर शिवसेनेत उठसूठ खुलासा देण्याची प्रथा नाही. दुसरे म्हणजे, वेळ येईल तेव्हा उद्धव नक्की हिशेब चुकवतील. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी युतीची जी बोलणी झाली, ती शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या खोलीत झाली होती. ‘ती खोली आमच्यासाठी पवित्र स्थळ आहे. किमान तिथे तरी आम्हाला खोटे ठरवू नका,’ अशी तमाम शिवसैनिकांची भावना होती. अमितभाईच्या त्या भाषणाचे शिवसैनिकांना जितके वाईट वाटले नसेल, त्यापेक्षा काहीपट वाईट ते ज्या व्यासपीठावर बोलते झाले, त्याचे वाटले असेल.

शिवसेनेशी उभा दावा मांडलेल्या नारायण राणेंच्या व्यासपीठावरुन शहा बोलेले. त्याची सल ‘मातोश्री’ला असणार . अमित शहा जे बोलले ते शिवसेना आणि भाजप यांच्यातील ३० वर्षांच्या काडीमोडावर झालेले शिक्कामोर्तब म्हणावे लागेल. शहांनी आघाडी सरकारवर कितीही टीका केली असती, तरी शिवसेनेला ती एकवेळ सहन झाली असती. मात्र, त्यांनी उद्धव यांना खोटे ठरवले, त्याची बोच शिवसैनिकांच्या मनात राहील. युतीमध्ये तडजोड करण्याचा जो रस्ता होता, तो या भाषणाने बंद झाला. त्यामुळे भाजपला राज्यात आता नवा भिडू शोधावा लागेल. कारण शिवसेनेसारखा समानधर्मी आणि विश्वासू मित्र त्याने गमावला आहे. मालवणच्या सभेच्या दोन दिवसआधी उद्धव म्हणाले होते, ‘युतीच्या वृक्षाला फळे येतील, असे मला वाटत नाही, पण किमान मुळावर घाव तरी घालू नका, अशी माझी त्यांना विनंती आहे’. शहांच्या वाग्बाणांनी युतीतील मैत्रीच्या मुळावर घाव बसला आहे. भाजपच्या शीर्षस्थ नेतृत्वाने शिवसेनेला थेट ललकारणे याचा अर्थ त्या पक्षाची व्यूहनीती बदलली आहे असा होतो. आणि तसेच असेल तर तो राज्याच्या राजकीय सारीपाटावरील नव्या उलथापलथीचा संकेत असू शकतो.

बातम्या आणखी आहेत...