आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अग्रलेख:बहुस्वरधारिणी

6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

ज्येष्ठ पार्श्वगायिका आशा भोसले यांना ‘महाराष्ट्र भूषण’ सन्मान जाहीर करून राज्य शासनाने एका ‘बहुस्वरधारिणी’ व्यक्तिमत्त्वाचा उचित गौरव केला आहे. गेली सुमारे सहा दशके अविरतपणे आपल्या उत्फुल्ल, चैतन्यमयी आणि ऊर्जायुक्त स्वरांच्या वर्षावाने आशाताईंनी रसिकांना आनंद दिला आहे. केवळ हिंदी चित्रपटसृष्टीच नव्हे, तर अनेक भारतीय भाषांत आणि काही विदेशी भाषांमध्येही आशाताईंनी गाणी गाऊन आपला गायनपट वर्धिष्णू ठेवला आहे. मा. दीनानाथांकडून संगीताचा वारसा लाभलेल्या आशाताईंनी अनेक संगीतगुरूंकडून मार्गदर्शन घेत, स्वत:ची एकमेवाद्वितीय अशी गायनशैली विकसित केली. त्यांनी मराठी चित्रपटसृष्टीतही मोलाचे योगदान दिले आहे. केवळ मराठी चित्रपटगीतेच नव्हे, तर भावगीते, भक्तिगीते, संतरचना आणि नाट्यसंगीतातही त्यांनी वेगळा ठसा उमटवला. दुडदुडत्या बाळपावलांपासून ते डुगडुगत्या मानेच्या बुजुर्गांपर्यंतच्या सर्व पिढ्या त्यांनी आपल्या स्वरांनी एका धाग्यात गुंफल्या आहेत. चुनरिया (१९४८) या चित्रपटापासून सुरू झालेला आशाताईंचा पार्श्वगायनाचा प्रवास सांप्रत काळच्या ओटीटी प्लॅटफॉर्मपर्यंत अविरत सुरू आहे. मानवी जीवनातील प्रत्येक भावनेला आशाताईंचा उत्कट स्वर लाभला आहे.

ज्या वयात माणसे निवृत्त होतात, त्या साठीच्या टप्प्यावर आशाताईंनी ‘जानम समझा करो’ या पाॅप अल्बमच्या रूपाने नवी वाट चोखाळली. पुढच्या टप्प्यावर तर त्या ‘राहुल अँड आय’ या अल्बमच्या माध्यमातून चक्क रिमिक्स चळवळीत उतरल्या. त्यांची सारी वाटचाल दर्जा राखूनही सतत कालसुसंगत राहिली, हे लक्षणीय आहे. करिअरच्या दृष्टीने विचार करता, एकाच क्षेत्रात, मोठ्या बहिणीचे कलाकर्तृत्व आभाळभर विस्तारले असताना त्याच क्षेत्रात स्वत:चे स्वतंत्र आभाळ निर्माण करण्याची किमया आशाताईंनी घडवली. अनेक भाषा आणि त्यातील विविध भावस्थिती आपल्या स्वरांतून व्यक्त करताना या चैतन्याने रसरसलेल्या, भावपूर्ण, लयदार, पल्लेदार, नाट्यात्म परिणाम साधणाऱ्या स्वराने मनामनाशी सुरेल नाते जोडत रसिकांचे प्रेम मिळवले. पुरस्कारालाही भूषण वाटावे, अशा आशाताईंचे अभिनंदन करताना त्यांच्याच गीताचा आधार घेऊन ‘राहो अभंग प्रीती, राहो अभंग नाते’ असे म्हणावेसे वाटते.

बातम्या आणखी आहेत...