आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अग्रलेख:नानांची सायकल, दादांचा ब्रेक !

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामुळे मुंबईची राजकीय हवा तापू लागली आहे. शिवसेनेचे मंत्री संजय राठोड यांच्या मुद्द्यावरून सरकारच्या कोंडीची तयारी केलेल्या विरोधकांची हवा अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला त्यांचा राजीनामा आल्याने तशी आधीच गेली होती. राठोड पायउतार झाल्याने या अधिवेशनाला सामोरे जाताना मुख्यमंत्र्यांसह या पक्षाच्या मंत्र्यांचा आत्मविश्वास साहजिकच दुणावला होता. अशातच अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी काँग्रेसने सत्ताधारी असूनही वातावरण ढवळून काढले. एरवी पक्षाचे नेते येतात तेव्हाच फडकणाऱ्या काँग्रेसच्या झेंड्यांनी मंत्रालय ते विधान भवनाचा रस्ता तिरंगी झाला. काही काळ भाजपच्या तालमीत यशस्वी ‘इव्हेंट’ मॅनेजमेंटचे धडे घेतलेल्या काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी सायकल रॅली काढून विरोधकांची ‘स्पेस’ खाल्ली. खरे तर हे अधिवेशन राज्याचे आणि ते गाजवण्याची संधी विरोधकांची. राज्याच्या अधिभारामुळे इंधनाचे दर वाढल्याचा मुद्दा करून सत्ताधाऱ्यांना घेरण्याची त्यांची रणनीतीही ठरलेली. मात्र, नानांच्या सायकल रॅलीने विरोधकांचे मनसुबे उधळले. काँग्रेसचे नेते सायकलवरून विधान भवनात आले आणि वाहिन्यांचे कॅमेरे त्यांच्याकडे वळले. एकाच वेळी स्वपक्षाची प्रसिद्धी आणि विरोधकांची गोची असा दुहेरी डाव या नानांनी साधला. पण अजितदादांनी बारा आमदारांचा मुद्दा काढत विरोधकांच्या हातात आयते कोलित दिले आणि नानांच्या सायकलचीही ‘हवा’ काढून घेतली.

अजितदादांचे अनपेक्षितपणे स्वकीयांना अडचणीत आणणारे वागणे नवे नाही. ईडीच्या नोटिसीनंतर स्वत:हून चौकशी कार्यालयात जाऊन अर्धा दिवस प्रकाशझोतात राहिलेल्या शरद पवारांची हवा संध्याकाळी राजीनामा देऊन दादांनी काढून घेतली होती. महाविकास आघाडी सरकारची भट्टी जमत असताना रातोरात फडणवीसांसोबत सामील होत दादांनी अनपेक्षित उडी मारली. सोमवारीही विधानसभेत विकास महामंडळांच्या मुद्द्याशी बारा आमदारांच्या नियुक्तीचा बादरायण संबंध लावून अजितदादांनी पुन्हा अशीच गोची केली. शिवाय या मुद्द्याची पावती मंत्रिमंडळाच्या नावाने फाडून सर्वच सत्ताधाऱ्यांना विदर्भ, मराठवाड्याच्या दृष्टीने खलनायक बनवून टाकले. सभागृहात फडणवीस म्हणाले त्याप्रमाणे दादांच्या पोटातलं ओठावर आलं की दादांनी ते ठरवून केलं, हे पहाटेच्या शपथविधीप्रमाणे दादांनाच माहीत. पण यामुळे सत्ताधारीच एकमेकांवर कुरघोडी करणार असतील तर विरोधकांनी काय करायचे, असा प्रश्न उभा राहू शकतो.

बातम्या आणखी आहेत...