आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दृष्टिकोन:आजही लोकांचा टीव्ही चॅनेल्सपेक्षा वर्तमानपत्रांवरच अधिक विश्वास

औरंगाबाद4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

बोलण्यात आणि लिहिण्यात असतो तोच फरक टीव्ही चॅनेल्स आणि वृत्तपत्रे यात आहे. बोललेला शब्द परत घेता येत नाही, पण लिहिलेला शब्द दुरुस्त करता येतो. त्यामुळेच वाचकांचा वृत्तपत्रांवर विश्वास आहे.

राष्ट्रीय प्रसारमाध्यमांच्या लोकप्रियतेचा विचार केला तर त्याबद्दल सर्वसामान्यांचे प्रेम किंवा आदर वाढला आहे, हे सांगणे कठीण आहे. पण, त्याचे प्रेक्षक आणि वाचकांची संख्या नक्कीच वाढली आहे. ४५ वर्षांपूर्वी देशातील सर्वात मोठ्या वृत्तपत्राच्या केवळ ४-५ लाख प्रती छापल्या जात होत्या, परंतु आज हिंदी आणि इतर भाषांमधील अनेक वृत्तपत्रांची प्रसार संख्या लाखोंच्या घरात आणि त्यांचे वाचक कोटींच्या घरात आहेत. पूर्वी वृत्तपत्राच्या दोन-तीन आवृत्त्या निघायच्या, मग ते मोठे वृत्तपत्र समजले जायचे. पण, आता डझनभर आवृत्त्या असलेली अनेक वृत्तपत्रे आहेत. टीव्ही चॅनेल्सचीही तीच अवस्था आहे. सुरुवातीला फक्त चार-पाच चॅनेल्स दिसत होती, पण आज वेगवेगळ्या भाषांमध्ये शेकडो चॅनेल्स आहेत. प्रेक्षक आता दिवसातील अनेक तास टीव्ही पाहण्यात घालवतात, हे अनेक सर्वेक्षणे दर्शवतात. वर्तमानपत्र वाचण्यापेक्षा टीव्ही पाहणे प्रेक्षकांसाठी सुलभ आणि स्वस्त आहे.

असे असूनही वृत्तपत्रे आणि वाहिन्यांची विश्वासार्हता व सत्यता वाढली आहे, हे सांगणे कठीण आहे. टीव्ही चॅनेल्सचा विचार केला तर त्यातील दोन-तीनवरच अस्सल आणि गंभीर वादविवाद होतात. नाही तर बहुतांश वाहिन्या प्रत्येक मुद्द्यावर पक्ष प्रवक्ते आणि पक्षपाती पत्रकारांची दंगल दाखवत राहतात. टीव्ही चॅनेल्सचे मालकही टीआरपी शोधत असतात. बातम्यांचा विचार केला तर बहुतांश टीव्ही चॅनेल्स एका बाजूला झुकलेले दिसतात. त्यांच्याकडे वर्तमानपत्रांसारखे शेकडो वार्ताहरांचे जाळे नाही. त्यांचे काही वार्ताहर केवळ काही महत्त्वाच्या बातम्या आणतात आणि त्यात रंग भरण्याचा प्रयत्न करत राहतात. अनेक लोक टीव्हीवरील बातम्या पाहतात, परंतु फार कमी लोक त्यांच्यावर पूर्ण विश्वास ठेवतात. आजकाल अनेक वृत्तपत्रांचे संपादकीय आणि लेख कुठे झुकतात हे वाचकांना माहीत असले तरी त्यांना वृत्तपत्र वाचल्याशिवाय राहवत नाही. वर्तमानपत्रांचे वैशिष्ट्य म्हणजे त्यात वाचकांच्या आजूबाजूच्या भरपूर बातम्याही असतात आणि वाचलेल्या बातम्या पुन्हा पुन्हा पाहण्याचीही सोय असते. त्यांनी ऐकलेल्या आणि वाचलेल्या बातम्यांची सत्यताही ते तपासू शकतात. बोलण्यात आणि लिहिण्यात असतो तोच फरक टीव्ही चॅनेल्स आणि वृत्तपत्रे यात आहे. बोललेला शब्द परत घेता येत नाही, पण लिहिलेला शब्द दुरुस्त करता येतो. त्यामुळेच वाचकांचा वृत्तपत्रांवर विश्वास आहे.

बातम्यांचे सत्य जाणून घेण्याची तीव्र इच्छा आजकाल सोशल मीडियाला खूप लोकप्रिय बनवत आहे. आजकाल लोक फेसबुक, व्हॉट्सअॅप, ट्विटर, इन्स्टाग्राम इत्यादींवर दररोज तासन् तास घालवतात. त्यांना टीव्ही आणि वर्तमानपत्रांपेक्षा ही माध्यमे वापरण्यात जास्त आनंद मिळतो, कारण त्याद्वारे ते आपला आनंद, राग, दु:ख, निराशा, हताशपणा - सर्वकाही मोकळेपणाने व्यक्त करू शकतात. आज सोशल मीडियावर तुम्हाला हवे ते लिहा. काही क्षणातच ते असंख्य लोकांपर्यंत पोहोचू शकते. ही सुविधा कोण वापरू इच्छिणार नाही? हे विनामूल्य आणि खुले वैशिष्ट्य पारंपरिक माध्यमांपेक्षा अधिक लोकप्रिय झाले आहे. पण, ते जितके सुलभ आहे तितकेच ते धोकादायकही आहे. याचा वापर अनेकदा खोटेपणा पसरवण्यासाठी, गोंधळ निर्माण करण्यासाठी आणि हिंसाचार भडकवण्यासाठी केला जातो. आता त्याला लगाम घालण्यासाठी आवाज उठवला जात आहे. सरकार वेळोवेळी विविध निर्बंध लादतात, परंतु ते चालवणाऱ्या कंपन्याही आजकाल सावध झाल्या आहेत.

वृत्तपत्रे आणि टीव्ही चॅनेल्स ताबडतोब नियंत्रणात आणणे सोपे आहे, परंतु सोशल मीडिया हे महासागराच्या लाटांसारखे आहे. त्यावर नियंत्रण मिळवणे सोपे नाही. यावर एकमेव मार्ग म्हणजे त्याच्या वापरकर्त्यांनी स्वत:वर नियंत्रण ठेवावे आणि त्यावरील बातम्या व गोष्टी नीट तपासल्याशिवाय त्यावर विश्वास ठेवू नये. (ही लेखकाची वैयक्तिक मते आहेत.)

डॉ. वेदप्रताप वैदिक भारतीय परराष्ट्र धोरण परिषदेचे अध्यक्ष dr.vaidik@gmail.com

बातम्या आणखी आहेत...