आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अग्रलेख:‘जीडीपी’च्या उभारीचा ‘अर्थ’

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

एखादी अशक्य असणारी बाब घडल्यास आपल्याकडे ‘कोल्हे गेले तीर्था’ असे म्हणण्याची पद्धत आहे. भारताच्या आर्थिक विकासाबाबत जागतिक बँकेने जाहीर केलेली आकडेवारी पाहता, कोरोनातही कोल्हा तीर्थाला गेला असे म्हणावे लागेल. देशाच्या वास्तविक आर्थिक विकासाचा निदर्शक असलेल्या सकल राष्ट्रीय उत्पादन अर्थात ‘जीडीपी’च्या वाढीचा दर २०२१-२२ या आर्थिक वर्षात किमान ७.५ टक्के ते कमाल १२.५ टक्के राहील, असे बँकेने म्हटले आहे. मागील वर्षात कोरोना महामारी आणि दीर्घकाळची टाळेबंदी असे घाव सोसूनही भारतीय अर्थव्यवस्थेने दाखवलेली ही उभारी निश्चितच सुखावह आहे. कोरोना येण्यापूर्वी आपली अर्थव्यवस्था शरपंजरी अवस्थेत होती. २०१६-१७ मध्ये ८.३ टक्क्यांवर पोहोचलेला जीडीपी २०१९-२० मध्ये ४ टक्क्यांपर्यंत गडगडला होता. याचाच अर्थ असा की, कोरोना महामारी येण्यापूर्वीच अर्थचक्राला घरघर लागली होती.

कोरोनाकाळात अनेक उद्योग बंद पडले, टाळेबंदीने मजुरांचे स्थलांतर मोठ्या प्रमाणात झाले. अचानक आलेल्या या संकटाला सामोरे जाण्यासाठी केंद्र सरकारला काही पावले उचलावी लागली. सरकारने सर्वच क्षेत्रांसाठी काही ना काही आर्थिक पॅकेज जाहीर करत आपत्तीतून बाहेर पडण्याचा मार्ग स्वीकारला. ‘आत्मनिर्भर भारत’सारख्या योजनांतून विविध क्षेत्रांत काही प्रमाणात आर्थिक स्थैर्य आले. त्यातच भारतीय बाजारपेठेने या काळात विदेशी गुंतवणूकदारांना चांगलेच आकर्षित केले. त्यातून अर्थव्यवस्थेला उभारी मिळण्यास मदत झाली. अर्थव्यवस्थेला आलेल्या या उभारीबाबत अधिक सविस्तर संशोधन यापुढे होत राहील. विकासदराच्या आकड्यांनी हुरळून जाण्याची ही वेळ नसल्याचा जागतिक बँकेच्या अहवालातील इशाराही दुर्लक्षित करून चालणार नाही. कोरोनावर आपण पूर्ण नियंत्रण कसे मिळ‌वतो, यावर बरेच काही अवलंबून राहील. तसेच आर्थिक धोरणाच्या आघाडीवर आपली प्रगती कशी राहते, याकडे जगाचे लक्ष आहे, हेही विसरून चालणार नाही. कोरोना लसीकरण मोहिमेची यशस्वी अंमलबजावणी अर्थचक्राला वंगण देण्याचे काम करणार आहे. तरीही हा अंदाज प्रत्यक्षात उतरवणे, हेच देशासमोरचे आव्हान आहे. अर्थव्यवस्थेला ते पेलता आले तरच सर्वसामान्यांना दिलासा मिळू शकेल.

बातम्या आणखी आहेत...