आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराती आली.. तिनं पाहिलं.. अन् तिनं जिकलं! आपली जादू तिनं पुन्हा सिद्ध केली. भारतीय क्रिकेटच्या पुरुष संघाने इंग्लंडला कसोटी मालिकेत धूळ चारल्यानंतर, तिनंही अशीच कर्तबगारी गाजवत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये दहा हजारांचा टप्पा ओलांडला. तिचं नाव मिताली राज. भारतीय महिला क्रिकेट संघाची तडफदार कर्णधार. सगळीकडे कोरोनाचे मळभ दाटलेले असताना अशा बातम्या आनंदाची लहर आणतात. विशेष म्हणजे हा पराक्रम करणारी मिताली जगातली केवळ दुसरी महिला क्रिकेटपटू. याआधी इंग्लंडच्या चार्लोट एडवर्ड््सने हा विक्रम केला. पण, ती १० हजार २७३ धावांनंतर निवृत्त झाली. मिताली अजून मैदानात आहे, त्यामुळे तिचं जास्त अप्रूप. तिची वाटचाल अशीच राहिली तर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करण्याचा बहुमान तिच्या नावावर नोंदवला जाईल.
खरं तर आपला देश क्रिकेटवेडा. जगातलं सर्वात श्रीमंत क्रिकेट मंडळ ही ‘बीसीसीआय’ची ओळख. पण, पुरुषांच्या क्रिकेटला चालना देण्यासाठी कष्ट उपसणारी ‘बीसीसीआय’ महिला क्रिकेटच्या बाबतीत नाक मुरडते. भारतीय महिला संघासाठी एकदिवसीय मालिका आयोजित करायलाही ‘बीसीसीआय’ने बराच वेळ घेतला. अशा भूमिकेमुळेच महिला क्रिकेटच्या प्रगतीला खीळ बसली. या परिस्थितीतही मितालीने जिद्द ठेवून ७५ अर्धशतके आणि ८ शतके फटकावत केलेली विक्रमी कामगिरी खरोखरच दिमाखदार आहे. खरं तर मितालीला भरतनाट्यम शिकून नृत्यांगना व्हायचं होतं, पण क्रिकेट खेळणं सुरू केलं आणि नृत्याकडे दुर्लक्ष होऊ लागलं. शेवटी गुरुजींनी भरतनाट्यम आणि क्रिकेट यातील एक निवडायला सांगितलं. तिनं बॅट हातात घेतली. लेकीच्या क्रिकेटसाठी हवाई दलातून निवृत्त झालेल्या वडिलांनी इतर खर्चांना कात्री लावली. क्रिकेटपटू असणाऱ्या आई लीला राज यांनी नोकरी सोडली. त्यांना आपली स्वप्ने मितालीने पूर्ण करावीत, असे वाटले असेल. आई-वडील पाठीशी उभे राहिले आणि मग तिनेही मागे वळून पाहिले नाही. आज देशाचा अभिमान ठरलेली मिताली क्रीडा क्षेत्रात, विशेषत: क्रिकेटमध्ये येऊ पाहणाऱ्या मुलींसाठी प्रेरणा ठरली आहे. अशा ‘धाकड’ गर्ल घडवण्यासाठी ‘बीसीसीआय’ने महिला क्रिकेटला पाठबळ दिले पाहिजे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.