आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अग्रलेख:कोरोनाचा धसका, बाजाराला धक्का

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

कोणताही आजार ‘हत्तीच्या पायी येतो आणि मुंगीच्या पायी जातो’ असे म्हणतात. आजार, साथीचे रोग, संकटे येताना मोठ्या प्रमाणावर येतात आणि कमी होताना हळूहळू कमी होतात. मात्र, कोरोना चिवट निघाला. वर्षभरापासून तो जगाला छळतो आहे. याचाच धसका आता जगातील शेअर बाजारांनी घेतल्याचे दिसते. यास भारतीय शेअर बाजारही अपवाद नाही. मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकाचे नावच मुळी संवेदनशील निर्देशांक अर्थात सेन्सेक्स असे आहे. त्यामुळे कुठे थोडे जरी खट्ट झाले की सेन्सेक्सला हुडहुडी भरते. डिसेंबरमध्ये कमी झालेली कोरोना रुग्णसंख्या गेल्या काही दिवसांपासून झपाट्याने वाढते आहे. देशात एकाच दिवशी २५ ते २६ हजार अशा विक्रमी संख्येने कोरोना रुग्ण आढळताहेत. त्यामुळे पुन्हा लॉकडाऊन होते की काय ? बाजारपेठा, उद्योगांवर पुन्हा संक्रांत येईल का ? या धास्तीने बाजाराला ग्रासले. मग मंदीचे प्रतीक असलेल्या अस्वलाने बाजारावरील आपली पकड घट्ट करण्यास सुरूवात केली. त्यातच अमेरिकेतील ‘बाँड यिल्ड’ वाढून १४ महिन्यांच्या उच्चांकावर पोहोचली.

अमेरिकेच्या मध्यवर्ती बँकेचे - फेड रिझर्व्हचे व्याजदरांबाबतचे सावध धोरणही शेअर बाजाराला सतावते आहे. लॉकडाऊनची धास्ती आणि अमेरिकेतील परिस्थिती यामुळे मागील सलग पाच सत्रांत गुंतवणूकदारांनी विक्रीचा धडाका लावला. परिणामी सेन्सेक्सने पाच दिवसांत दोन हजार अंकांनी गटांगळी खाल्ली. या पाच दिवसांत मुंबई शेअर बाजाराचे बाजार भांडवल आठ लाख कोटींनी रोडावले. गेल्या वर्षी कोरोना काळातही बाजाराने असेच अस्थैर्य अनुभवले होते. त्यानंतरचे लॉकडाऊन, उद्योग बंद, मजुरांचे स्थलांतर, वाहतूक बंद अशा अनेक घटनांचे पडसाद शेअर बाजारात उमटले. बाजार सावरत असतानाच या मार्चमध्ये देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेसमान स्थिती निर्माण झाली. त्याचा धसका गुंतवणूकदारांनी घेतलेला आहे. मात्र, वर्षभरात पुलाखालून बरेच पाणी गेले आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे कोरोनावर आता लस उपलब्ध आहे. लसीचे हे शस्त्र कोरोनाला नामोहरम करण्यास उपयुक्त ठरेल. संबंधित यंत्रणांनी गुंतवणूकदारांना विश्वासात घेऊन हे सांगणे आवश्यक आहे. अन्यथा, कोरोनाच्या धसक्याने बाजाराला धक्का बसण्याच्या घटना घडत राहील.

बातम्या आणखी आहेत...