आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अग्रलेख:जळगावातले सत्तांतर

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

भाजपचीच रणनीती वापरून जळगाव महापालिकेतील सत्ता शिवसेनेने भाजपकडून हिसकावून घेतली आहे. कमळाच्या चिन्हावर अडीच वर्षांपूर्वी महापालिकेत निवडून आलेल्या ५७ जणांपैकी तब्बल २७ जणांना शिवसेनेनेे गळाला लावले. एमआयएमसारख्या हिंदुत्वविरोधी पक्षाचेही तीन नगरसेवक या गळाला अलगद लागले आहेत. अर्थात, हा गळ किती ‘किमती’ होता आणि ती किंमत पुढे कशी वसूल केली जाईल, याची चर्चा नंतर होत राहील. सध्या तरी भाजपची, विशेषत: आमदार गिरीश महाजन यांची नाचक्की केल्याचा आनंद शिवसेनेच्या नेत्यांना आहे. ज्या नगरसेवकांनी ही बंडखोरी केली आहे त्यातले किती मूळ ‘भाजपेयी’ आहेत हाही प्रश्नच आहे. महापालिका निवडणुकीपूर्वी तेव्हा मंत्री असलेल्या गिरीश महाजन यांनी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील नगरसेवकांना असेच गळाला लावून भाजपमध्ये आणले होते. गेल्या अडीच वर्षांपैकी मागचे कोरोनाचे वर्ष वाया गेले हे मान्य केले तरी उर्वरित काळात शहरात फारशी विकासकामे झाली नाहीत. त्यामुळे प्रभागात नागरिकांच्या प्रश्नांना तोंड देणे अवघड झाले होते, असे या फुटीर नगरसेवकांचे म्हणणे आहे.

भाजपच्या स्थानिक आमदारांनीही महापालिकेकडे लक्ष देणे सोडले होते, त्याचाही राग ते व्यक्त करत आहेत. त्यात काही प्रमाणात तथ्य असले तरी अन्य कसलाच मोह त्यांना नव्हता, यावर कोण विश्वास ठेवेल? राज्यात शिवसेनेकडे सत्तेच्या चाव्या आहेत. त्याचा लाभ पक्षांतर बंदी कायद्यातून या नगरसेवकांना कसे वाचवता येईल, यासाठी सत्ताधारी करतील. महापालिकेत मोठ्या प्रमाणात विशेष निधी देण्याचे आश्वासनही सत्ताधाऱ्यांनी दिले आहे. तसा निधी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही या महापालिकेला दिला होता; पण तो वेळेवर खर्च करण्याचे कौशल्यही महापालिकेच्या तत्कालीन पदाधिकाऱ्यांना दाखवता आले नाही. नवे पदाधिकारी ते दाखवू शकले तर या सत्तांतराचा जळगावकरांना थोडा तरी फायदा झाला असे म्हणता येईल. सांगली-मिरज महापालिकेनंतर भाजपला बसलेला हा दुसरा झटका आहे. आता जे जळगावात घडले ते धुळे महापालिकेत किंवा अन्य संस्थांमध्येही घडू शकते, असे म्हटले जाते आहे. हा संसर्ग रोखणे भाजपला शक्य होते का, हे आता पाहायचे.

बातम्या आणखी आहेत...