आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अग्रलेख:सामना रंगणार!

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

देशात काँग्रेसची स्थिती बिकट आहे. महाराष्ट्रातही तशीच अवस्था असलेल्या प्रदेश काँग्रेसला नाना पटोले यांच्या रूपाने धडाकेबाज नेता लाभला आहे. नाना शेतकरी नेते आहेत. नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस यांंच्या कार्यशैलीचे ते कट्टर विरोधक आहेत. त्यामुळे ही वैदर्भीय तोफ भाजपवर धडाडणार, यात शंका नाही. अशोक चव्हाण, बाळासाहेब थोरात, पृथ्वीराज चव्हाण, विजय वडेट्टीवार, नितीन राऊत हे राज्यातील काँग्रेसचे पहिल्या फळीचे नेते. पैकी राऊत सोडले तर इतर नेत्यांनी तलवारी म्यान केल्या आहेत. प्रदेश काँग्रेसचे नेते भाजपला इतके घाबरतात की प्रेस नोटमध्येसुद्धा मोदी, शहा, फडणवीस यांची नावे नको रे बाबा, अशी त्यांची भूमिका असते. अशा पार्श्वभूमीवर नानांच्या हाती महाराष्ट्र काँग्रेस आली आहे.

ओबीसी आणि शेतकरी हा त्यांच्या राजकारणाचा केंद्रबिंदू आहे. त्यात ओबीसी हा भाजपचाही आधार आहे. ओबीसींच्या मुद्द्यावरच नानांनी भाजपशी पंगा घेतला होता. भाजपमध्ये असताना मोदींवर जाहीर टीका करण्याची हिंमत त्यांनी दाखवली होती. त्यामुळे आता नाना आणि भाजप यांच्यात सामना रंगणार आहे. भाजपमधून आलेल्या नानांवर काँग्रेसचा पूर्ण विश्वास नाही, असे मध्यंतरी चित्र होते. नाना ही दुधारी तलवार आहे, असे काँग्रेसला आजही वाटत असावे. त्यामुळेच त्यांच्या जोडीला ६ कार्याध्यक्ष, १० उपाध्यक्ष दिले आहेत. एका अर्थाने हे नानांच्या अधिकाराचे विकेंद्रीकरणच आहे. प्रदेशाध्यक्षपदासोबत नानांना मंत्रिपदही हवे आहे. मात्र, ते इतक्यात मिळेल असे नाही. काँग्रेसचा संघटनात्मक खर्च भागवतानाच पक्ष बळकट करण्याचे काम त्यांना करावे लागेल. नाना सहकार वा शिक्षण क्षेत्रातील सम्राट नाहीत. त्यात काँग्रेसमधील सगळे सुभेदार आपापले गड सांभाळून असतात. त्यामुळे नानांना ही कोंडी फोडावी लागणार आहे. महापालिका आणि जिल्हा परिषदांच्या निवडणुका तोंडावर आहेत. ती नानांची पहिली परीक्षा ठरेल. ईडीच्या भीतीने राज्यातील भाजपविरोधक गप्पगार आहेत. त्या पार्श्वभूमीवर बिनधास्त, बेधडक वृत्तीचे नाना मैदानात उतरले आहेत. त्यांना नेत्यांची साथ मिळाली तर महाराष्ट्रात काँग्रेसला बरे दिवस येतील, अशी आशा आहे.

बातम्या आणखी आहेत...