आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अग्रलेख:या विषाणूचे काय ?

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

सरकार कुणाचेही असाे, वाढत्या महिला अत्याचारांचा डाग महाराष्ट्राच्या भाळी कायम आहे. ग्रामीण भागातीलच नव्हे, तर शहरी, उच्चशिक्षित, नाेकरदार महिलांनाही हा जाच पावलाेपावली सहन करावा लागताे आहे. समाज मात्र डाेळ्यावर पट्टी बांधल्यागत माता-भगिनींचे ‘वस्त्रहरण’ पाहत राहताे. परवा जळगावच्या शासकीय वसतिगृहातील कथित महिला अत्याचाराचे प्रकरण बरेच गाजले. चाैकशीअंती हे सर्व केवळ सनसनाटीसाठी रंगवलेले नाट्य असल्याचा भंडाफाेड झाला. सुदैवाने हे प्रकरण खरे नसले तरी ग्रामीण भागातील वसतिगृहे, आश्रमशाळांतील अनेक मुली-महिलांचे आयुष्य अशा अत्याचारांनी हाेरपळले आहे. आैरंगाबादेतील काेविड सेंटरमध्येही डाॅक्टरने एका रुग्ण महिलेच्या असहायतेचा गैरफायदा घेत तिच्यावर वाईट नजर टाकली. या संतापजनक घटनेचे विधिमंडळातही पडसाद उमटले. सरकारने तातडीने वासनांध डाॅक्टरला बडतर्फ केले. पण केवळ एवढीच वरवरची कारवाई करून चालणार नाही, तर अशा रानटी वृत्तींना कायमस्वरूपी लक्षात राहील असा धडा शिकवण्याची गरज आहे. पीडितेने पाेलिसांत तक्रार देणे टाळले, ज्या केंद्रात हा प्रकार झाला तेथील मनपाच्या अधिकाऱ्यांनीही डाॅक्टरविराेधात फिर्याद देण्याचे धाडस दाखवले नाही.

या सर्वांनाच आपल्या बदनामीची भीती. मात्र, त्यामुळे तो पुन्हा माेकाट राहिला. उस्मानाबादेत पाेलिसाच्या जाचाला कंटाळून एका महिलेने जीवनयात्रा संपवली. वर्दीच्या आड लपलेल्या या राक्षसाविराेधात वेळीच तक्रार दिली असती, तर कदाचित आज ती जिवंत असती. बदनामीच्या भीतीचे जाेखड झुगारून अत्याचाराविराेधात महिला दाद मागत नाहीत, ताेपर्यंत अशा वासनांध प्रवृत्तीच्या लाेकांना जरब बसणार नाही. त्यामुळेच बीडमधील एका प्राध्यापिकेने दाखवलेले धाडस काैतुकास्पद वाटते. सहकारी प्राध्यापकाने जेव्हा वारंवार अश्लील व्हिडिआे पाठवून तिचा विनयभंग केला, तेव्हा जराही न डगमगता तिने शिक्षकी पेशाला काळिमा फासणाऱ्याविराेधात फिर्याद दिली. चार वर्षे न्यायालयीन लढा देऊन त्याला पाच वर्षे तुरुंगात खडी फाेडायला पाठवले. जाेपर्यंत महिला अशा ‘रणरागिणी’च्या रूपात पुढे येऊन दाद मागणार नाहीत, यंत्रणेला जाब विचारणार नाहीत, ताेपर्यंत अशा विकृत वासनेच्या विषाणूला आळा घालणे कठीण आहे.

बातम्या आणखी आहेत...