आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
दिल्लीत काँग्रेस कार्य समितीची शुक्रवारी बैठक झाली. पक्षांतर्गत निवडणुकांचा प्रश्न त्यात उपस्थित झाला. त्याला जोडूनच पूर्णवेळ अध्यक्ष हवा, अशी मागणीही झाली. म्हटले तर नेतृत्वाला पक्षातून आव्हान मिळाले आणि म्हटले तर पक्षामध्ये तरी किमान लोकशाही आहे, असे चित्र निर्माण झाले. मे २०१९ मध्ये लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर राहुल गांधी यांनी अध्यक्षपद सोडले, तेव्हापासून सोनिया गांधी नेतृत्व करत आहेत. पक्षांतर्गत निवडणुका लवकर घ्या, मतदान घेऊन पूर्णवेळ अध्यक्ष निवडा, अशी काँग्रेसमधील एका गटाची मागणी आहे. तर, पाच राज्यांतील निवडणुकांनतर अध्यक्ष निवडण्याचा पक्षनेतृत्वाचा मानस आहे. यावरुन बैठकीत वादही झाला. पण, काँग्रेसमधील ही मतमतांतरे म्हणजे लोकशाही जिवंत असण्याचे लक्षण आहे. संभाव्य पक्ष नेतृत्वाविषयी मते मांडता येणे, काही मागण्या करता येणे, पक्षांतर्गत सुधारणा सुचवणे, ही सकारात्मक बाब आहे. हे पक्षांतर्गत बंड वा धुसफूसही नाही.
मानवी सभ्यतेला नव्या गोष्टी संघर्षातून मिळतात, असे मार्क्सवादी विश्लेषण आहे. ते मानले तर काँग्रेसमधील संघर्षाकडे उदार दृष्टीने पाहावे लागेल. एकचालुकानुवर्ती पक्षात असे काहीच घडत नसते. त्याला काही जण स्वयंशिस्त म्हणू शकतील, पण ती हळूहळू काचू लागते. पुढे हा काच बंडाचे रुप धारण करतो. मध्यंतरी काँग्रेसच्या बुर्जुर्गांनी लिहिलेल्या पत्राची पक्षनेतृत्वाने दखल घेतली आणि या नेत्यांशी चर्चासुद्धा केली. काँग्रेसमध्ये नव्या-जुन्यांचे सुरू असलेले मंथन लक्षवेधी आहे. पक्षात लोकशाही नसेल, तर सत्ता मिळाल्यावर काय होईल? काँग्रेसमध्ये घराणेशाही आहे. पण, या पक्षात लोकशाहीसुद्धा आहे. म्हणून शीर्ष नेतृत्वाला २३ नेते प्रश्न विचारू शकले. या नेत्यांनी पक्षांतर्गत प्रश्न चव्हाट्यावर आणल्याने त्यांच्याविषयी राग व्यक्त झाला, मात्र कारवाई झाली नाही. यामुळेच काँग्रेसला सर्वांना सामावून घेणाऱ्या, वाहत्या प्रवाहाची उपमा दिली जाते. काँग्रेसमध्ये लोकशाही जिवंत असल्याचे दाखवणाऱ्या ज्या गोष्टी घडत आहेत, तशा अन्य पक्षातही घडो. म्हणजे किमान बिग ब्रदर संस्कृतीचा जन्म तरी होणार नाही. आणि राष्ट्रवाद अन् देशभक्तीच्या उन्मादात कुणी लोकशाहीच्याच गळ्याला नख लावणार नाही.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.