आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अग्रलेख:बदलाचे ‘अर्थ’कारण

9 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

भारत-चीनदरम्यानचा तणाव हळूहळू निवळतोय. उभय देशांतील अधिकाऱ्यांच्या मॅरेथॉन बैठकांनंतर एकीकडे पूर्व लडाखमधून चिनी सैनिकांची माघारी सुरू आहे. दुसरीकडे, राजकीय, राजनयिक आणि व्यापार संबंध सुधारण्याला दोन्ही देश प्राधान्य देत आहेत. ‘ब्रिक्स’ देशांच्या शिखर परिषदेसाठी भारताच्या अध्यक्षपदाला चीनने पाठिंबा दिला आहे. त्यामुळे आता ही शिखर परिषद भारतात होईल. त्याच वेळी चिनी कंपन्यांच्या भारतातील सुमारे १४ हजार ४९८ कोटींच्या गुंतवणुकीच्या ४५ प्रस्तावांना मंजुरी दिली जाण्याची शक्यता आहे. गेल्या वर्षी कोरोना संसर्गापाठोपाठ सीमेवर भारतीय व चिनी सैनिक शस्त्रे परजून एकमेकांसमोर उभे ठाकल्यानंतर उभय देशांमध्ये तणाव निर्माण झाला. पण, आजच्या युगात जमिनीपेक्षाही व्यापार आणि सायबर क्षेत्रातील वर्चस्व महत्त्वाचे असते. तणावाच्या स्थितीतही भारताने चीनसोबत सर्वाधिक ७७.७ अब्ज डॉलरचा, तर अमेरिकेसोबत ७५.९ अब्ज डाॅलरचा व्यापार केला. चीनमध्ये आपली निर्यातही गेल्या वर्षी ११ टक्के (१९ अब्ज डॉलर) वाढली आहे. चीनविरोधी वातावरण तापल्यानंतर भारताने तडकाफडकी अनेक चिनी अॅपवर बंदी घातली. चीनच्या ताब्यातील हाँगकाँगमार्गे होणारी अमेरिका आणि जपानी कंपन्यांची गुंतवणूकही थांबली होती.

पाकिस्तानला गिलगिट-बाल्टिस्तानमध्ये उपद्रव सुरू करण्यास चीनने िचथावले होते. पण, ‘सीपेक’वरून पाकसोबत वितंडवाद सुरू झाल्याने भारताची कोंडी होण्याएेवजी चीनच अडचणीत आला. अमेरिकेसोबतचे चीनचे व्यापारी संंबंधही तुटल्यासारखेच आहेत. त्यामुळे व्यापार-उदिमासाठी भारतासारखा बलाढ्य शेजारी गमावणे चीनला परवडणारे नाही. शिवाय, भारतही आता १९६२ मध्ये होता तसा राहिलेला नाही, हे चीनही जाणून आहे. परराष्ट्रतज्ज्ञांच्या मते, डेटा आणि आर्थिक क्षेत्र संवेदनशील समजले जाते, तर आॅटोमोबाइल, इलेक्ट्रॉनिक आणि कापड उद्योग हे बिगर संवेदनशील स्वरूपाचे मानले जातात. त्यामुळे चिनी कंपन्यांची गुंतवणूक या चार बिगर संवेदनशील क्षेत्रांत होण्याची शक्यता आहे. विशेषत: भारताला उत्पादन क्षेत्रात गुंतवणूक हवी आहे, जेणेकरून रोजगारवृद्धी होईल. आंतरराष्ट्रीय राजकारण भावनेपेक्षाही अर्थकारणाभोवती फिरत असते. भारत आणि चीनचे बदलते संबंध हे त्याचेच प्रतीक आहे.

बातम्या आणखी आहेत...