आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अग्रलेख:सावध व्हा... संकट घोंघावतेय

4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोरोनाचे रुग्ण काहीसे कमी झाले आहेत. रोजच्या रुग्णांचा आकडा घटल्याचे दिसत आहे. यामुळे लोकही निर्धास्त झाले आहेत. सण- उत्सव जोरात साजरे होत आहेत. लोकांना फिजिकल डिस्टिन्सिंगचाच नव्हे, तर मास्कचाही विसर पडला आहे. जणू काही कोरोनाने जगाचा निरोपच घेतला आहे, अशा आविर्भावात लोक वावरत आहेत. दुसऱ्या लाटेतील भीषण चित्र लोक विसरले की काय, अशी ही स्थिती. अगदी काही दिवसांपूर्वी रुग्णालयात जागा मिळावी आणि जागा मिळालीच तर ऑक्सिजन मिळावा, यासाठी अनेक लोक झगडत होते. अनेक शहरांत तर रुग्णांना साधे उपचारही मिळत नसल्याची स्थिती होती. पहिल्या लाटेच्या तुलनेत दुसऱ्या लाटेने मोठा तडाखा दिला. नातेवाइकांमध्ये कुणाला कोरोनाचा फटका बसला नाही, असे एकही घर नसावे. दुसरी लाट ओसरत असतानाच आता तिसऱ्या लाटेचे संकट दारात येऊन उभे राहिले आहे. त्या दृष्टीने ऑक्टोबर ते डिसेंबर हे तीन महिने चिंतेचे असल्याचा इशारा केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिला आहे.

राज्य सरकार, प्रशासन आणि आरोग्य यंत्रणाही वारंवार सतर्कतेचा इशारा देत आहे. दुसरीकडे, राज्यात संसर्गजन्य आजारही फैलावत आहेत. डेंग्यूची रुग्णसंख्या सहा हजारांवर गेली आहे. या आजाराने अनेकांचे बळी घेतले आहेत. अशा स्थितीत कोरोनाची तिसरी लाट अधिक घातक ठरू शकते. त्यामुळे या संभाव्य आपत्तीला तोंड देण्यासाठी सावध व्हावे लागेल. पहिल्या आणि दुसऱ्या लाटेच्या भयानक अनुभवातून आपण शहाणे झालो आहोत, हे दाखवण्याची आता वेळ आहे. नवरात्र, दसरा-दिवाळीसारखे सण जवळ आले आहेत. अशा स्थितीत अधिक खबरदारी घ्यावी लागेल. यंत्रणेची जबाबदारी वाढली आहेच, पण नागरिक म्हणून आपणही बेजबाबदारपणा टाळला पाहिजे. अन्यथा, नव्या संकटातून ओढवणारा अनर्थ अटळ आहे.

बातम्या आणखी आहेत...