आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अग्रलेख:गॅसचा भडका, महागाईचा तडका

अग्रलेख21 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

वाढता वाढता वाढे ती महागाई. याच महागाईच्या मुद्द्यावरून सात वर्षांपूर्वी विरोधी बाकावर असलेल्यांनी त्या वेळच्या सरकारला सळो की पळो करून सोडले होते. आता त्या महागाईकडे सत्ताधारी ढुंकूनही पाहायला तयार नाहीत. स्वयंपाकाच्या गॅसचे सिलिंडर २०१४ मध्ये ४१० रुपयांना होते. सध्या ते ८८५ रुपयांवर पोहोचले आहे. पेट्रोलचे दर सात वर्षांच्या तुलनेत ४२ टक्क्यांनी, तर डिझेलचे दर ५५ टक्क्यांनी वाढले आहेत. पेट्रोल, डिझेलने दराचे शतक पूर्ण केले. अर्थव्यवस्थेचा महत्त्वाचा घटक असलेले घाऊक आणि किरकोळ महागाई दर गेल्या काही महिन्यांपासून भारतीय रिझर्व्ह बँकेच्या सहनशील पातळीपलीकडे पोहोचले आहेत. घरगुती गॅस, पेट्रोल, डिझेल, डाळी, खाद्यपदार्थ आणि जीवनावश्यक वस्तूंच्या किमती सातत्याने वाढत आहेत. त्यात गॅस दराच्या भडक्याची झळ खिशाला बसणार आहे. डिसेंबरपासून सिलिंडरची किंमत सुमारे २७५ रुपयांनी वाढली आहे. कोरोनाच्या संकटामुळे विस्कळीत झालेले मागणी-पुरवठ्याचे गणित जुळत असतानाच महागाईच्या फटक्याने सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे.

आगामी काळातही महागाईचा दर ५ ते ६ टक्के राहील, असे मत मुख्य आर्थिक सल्लागार के. व्ही. सुब्रमण्यम यांनी व्यक्त केले आहे. गगनाला भिडणारी महागाई वेळीच रोखण्यासाठी सरकार काही पावले उचलणार का, हा खरा प्रश्न आहे. पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या किमतीत केंद्र आणि राज्य सरकारच्या करांचा मोठा वाटा आहे. याबाबत सरकार ढिम्म आहे. इंडियन ऑइलने गेल्या आर्थिक वर्षात २१,७६२ कोटी, तर हिंदुस्थान पेट्रोलियमने १०,६६४ कोटी रुपयांचा घसघशीत नफा कमावला आहे. सर्वसामान्यांना महागाईचे तडाखे देत राहणे सरकारला परवडणार नाही. महागाईच्या या मुद्द्यात सरकारला मतपेटीतून धक्का देण्याची ताकद आहे, हे याचा अनुभव असलेल्या सत्ताधाऱ्यांनी तरी विसरता कामा नये.

बातम्या आणखी आहेत...