आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
काँग्रेसचे सरकार सत्तेत असलेल्या पुद्दुचेरीत बुधवारी राहुल गांधी यांचे स्वागत भाजपने सरकारचे बहुमत घालवून केले. ते येण्याच्या काही तास आधीच एका काँग्रेस आमदाराने राजीनामा दिला. त्यामुळे काँग्रेस आणि द्रमुुक आघाडी सरकारकडे चौदाच आमदार राहिले आहेत. बहुमत गमावूनही राजीनामा देत नसल्याबद्दल आता या सरकारवर कारवाई करा, अशी मागणी विरोधी पक्ष असलेल्या भाजपने सुरू केली आहे. आतापर्यंत काँग्रेसच्या एका मंत्र्यासह चार आमदारांनी तिथे पक्ष सोडला आहे. त्यातील दोघांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. नव्याने राजीनामा देणारे आमदारही त्याच पक्षात जाणार आहेत. त्यामुळे या सर्व घडामोडींमागे कोण आहे, हे लपून राहिलेले नाही.
किरण बेदी यांना मंगळवारी सायंकाळी अचानक तिथल्या उपराज्यपाल पदावरून हटवण्यात आले. त्यांना हटवण्याची मागणी मुख्यमंत्री व्ही. नारायणसामी सुरूवातीपास्ून करीत होते. त्यामुळे बेदींंच्या जाण्याचा त्यांना अत्यानंद झाला आहे. याच किरण बेदींनी सत्ताधाऱ्यांचा विरोध पत्करून २०१७ मध्ये तीन जणांना राज्यपाल नियुक्त आमदार म्हणून शपथ दिली होती. तरीही त्यांना हटवण्यात आले यामागे त्यांचा स्वभाव आहे. उपराज्यपाल असल्याचे विसरून मुख्यमंत्री असल्यासारखा कारभार त्या करीत होत्या. भ्रष्टाचार प्रकरणात काँग्रेसच्या आमदारांना त्यांनी जेरीस आणले होते. त्यामुळे आपले दुकान चालू ठेवायचे, तर भाजपमध्ये जाण्यावाचून गत्यंतर नाही, असा विचार करायला ते बाध्य झाले. आता तेच आमदार भाजपमध्ये आल्यावर बेदी पुन्हा त्यांच्या मागे लागतील आणि उद्या भाजपचे सरकार बनले तरी त्यांची ‘मुख्यमंत्रीगिरी’ सुरूच राहील, अशी भीती मूळच्या आणि नंतर भाजपमध्ये आलेल्या आमदारांनाही असणार. त्यामुळे पुढचे सारे सुरळीत होण्यासाठी त्यांची गच्छंती झाली असावी. आता आणखी एखादे ‘कोश्यारी’ पुद्दुचेरीत नेमले जातील आणि पुढचा कार्यभाग साधला जाईल, हे उघड आहे. काँग्रेसच्या गाफीलपणामुळे त्यांच्या उरल्यासुरल्या सत्तेच्या केकवरची ही आयती पुद्दु‘चेरी’ भाजपने मटकावली नाही तरच नवल! राहुल गांधी आधीच तिथे जाऊन आपल्या आमदारांना भेटले असते तर ही पडझड झाली नसती, असे तिथले काँग्रेसी सांगताहेत. पण ते राहुल गांधी आहेत. त्यांना कोणी हे सांगायचे?
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.