आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मधुरिमा विशेष:कलेतून रोजगार...

औरंगाबाद3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

नेहमीच्या आयुष्यात चैतन्य निर्माण करण्याचे कार्य सण-उत्सव करतात. गणपती उत्सव त्यापैकीच एक. गणरायाचे स्मरण होताच त्याची सुंदर, मनमोहक, सोज्वळ रूपे डोळ्यासमोर तरळतात. मूर्ती तयार करणं म्हटलं की स्वाभाविकपणे पुरुष मूर्तिकारांचीच प्रतिमा डोळ्यासमोर येते. मात्र, मागील काही वर्षांत गणेशमूर्ती घडवण्यामध्ये महिलांचा सहभाग लक्षणीय वाढलाय.

पर्यावरणपूरक गणेशोत्सव म्हटलं की शाडू मातीच्या मूर्ती हे समीकरण अलीकडच्या काळात रूढ झालंय. अर्थात पर्यावरण संरक्षणासाठीच्या प्रयत्नांचं ते एक फलित म्हणावं लागेल. आणि त्यामुळेच महाराष्ट्रात गणेशोत्सवाच्या काही दिवस आधीपासून अनेक ठिकाणी शाडू मातीच्या मूर्ती तयार करण्याच्या कार्यशाळांचे आयोजन केले जात असते. महिला आपल्या मुलांसोबत कार्यशाळेत सहभागी होताना दिसतात. विशेष म्हणजे अनेक महिला अशा कार्यशाळेत सहभागी होऊन सरावाने काही काळानंतर स्वत: गणेशमूर्ती तयार करून विकत आहेत. यामुळे हजारो गरजू महिलांना रोजगारही प्राप्त झालाय. उत्सव काळात ३० ते ५० मूर्ती एक महिला सहज तयार करते. यामुळे कलावंत महिलांसाठी गणेशोत्सव भरभराटीचा ठरतो आहे.

शाडू मातीच्या मूर्तीची मागणी प्रचंड आहे. घरगुती पातळीवर या मूर्ती तयार करता येतात. अशा प्रकारे मूर्ती करणाऱ्यांना जाहिरात किंवा दुकान थाटायचीही गरज नसते. त्यामुळे दुकानाचे भाडे वाचते, शिवाय ग्राहकांना स्वत: मूर्तिकारांच्या घरी जाऊन मूर्ती खरेदी करता येते. या सर्व सकारात्मक बाजूंमुळे या काळात मूर्तिकार महिला २५ हजार ते १ लाखांपर्यंतची कमाई करतात. उत्पन्नात दरवर्षी नक्कीच वाढ होते आहे.

घरकाम करणाऱ्या महिलांना मिळाला सन्मानाचा रोजगारकोरोनाकाळात घरकामगारांचा रोजगार गेला. त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली. मुलांचे शिक्षण थांबले. अशा वेळी अकोल्यातील सामाजिक कार्यकर्ता सविता अढाऊ यांनी या महिलांना गणपती मूर्ती तयार करण्याचे प्रशिक्षण दिले. घरी रिकामे बसण्यापेक्षा काहीतरी नवीन शिकूया, अशा विचाराने जवळपास ५० महिलांनी प्रशिक्षण वर्गाला हजेरी लावली. कार्यशाळेनंतर घरकाम करणाऱ्या महिलांचा गणपती निर्मिती करणारा एक ग्रुप तयार झाला. मागील वर्षी महिलांनी ५०० शाडू मातीच्या मूर्ती तयार करून विकल्या. यंदाही त्यांचे काम जोमाने सुरू आहे. कोरोनाकाळात घरकाम करणाऱ्या महिलांसाठी श्रीगणेश खऱ्या अर्थाने विघ्नहर्ता ठरला. या महिलांना सन्मानाचा रोजगार प्राप्त झाला. बचत गटाच्या गणपतींची गुजरातपर्यंत मजलपतीच्या आजारपणामुळे अकोला तेल्हारा तालुक्यातील दीपिका देशमुख यांच्या खांद्यावर कुटुंबाची जबाबदारी आली. कधी घराबाहेर न पडलेल्या दीपिका पतीचे सायकलचे दुकान सांभाळू लागल्या. मोठ्या हिमतीने त्यांनी संसाराचा गाडा हाकायला सुरुवात केली. दरम्यान, आपल्यासारख्या गरजू महिलांसाठी काहीतरी करण्याचे त्यांनी ठरवले. गावातील महिलांना एकत्र करून गृहउद्योग सुरू केला. मागील वर्षी त्यांनी बचत गटाच्या महिलांना गणपती तयार करण्याचे प्रशिक्षण दिले. यंदा या महिलांनी ३०० गणपती मूर्ती तयार केल्या. त्यांच्या गणेशमूर्तींना गुजरात राज्यातून मागणी आली आहे.

पर्यावरणपूरक उत्सवासाठी मूर्ती निर्मितीच्या प्रशिक्षणाची धडपड आर्टिस्ट कल्पना राव सांगतात, एके वर्षी पावसामुळे घरीच गणपतीचे विसर्जन केले. गणरायाची मूर्ती प्लास्टर ऑफ पॅरिसची होती. त्यामुळे ती पाण्यात विरघळली नाही. अत्यंत दु:ख झाले. तेव्हापासून स्वत: गणेशाची मातीची मूर्ती तयार करण्याचा संकल्प केला. पुढल्या वर्षी स्वत: मूर्ती तयार केली. हळूहळू आजूबाजूची मंडळी मूर्तीची मागणी करू लागली. यातूनच पर्यावरणपूरक गणपती उत्सव चळवळीचा जन्म झाला. कल्पना ५० ते ६० मूर्ती स्वत: तयार करून त्याची विक्री करतात. आपण घडवलेल्या मूर्ती जेव्हा इतरांकडे स्थापित होतात, त्यांची दहा दिवस पूजाअर्चा होते. हा आनंद समाधान देणारा असतो. उत्सवकाळात दरवर्षी कल्पना जवळपास ५ हजार लोकांना मातीच्या मूर्ती तयार करण्याचे मोफत प्रशिक्षण देतात. कार्यशाळेत शाळा, महाविद्यालय, बचत गट महिला, भजन मंडळ, भिशी गट महिला, डॉक्टर महिलांचाही सहभाग असतो.

करुणा भांडारकर संपर्क : ९665679404

बातम्या आणखी आहेत...