आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अग्रलेख:राजेहो, हातच्या ‘कंगना’ला आरसा कशाला..?

15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

भारताला १९४७ मध्ये मिळालं ती भीक होती, खरं स्वातंत्र्य २०१४ मध्ये मिळालं, असं अभिनेत्री कंगना रणौतला वाटतं. यात एवढा गहजब होण्यासारखं काय आहे, हेच कळेनासं झालंय. तिच्या मते, आपल्याला स्वातंत्र्य २०१४ मध्ये मिळालं. म्हणजे स्वातंत्र्याला ७५ वर्षे नव्हे, तर जेमतेम साडेसात वर्षे झाली आहेत. पण, १९४७ मध्ये देशाला स्वातंत्र्य मिळालं, असं मानून सरकार मात्र उगाच स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव वगैरे सुरू असल्याचा देखावा करते आहे. कंगनाने ‘मनकर्णिका’ बनून झाशीच्या राणीची भूमिका केली असेलही, पण म्हणून तिने स्वातंत्र्यासाठी १८५७ मध्ये उठाव झाला होता, हे का मान्य करावे? दीडशे वर्षांची गुलामी संपवण्यासाठी झालेल्या अविरत संघर्षाच्या, अविचल सत्याग्रहाच्या अन् अलौकिक बलिदानाच्या कहाण्या तुम्ही मस्तकी लावत असाल हो.. पण, या ‘धाकड गर्ल’साठी त्या केवळ भाकड कथा आहेत. तिने त्या का खऱ्या मानाव्यात?

१९४७ नंतरच्या साठ-सत्तर वर्षांतील सरकारांनी देशाची जडणघडण केली, जगाच्या नकाशावर ‘भारत’ नावाची एक शक्ती उभी केली, असं कुणाला वाटत असेल तर तो निव्वळ भ्रमच! हा काळ काय स्वातंत्र्याचा, लोकशाहीच्या उन्नतीचा होता? कंगनाला विचाराल, तर हा देश गुलामीत खितपत होता आणि त्याला स्वातंत्र्य अगदी परवा मिळालं! भारतीय स्वातंत्र्यलढ्याचा इतिहास वेचणारे बिपिनचंद्र, बरुन डे यांच्यापासून ते वंचितांचा इतिहास लिहिण्यासाठी आयुष्य वेचणारे सबाल्टर्न अन् राष्ट्रवादी इतिहासकारही चुकीचेच असावेत. १९४७ पूर्वीचा आणि नंतरचा देदीप्यमान इतिहास अभिमानाने सांगणाऱ्यांच्या डोळ्यावरही झापड आली असावी. कंगना सांगतेय तेच स्वातंत्र्याचे वर्ष मानून या कालखंडाकडे जरा पाहा म्हणावं! या साडेसात वर्षांच्या स्वातंत्र्योत्तर काळातील देशाची, स्वायत्त संस्थांची आणि एकूणच लोकशाहीची भरभराट पाहून त्यांची झापडं तर दूर होतीलच, उलट डोळे अक्षरश: दीपून जातील! ‘पद्मश्री’प्राप्त विदुषी खोटं कशाला बोलेल? त्यामुळे ती सांगतेय तेच खरं स्वातंत्र्य! राजेहो, उगाच हातच्या ‘कंगना’ला आरसा कशाला..? तिला कळलेलं ‘स्वातंत्र्य’ तुम्हा-आम्हाला कळलं नाही, हेच खरं!

बातम्या आणखी आहेत...