आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अग्रलेख:जगाच्या नेतृत्वाची संधी

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

यंदा स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षाला सुरुवात होत असताना भारताला संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या अध्यक्षपदाचा बहुमान मिळाला आहे. सुरक्षा परिषदेतील १० पैकी एका हंगामी सदस्याला रोटेशन पद्धतीने दोन वर्षांकरिता परिषदेत सदस्यत्व मिळते. त्यानुसार भारताला हे सदस्यत्व आणि त्यासोबतच आॅगस्टमधील बैठकीचे अध्यक्षपद मिळाले आहे. येत्या आॅगस्ट क्रांतिदिनी, म्हणजे ९ आॅगस्टला सुरक्षा परिषदेची बैठक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडणार आहे. दूरदृश्य प्रणालीवर ही बैठक होईल. यापूर्वी १९९२ मध्ये तत्कालीन पंतप्रधान पी. व्ही. नरसिंह राव यांनी बैठकीत उपस्थिती नोंदवली होती. आगामी बैठकीत भारत दहशतवाद, सागरी सुरक्षा आणि शांती पथकाच्या मुद्द्यांवर भर देऊ शकतो.

अमेरिकन फौजा परत गेल्यानंतर अफगाणिस्तानात पुन्हा तालिबानी दहशतवाद्यांनी डोके वर काढले आहे. तसेच दक्षिण हिंद महासागरात चिनी नौदलाची वाढती आक्रमकता हे दोन मुद्दे भारताच्या दृष्टीने विशेषत्वाने चिंतेचे आहेत. सुरक्षा परिषदेचा अध्यक्ष या नात्यानेे ऑगस्टमधील बैठकांची कार्यक्रम पत्रिका ठरवण्याची जबाबदारी भारताकडे असल्याने त्यानुसार परराष्ट्र नीतीच्या दृष्टीने घेतले जाणारे निर्णय दूरगामी परिणाम करणारे ठरू शकतात. कारण सुरक्षा परिषदेचे निर्णय सर्व देशांसाठी बंधनकारक असतात. वास्तविक अमेरिका, ब्रिटन, फ्रान्स, जर्मनी आणि चीन या पाच महासत्तांसोबत सुरक्षा परिषदेत स्थायी सदस्यत्व मिळण्यासाठी भारत अनेक वर्षे प्रयत्न करीत आहे. त्याला अद्याप यश आले नसले, तरी या महिन्याचे अध्यक्षपद आणि दोन वर्षांच्या हंगामी सदस्यत्वाचा काळ देशाच्या परराष्ट्र धोरणाच्या दृष्टीने महत्त्वाचा ठरणार आहे. संपूर्ण जग कोरोना आणि त्यानंतरच्या आर्थिक तसेच अन्य आव्हानांना सामोरे जात असताना भारताकडे आलेले सुरक्षा परिषदेचे नेतृत्व जगासाठी दिशादर्शक ठरेल, अशी अपेक्षा करण्यास हरकत नाही.

बातम्या आणखी आहेत...