आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अग्रलेख:सामंजस्याचा हात दाखवा, ‘एसटी’साठी संघर्ष थांबवा!

18 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

एसटी महामंडळाने तीनशेहून अधिक संपकरी कर्मचाऱ्यांचे निलंबन केले. त्यामुळे तडजाेड होण्याऐवजी संप अधिक चिघळण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. काेणत्याही व्यवस्थापनाचे यश त्याच्या अंतर्बाह्य ग्राहक हितसंबंधांच्या व्यवहार धाेरणावर अवलंबून असते. सार्वजनिक वाहतूक व्यवसायासाठी दिवाळीसारखे सण - उत्सव हा जणू सुगीचा काळ. परंतु, अशा काळात एसटी कर्मचाऱ्यांना संपासारखे दुधारी हत्यार उपसावे लागणे, हेच महामंडळाच्या व्यवस्थापकीय धाेरणाचे अपयश मानावे लागेल. शेतकरी आत्महत्या ही जशी सुसंस्कृत समाजव्यवस्थेला बसलेली थप्पड असते, तशी एसटी कामगार - कर्मचाऱ्यांच्या आत्महत्येची मालिका ही त्या व्यवस्थापनासाठीही लाजिरवाणी घटना ठरते. अशात एसटी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे राज्यातील सार्वजनिक वाहतूक काेलमडून पडली. संपाच्या वणव्याने राज्यातील सामान्य प्रवासी हाेरपळून निघाला आहे. खासगी वाहतूक व्यावसायिकांनी प्रवाशांची लूट होत असताना प्रशासनाने केवळ बघ्याची भूमिका घेतली आहे.

परिवहनमंत्री अनिल परब यांनी, न्यायालयाचा हवाला देऊन संप बेकायदा ठरवत कर्मचाऱ्यांवर निलंबनाचे शस्त्र उगारले. वेतनाविना जगणे मुश्कील झालेल्या एसटी कर्मचाऱ्यांवर ही आणखी एक कुऱ्हाडच म्हणावी लागेल. पण, शासन आणि महामंडळ संवेदनशीलपणे उचित मार्ग काढण्याच्या पवित्र्यात दिसत नाही. एसटीला आर्थिक संकटातून बाहेर काढण्यासाठी शाश्वत पर्याय शाेधणे ही व्यवहार्यता आहे. महामंडळाचे शासनात विलीनीकरण करण्याच्या भूमिकेवर एसटी कर्मचारी ठाम आहेत. शासन वेतनापुरती तुटपुंजी रक्कम देण्यापलीकडे वेगळे पर्याय शोधत नाही. एसटी महामंडळाला सत्तरच्या दशकात टप्पा वाहतुकीला एकाधिकार दिले गेले. शासन धाेरणामुळे लालपरी राज्याची अविभाज्य भाग बनली. राज्याच्या, विशेषत: ग्रामीण विकासात एसटीचे भरीव योगदान आहे. पर्यटन, व्यवसायवृद्धी आणि रोजगार निर्मितीच्या नावाखाली कार, बसच्या उत्पादनाला प्राेत्साहन देण्यात आले, तसेच प्रवासी वाहतूक परवान्यावरील निर्बंध सैल केले गेले. वाहन खरेदीसाठी बँकांचे धोरण बदलले. परिणामी एसटीच्या प्रवासी वाहतुकीच्या कायदेशीर एकाधिकारशाहीला घरघर लागली. आता शासन, महामंडळ आणि कर्मचाऱ्यांनी परस्परांतील संघर्षाच्या पलीकडे जाऊन सामंजस्य दाखवत शाश्वत पर्यायी धोरण तयार करणे, हाच प्रवाशांसह सर्वांच्याच हिताचा पर्याय आहे.

बातम्या आणखी आहेत...