आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अग्रलेख:सदाबहार अभिनेता

3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

रुपेरी पडदा हे कॅमेऱ्याचे साम्राज्य असते आणि कॅमेरा निर्दयीपणे खरे बोलतो, असे म्हटले जाते. अशा कॅमेऱ्यासमोर तब्बल साडेसहा दशके ताकदीने उभे राहून आपल्या कलागुणांचा सातत्यपूर्ण आविष्कार करण्याची किमया करणारे अभिनेते रमेश देव हे अतिदुर्मिळ कलाकार होते. देखणे, राजबिंडे व्यक्तिमत्त्व त्यांना लाभले होते, पण व्यावसायिक कलाक्षेत्रात तेवढे पुरेसे नसते. दैवदत्त अनुकूलतेला स्वतःच्या परिश्रमांची, अभ्यासाची, वक्तशीरपणाची, कामावरील निष्ठेची आणि व्यावसायिक शिस्त व सभ्यतेची जोड असावी लागते. रमेश देव यांनी हे सारे स्वत:मध्ये बाणवले होते. त्यामुळेच सुमारे ६५ वर्षांची सुदीर्घ आणि यशस्वी कलाकारकीर्द ते उभारू शकले. मराठी चित्रपट सुरुवातीला कोल्हापूर आणि मग पुण्यात निर्माण होत असत. त्या काळापासून रूपेरी पडद्यावर वावरलेल्या देव यांनी काळानुसार अनेक बदलही स्वीकारण्याची लवचिकता ठेवली. सदैव आपल्याच एका विशिष्ट काळाचे तुणतुणे वाजवणारी मंडळी काळाच्या ओघात अप्रिय होत जातात. रमेश देव हे त्याला सुखद असे अपवाद होते.

सुमारे बारा वर्षे मराठी चित्रपटसृष्टीत अधिराज्य गाजवल्यावर एका जिद्दीने ते हिंदी चित्रपटसृष्टीत दाखल झाले आणि अधिकच यशस्वी ठरले. २८५ हिंदी चित्रपट, १९० मराठी चित्रपट आणि ३० नाटके; याशिवाय अनेक चित्रपटांची, जाहिरातपटांची, लघुपटांची निर्मिती, दिग्दर्शन असा देवांच्या कलाप्रतिभेचा विस्तीर्ण पट अचंबित करणारा आहे. भूमिकेची लांबी-रुंदी न पाहता कामावर निष्ठा ठेवणारा आणि ‘स्टार’पणा न दाखवता मराठी रंगभूमीवर शेकडो प्रयोग रंगवणारा हा सदाबहार अभिनेता अखेरपर्यंत सर्वांना हवाहवासा वाटतो, यातच त्यांचे यश सामावले आहे. सहजीवनातील पत्नी सीमा यांच्या उत्कट साथीमुळे कला क्षेत्राप्रमाणेच त्यांचे व्यक्तिगत आयुष्यही समृद्ध झाले. चित्रपट विश्वातील तांत्रिक, यांत्रिक बदल देव यांनी तत्परतेने आत्मसात केले. खलनायकही देखणा असू शकतो, हे त्यांनी सिद्ध केले. नायक, खलनायक, सहनायक आणि चरित्र अभिनेता या चतुःसूत्रीचा डोळस स्वीकार त्यांनी केला. अनेक गरजूंना मदतीचा हात दिलेल्या आणि आपल्या आडनावाचे सार्थक केलेल्या या उमद्या, चिरतरुण अभिनेत्याला आदरांजली!

बातम्या आणखी आहेत...