आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्मरण:एकनाथजी : एक जीवनव्रती

औरंगाबाद8 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोणत्याही प्रकारचे कार्य उभे करायचे म्हटले की त्यामागे सामाजिक-आध्यात्मिक वा राष्ट्रीय प्रेरणा असणे अत्यंत गरजेचे असते. एकनाथजींनी उभे केलेले हे कार्य म्हणजे त्रिवेणी प्रवाहाचा संगमच आहे. एकनाथजींनी उभे केलेले हे कार्य केवळ भारतापुरतेच सीमित नसून विश्वव्यापक आहे.

विवेकानंद केंद्राचे कार्य म्हणजे मनुष्य निर्माण व राष्ट्र उभारणी या उदात्त हेतूंनी प्रेरित झालेली संघटना असे जरी असले तरी आध्यात्मिक प्रेरणेतून चालणारे सेवा कार्य अशी संकल्पना मनी बाळगून एकनाथजींनी हे कार्य उभे केले होते. हे कार्य उभे करीत असताना स्वामीजींचा संदेश जनमानसात पोहोचविणे हा हेतू एकनाथजींच्या मनात होता. स्वामी विवेकानंदांचा असा कोणता बरं संदेश एकनाथजींच्या मनांत खोलवर झिरपलेला होता की जो प्रत्यक्ष कृतीत उतरवून सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचविणे त्यांना अत्यावश्यक वाटले? Arise, Awake, And Stop Not Until The Goal is Reached...दशोपनिषदांपैकी स्वामीजींना अत्यंत प्रिय असलेल्या अशा कठोपनिषदांतील उत्तिष्ठत जाग्रत प्राप्यवरान्नि बोधत| क्षुरस्य धारा निशिता दुरत्यया दुर्गं पथस्तत्कवयो वदन्ति|या मंत्राचा असलेला मतितार्थ म्हणजेच स्वामीजींचा Arise, Awake हा संदेश. हा संदेश वाचल्यानंतर एकनाथजींच्या मनांत आध्यात्मिक प्रेरणेतून चालणारे सेवा कार्य अशी विवेकानंद केंद्राच्या कार्याची संकल्पना का बरं होती याचे उत्तर आपणांस सहजतेने मिळते.

विवेकानंद केंद्राचे चालणारे राष्ट्रीय सामाजिक स्वरुपाचे कार्य लक्षात घेता या कार्याशी संबंधित व्यक्तीने कोणत्या वृत्ती अंगीकारल्या पाहिजेत याबद्दल एकनाथजींच्या संकल्पना स्पष्ट होत्या. पहिली वृत्ती म्हणजे सेवाभाव. कोणतेही सेवा कार्य करताना तत्संबंधी कार्यकर्त्यांच्या मनात सेवाभाव उत्कटतेने जागृत असला पाहिजे. शिवाय, मी या समाजाचा एक घटक असून त्या समाजाचं काही देणं लागतो याचे भान मनात सतत जागते असले पाहिजे. दुसरं म्हणजे श्रध्दा. श्रध्दा म्हणजे अढळ विश्वास. स्वत:वरचा आणि स्वतःच्या विचार शक्तीवरचा विश्वास. जेव्हा आपण ध्येय ठरवून त्यानुसार मार्गक्रमण करतो तेव्हा अनेकदा ध्येयापासून चित्त विचलित होईल असे अडथळे, संकटं आपल्यासमोर उभी ठाकतात. कसोटीचे क्षण येतात. अशा वेळी आपला स्वतःवरील, ध्येयावरील विश्वास ढळू न देणे गरजेचे असते. तिसरं म्हणजे, समर्पण वृत्ती. श्रीमद्भगवद्गीतेत समर्पणाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. समर्पण म्हटले की, त्याग हा आलाच. जेव्हा एखादा कार्यकर्ता कार्य करण्यासाठी म्हणून बाहेर पडतो तेव्हा त्याला वैविध्यपूर्ण अडचणींना सामोरे जावे लागते. त्यावेळी आपला अहंकार, क्रोध या व अशा सर्व विकारांचे दमन करुन शांत वृत्तीने आल्या परिस्थितीशी सामना करावा लागतो. अशा वेळी संघटन कौशल्य पणाला लावून To Handle Yourself, Use Your HEAD But; To Handle Others Use Your HEART...! हे पक्के ध्यानात ठेऊन सामूहिकरीत्या संघर्षाला सामोरे जावे लागते.अशा वेळी एखाद्या वाटचालीला प्रारंभ करणे वा पुढाकार घेणे, संघर्षाशी लढताना साहस व निष्ठा पणाला लावणे, चारित्र्य व कार्य दोन्हींचे पावित्र्य राखणे या व अशा गुणांनी युक्त असा कार्यकर्ता असावा लागतो.

आज एकनाथजींनी उभे केलेले हे कार्य पाहिले की हे सर्व गुण एकनाथजींच्या अंगी एकवटलेले होते त्यामुळेच एवढे कार्य उभे राहिले याची जाणीव होते. त्यांच्या स्मृतीला विनम्र अभिवादन...!

प्रांजली कुलकर्णी संपर्क : ८९९९७०३७५७

बातम्या आणखी आहेत...