आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अग्रलेख:नकोत आणखी ‘आयशा’...

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

देशात हुंडाबंदीचा कायदा अनेक वर्षांपासून लागू आहे. मात्र, त्याचे काटेकोर पालन कुठेच होत नाही. जिथे प्रत्यक्ष अथवा थेट हुंडा घेता येत नाही, तिथे वेगवेगळ्या मार्गांनी तो वसूल केला जातो. आणि याला कोणताही जाती-धर्म वा संप्रदाय पूर्णपणे अपवाद नाही. मुस्लिम धर्मीयांमध्ये प्रत्यक्ष- अप्रत्यक्षपणे रूढ झालेली ही प्रथा रोखणारे पाऊल मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाने उचलले आहे. सक्तीने किंवा हट्टाने दहेज अर्थात हुंडा घेणाऱ्यांचा ‘निकाह’ न लावण्याचा महत्त्वाचा निर्णय बोर्डाने घेतला आहे. शिवाय, कमी खर्चात, साध्या पद्धतीने निकाह कसे करावेत, याविषयी जनजागृतीसाठी माेहीम राबवण्यासाठीही पुढाकार घेतला आहे. मुस्लिम महिलांचे आयुष्य उद‌्ध्वस्त करणारी ही हुंड्याची प्रथा संपवतानाच त्याकरिता नव्या पिढीमध्ये जाणीव-जागृती व्हावी, असा उद्देशही या निर्णयामागे आहे. अहमदाबादमधील २३ वर्षीय आयशा बानो हिने हुंड्यासाठी होणाऱ्या जाचाला कंटाळून साबरमतीमध्ये उडी घेऊन नुकतीच आत्महत्या केली. ती करण्यापूर्वी तिने बनवलेला व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला. आयशाचा दुर्दैवी अंत हे हुंड्याच्या अनिष्ट परंपरेने घेतलेल्या बळीचे अगदी अलीकडचे आणि ढळढळीत उदाहरण. या पार्श्वभूमीवर बोर्डाच्या या निर्णयाकडे विधायक दिशेने पडलेले पाऊल म्हणून पाहावे लागेल.

मुस्लिम विवाहांमध्ये पतीकडून पत्नीला दिल्या जाणाऱ्या भेटीची म्हणजे ‘मेहेर’ची प्रथा अस्तित्वात आहे. या मेहेरवर पूर्णपणे त्या महिलेचा हक्क असतो. परंतु, काळाच्या ओघात मुलीच्या सासरच्यांकडून दहेजची प्रथाही जोपासली जाऊ लागली. यातूनच मोजक्या संसारोपयोगी वस्तू भेट म्हणून देण्याची पद्धत रूढ झाली. यात संयम बाळगण्याची तसेच वधुपित्याच्या आर्थिक स्थितीपेक्षा जास्त भार टाकू नये, अशी अपेक्षा असे. मात्र, काही ठिकाणी त्यातही वाढ झाली. सर्व धर्मीयांमधील हुंड्यासारख्या घातक रूढी संपवण्यासाठी चळवळ उभारण्याची गरज आहे. मुस्लिम समुदायाने याबाबतीत पुढचे एक पाऊल उचलले आहे. शिवाय, मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाने हे पाऊल उचलणे आणि मौलवींनीही त्याला अनुकूल प्रतिसाद देणे हे फारच आश्वासक आहे. भविष्यात पुन्हा कुणावर आयशा बानोसारखी वेळ येऊ नये, यासाठी आता सर्वांनी अशाच संवेदनशीलतेने पुढची पावले टाकायला हवीत.

बातम्या आणखी आहेत...