आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अग्रलेख:पवार जेव्हा काही बोलतात...

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

कोणत्या व्यासपीठावर, कोणत्या प्रसंगी काय आणि किती बोलावे, हे ज्याला नेमके कळते तो केवळ याच गुणावर हवे ते साध्य करू शकतो. राजकारणात या गुणाला अपार महत्त्व आहे, पण तो सगळ्यांकडेच असत नाही. असे अवधान हेच ज्यांचे बलस्थान आहे, ते शरद पवार त्यामुळेच राजकारणातील सर्वकालीन ‘पॉवर’ ठरतात. वक्तव्याची अचूक वेळ साधण्याच्या अशा कौशल्यामुळे पवार जेव्हा काही बोलतात तेव्हा त्याची बातमी होते. पवार जे बोलतात त्याच्या नेमके विपरीत वागतात, असा त्यांच्याबद्दल लोकप्रिय गैरसमज आहे. कारण त्यांच्या विधानावरील चर्चाचर्वण पूर्ण होण्याआधीच त्यांचे त्या विधानामागील ‘राजकारण’ साध्य झालेले असते. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर केलेले भाजपसोबत जाण्याचे विधान आणि त्यातून काय साध्य झाले, हे त्यांनी नुकतेच एका मुलाखतीत सांगितले.

शिवसेनेवर दबाव आणणे, सेना-भाजप युती तोडणे आणि महाविकास आघाडीचे बीज पेरणे या तीन खेळ्या त्यांनी त्या एका वक्तव्यातून यशस्वी केल्या. त्या वेळी निवडणूक निकालाच्या दिवशी ‘जनमत आमच्या बाजूने नाही’ असे सांगणाऱ्या पवारांनी सत्तापट मात्र मुत्सद्देगिरीने आपल्या बाजूला फिरवला. त्यांचे असे प्रत्येक विधान हे केवळ घडामोडींवरील तत्कालीन टिप्पणी नाही, तर राजकीय रणनीतीचा भाग ठरत आली आहे. आपल्या विधानातून काय घडू शकते, याचा अचूक अंदाज त्यांना असतो आणि म्हणूनच ते अनेकदा मुद्दामहून तसा एखादा बाण सोडतात. त्यामुळे ‘बेभरवशी’ या आक्षेपापेक्षाही ‘अनाकलनीय’ अशा रूपात ते ‘अनप्रेडिक्टेबल’ ठरतात. कुणालाही थांग न लागण्याच्या त्यांच्या या गुणामुळे समोरासमोरच्या लढाईत विजय मिळण्यापेक्षाही अनेकदा विरोधकाच्या खेम्यात खळबळ निर्माण होते आणि तीच भविष्यातील यशाची नांदी ठरते. एका प्रश्नावरील उत्तराच्या निमित्ताने का होईना, २०१९ मधील मोदींसोबतचा बंद दाराआडचा संवाद आणि दाराबाहेरच्या वक्तव्याचे गुपित उघड करत पवारांनी २०२४ ची बेगमी तर केली आहेच; शिवाय राज्यात आपल्यासोबत सत्तास्थापनेसाठी शिवसेनेला कसे भाग पाडले, हे सांगत उधळणाऱ्या सेनेला काबूत ठेवण्याचा हेतूही साध्य केला आहे.