आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अग्रलेख:ममतांकडून बंदीचीही चांदी

9 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणूक ही टोकाच्या आणि तितक्याच महत्त्वाकांक्षी नेत्यांमधली निवडणूक आहे. त्यामुळे तिथे रोज नव्या राजकीय नाटकांचे प्रयोग होताना देश पाहतो आहे. जोपर्यंत मतदानाचे सर्व टप्पे पूर्ण होत नाहीत तोपर्यंंत हे सुरूच राहील यात शंका नाही. निवडणूक आयोगाने सोमवारी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना पाचव्या टप्प्याच्या प्रचारासाठी २४ तासांची बंदी घातली. मंगळवारी रात्री आठ वाजता ही मुदत संपली; पण आयोगाचा हा निर्णय घटनाबाह्य आणि लोकशाहीविरोधी असल्याचे सांगत ममता यांनी कोलकात्यात धरणे आंदोलन केले. त्यासाठी जागा निवडली ती महात्मा गांधी पुतळ्याजवळची. माध्यमांमधून त्याची छायाचित्रे प्रसिद्ध झाली आणि त्यावर मोठी चर्चाही होत राहिली. त्यामुळे ममता यांना या २४ तासांत जे काही सांगत फिरायचे होते ते असेही मतदारांसमोर त्यांनी वेगळ्या पद्धतीने पोहोचवलेच आहे. त्यांच्यावर झालेल्या कथित हल्ल्यानंतर त्यांनी प्लॅस्टर लावलेल्या पायाचेही भांडवल केले. हे निर्णय त्यांचेच आहेत की त्यांचे निवडणूक सल्लागार प्रशांत भूषण यांचे, हे माहिती नाही; पण वाईटाचाही चांगला उपयोग करून घ्यायची ही उदाहरणे आहेत.

राजकारणात आक्रस्ताळेपणा करण्यात ममता यांचा हात कोणी धरणार नाही. त्यांच्या राहणीमानात जेवढा साधेपणा आहे तेवढ्याच वागण्यात त्या कठोर आहेत. म्हणूनच काँग्रेसच्या किंवा भाजपविरोधी अन्य पक्षाच्या नेत्यांची पुरेशी साथ नसतानाही एकहाती त्या मोठ्या सत्ताधारी आणि ताकदवान नेत्यांना पुरे पडताहेत. केंद्रीय राखीव दलाच्या विरोधात आणि धार्मिक बाबतीतही प्रक्षोभक व चिथावणीखाेर विधाने केल्याचा आरोप त्यांच्यावर केला गेला. त्यामुळे निवडणूक आयोगाने त्यांच्यावर ही २४ तासांची बंदी घातली होती. ती विधाने प्रक्षोभक होती की नाही, याची चौकशी आयोगाने केल्याचा दावा केला जातो आहे. निवडणूक आयोगाला केंद्र सरकारच्या हातातील बाहुले म्हणणाऱ्यांना ती चौकशी आणि निर्णयही मान्य होणे शक्यच नाही. ज्या पद्धतीने आयोगाने पश्चिम बंगालमध्ये निवडणुकीचे टप्पे ठरवले तेही भाजपला अनुकूल असेच आहेत, असाही आरोप केला जातो आहे. असे असले तरी ममतांनी बंदीचीही चांदीच करून घेतली हे मात्र खरे.

बातम्या आणखी आहेत...