आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अग्रलेख:ममतांचे एक पाऊल पुढे...

15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

कधी काळी ‘माँ, माटी, मानुष’ अशी घोषणा देत पश्चिम बंगालमधील डाव्यांच्या सत्तेला सुरुंग लावणाऱ्या ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसने आपली मुळे आता देशात अन्यत्र पसरवण्याची तयारी सुरू केली आहे. देशभर चौखूर उधळलेला भाजपचा विजयरथ तृणमूलने बंगालमध्ये यशस्वीपणे रोखला. भवानीपूरच्या पोटनिवडणुकीत दणदणीत विजय मिळाल्याने ममता आणि तृणमूलचा आत्मविश्वास निश्चितच दुणावला आहे. आसामनंतर आता त्रिपुरा आणि गोव्यातील विधानसभा स्वबळावर लढवण्याची तयारी तृणमूलने सुरू केली आहे. सत्ताधाऱ्यांचे नामदार-आमदार फोडून आपल्या गोटात घेण्याची भाजपचीच चाल त्यांच्यावर उलटवण्याची प्रतिचाल खेळण्यास तृणमूलने सुरुवात केली आहे. बंगालातील भाजपचे नेते, माजी मंत्री बाबुल सुप्रियो, गोव्यातील काँग्रेस नेते, माजी मुख्यमंत्री लुईजिन्हो फलेरो यांसारख्या नेत्यांना तृणमूलच्या सावलीत घेणे, ही याचीच उदाहरणे. गोवा, त्रिपुरात स्वबळावर लढण्याची तृणमूलची योजना म्हणजे देशव्यापी मोहिमेची लिटमस चाचणी म्हणावी लागेल.

तृणमूलला देशव्यापी करण्याची नियोजनबद्ध तयारी ममतांनी केली असल्याचे यातून दिसते. त्यासाठी पडद्यामागे महत्त्वाची भूमिका बजावणारे आपले भाचे अभिषेक बॅनर्जी यांच्याकडे तृणमूलच्या देशव्यापी योजनेचे नेतृत्व राहणार आहे. ‘नो व्होट टू बीजेपी’ हे बंगाली माॅडेलच गोवा आणि त्रिपुरात तृणमूल चालवणार आहे. केवळ बंगालपुरतेच मर्यादित राहिलो तर आपली राष्ट्रीय महत्त्वाकांक्षा कधीच पूर्ण होणार नाही, याची जाणीव ममतांना आहे. गोवा, त्रिपुरातील विरोधी गोटातील महत्त्वाचे मोहरे आपल्या पटावर घेत ममतांनी राष्ट्रीय राजकारणात एक पाऊल पुढे टाकले आहे. या दोन राज्यांत तृणमूलला गमावण्यासारखे काहीच नाही. यात थोडे यश मिळाले तरी तृणमूलचे रोपटे अन्य राज्यांतील मातीत रुजण्याचे काम मात्र होणार आहे. असे झाले तर २०२४ ची लोकसभा निवडणूक भाजपसाठी सोपी राहणार नाही.

बातम्या आणखी आहेत...