आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अग्रलेख:भावनेचं राजकारण

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

परवा मुंबईत बेळगाव सीमा प्रश्नासंदर्भातील ग्रंथाचे प्रकाशन झाले. त्यानिमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे काही बोलले. त्याला प्रत्युत्तर कर्नाटकच्या उपमुख्यमंत्र्यांनी त्याच भाषेत दिले. लागलीच कर्नाटक अन् महाराष्ट्र आमने-सामने आले. हा वाद दोन भिन्न भाषकांतला भासत असला, तरी आताच्या वादाचे मूळ भाजप अन् शिवसेना या जुन्या मित्रांत वाढलेल्या वितुष्टामध्ये आहे. इकडे शिवसेना सत्तेत आहे, तिकडे भाजप आहे. यांनी म्हटले बेळगाव केंद्रशासित करा, त्यांनी म्हटले मुंबई केंद्रशासित करा. एखादा भूप्रदेश केंद्रशासित करण्याचा अधिकार संसदेचा, पर्यायाने केंद्रीय सत्तेचा आहे. केंद्रात भाजपकडे पाशवी बहुमत आहे. बेळगाव सीमा प्रश्नाचे गेली ६० वर्षे हेच घडत आले आहे. हा प्रश्न कोणत्याही राष्ट्रीय पक्षाला सोडवायचा नाही. जो पक्ष यात पडेल, तो कर्नाटकातली सत्ता चार-पाच दशके घालवून बसेल. त्यामुळे भाजप असो किंवा काँग्रेस, ते कधीच बेळगाव प्रश्नाला हात लावणार नाहीत. आता उरले प्रादेशिक पक्ष. त्यांची लाख इच्छा असो, या प्रश्नाचा सुकाणू केंद्राच्या हाती आहे. भले प्रादेशिक पक्ष केंद्रात भागीदार असतील. मग, शिवसेना २० वर्षे भाजपप्रणीत एनडीएचा घटक पक्ष होता. त्या काळात कर्नाटकात, केंद्रात अन् महाराष्ट्रात भाजप- शिवसेना युतीची सत्ता होती. काय झाले? त्या वेळी सारे थंड होते.

१ नोव्हेंबरला आम्ही बेळगावला जाणार, तिथल्या मराठी भाषकांना काळा दिवस पाळण्यासाठी बळ देणार. असले उद्योग कोणी, काय म्हणून खपवून घेईल? कर्नाटकाने मराठी भाषा संपुष्टात आणली, अशी टीका केली जाते. पण, महाराष्ट्र शासन सीमा भागातल्या किती शाळांना अनुदान देते? बेळगावच्या किती ग्रंथालयांना अनुदान देते? बेळगाव जरूर कर्नाटकात आहे, पण संस्कृती अन् भाषा कोणतेही सरकार संपवू शकलेले नाही. आम्ही बेंबीच्या देठापासून बेळगाव मागत राहणार अन् त्याच वेळी सीमा भागातील जत तालुक्यामधील २० गावे आम्हाला कर्नाटकात जायचे असल्याची मागणी करत राहणार. हे असे का? सीमा भागातल्या २० लाख मराठी बांधवांच्या पाठीशी महाराष्ट्राने जरूर उभे राहावे, पण भावनेच्या राजकारणात त्यांना भुलवत ठेवू नये. कारण भावनेच्या राजकारणात अंतिमत: पराभव पदरी येतो.

बातम्या आणखी आहेत...