आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अग्रलेख:लोकशाही मूल्यांचा रक्षक

19 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

दिल्लीभोवतीच्या सिंघू, गाझीपूर आणि टिकरी सीमांपासून आसामच्या दुर्गम सीमावर्ती गावांपर्यंत एक अनामिक अस्वस्थतेची लाट पसरली असताना न्यायालयांच्या निर्णयांभोवती संशयाचे धुके दाटताना आणि निवृत्त सरन्यायाधीशच देशाची न्यायव्यवस्था जीर्ण झाल्याचे सांगत असताना न्या. पी. बी. सावंत यांचे जाणे भविष्याच्या वाटेवरचा अंधार गडद करणारे आहे. न्या. सावंतांच्या रूपाने भारतीय समाजाला एक निपुण न्यायाधीश, बुद्धिवादी विचारवंत, तर्कनिष्ठ लेखक आणि द्रष्टा-कृतिशील अग्रणी लाभला. विधी आणि न्याय क्षेत्रातील त्यांची कारकीर्द जितकी उच्च होती, तितकीच उंची त्यांच्या सामाजिक, वैचारिक योगदानालाही लाभली. दिवाणी, फौजदारी, सहकार, औद्योगिक अशा विविध शाखांप्रमाणेच न्यायालयाच्या अपिलीय आणि घटनापीठांवरून त्यांनी दिलेले निर्णय महाराष्ट्र व देशासाठी उपयुक्त ठरले. उच्च आणि सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून त्यांची कारकीर्द इतिहासात नोंदवली जाणारी आहेच, पण निवृत्तीनंतर अनेक लवाद, न्यायिक आयोग, समित्यांचे प्रमुख म्हणून त्यांनी केलेले निवाडे केवळ न्यायव्यवस्थेलाच नव्हे, तर समाजासाठीही दिशादर्शक बनले.

गुजरात दंगलप्रकरणी नेमण्यात आलेल्या लवादापासून ते भ्रष्टाचाराचे आरोप झालेल्या महाराष्ट्रातील चार मंत्र्यांच्या चौकशीसाठी नेमलेल्या आयोगापर्यंत प्रत्येक ठिकाणी न्या. सावंतांनी केवळ कायदा, न्याय आणि व्यापक समाजहित प्रमाण मानूनच निर्णय दिले. प्रेस कौन्सिलचे अध्यक्ष म्हणून त्यांनी आखलेली धोरणे माध्यमांच्या स्वयंनियमनासाठी दिशादर्शक ठरली. त्यांच्या ‘लोकशाहीचे व्याकरण’ पुस्तकाचे अनेक भाषांत अनुवाद झाले. नव्या पिढीला भारतीय लोकशाही आणि संविधानाची मूल्ये कळावीत म्हणून ते सतत तरुणांशी संवाद साधत. गेल्या काही वर्षांपासून त्यांनी आपल्या फेसबुक पेजवरून हा जागर सुरू ठेवला होता. ‘ईश्वर’ या विषयावरचे त्यांचे लेखन अगदी १२ फेब्रुवारीपर्यंत सुरू होते. ‘देव मानून त्याची शिकवण मात्र न मानणारे नास्तिकापेक्षा नास्तिक असतात,’ असा त्यांच्या अखेरच्या लेखाचा सार होता. देशात कर्मठ धार्मिक राष्ट्रवाद रुजत असताना धर्मनिरपेक्ष, प्रजासत्ताक लोकशाहीचा ते एल्गार बनले. व्यक्ती आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा संकोच होत असताना ‘भूमिका’ घेणाऱ्यांचा आवाज झाले. न्या. सावंतांच्या रूपाने लोकशाही मूल्यांचा रक्षणकर्ता हरपला आहे. अस्वस्थ वर्तमान आणि अंधुक भविष्याला सामोरे जाणाऱ्या समाजाची ही मोठी हानी आहे.

बातम्या आणखी आहेत...