आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘परग्रहा’वरून पत्र:सांध्यसमयीची साथ

औरंगाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

प्रिय मित्र-मैत्रिणींनो, आज ६ डिसेंबर. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा महापरिनिर्वाणदिन. स्वतंत्र भारताला एक आधुनिक, लोकशाही राष्ट्र बनवण्यातील त्यांचे योगदान अभूतपूर्व होते. हिंदू स्त्रियांना इतिहासात प्रथमच कुटुंबांतर्गत समान अधिकार मिळाला, त्याचे श्रेय बाबासाहेबांनी तयार केलेल्या हिंदू कोड बिलाला आहे. या निमित्ताने मी त्यांच्या आयुष्यातील एका दुर्लक्षित, विस्मृती व गैरसमजांनी झाकल्या गेलेल्या पर्वाचे स्मरण करणार आहे - बाबासाहेब व माईसाहेब यांचे सहजीवन.

आपण महापुरुषांना अवतारी पुरुष करून टाकतो. त्यामुळे त्यांच्या विचारांप्रमाणे कृती करण्याची आपली जबाबदारी संपते. मात्र, ते आपल्यासारखे माणूस असतात. सामान्य माणसाच्या साऱ्या दुःख-अडचणी यांना तोंड देत त्यांना असामान्यत्वाकडे वाटचाल करावी लागते. या सर्व वाटचालीत त्यांना खऱ्या अर्थाने साथ देते ती त्यांची सहचारिणी. बाहेरच्या जगातील सर्व अपमान, पराभव सोबत घेऊन महापुरुष घरात येतो, तेव्हा इतर कोणाही पुरुषाप्रमाणे त्याला हवी असते एक समंजस सोबत- त्याच्या दुःखावर फुंकर घालणारी, त्याच्या आत्मविश्वासाला उजाळा देणारी. त्याला आपल्या दुखऱ्या जागा दाखवता येतील, मन मोकळे करता येईल असा आश्वासक कोपरा तो आपल्या घरात शोधत असतो आणि सहचरीच्या प्रेमाच्या सावलीत त्याला तो सापडतो. प्रत्येक यशस्वी पुरुषामागे एक स्त्री असते असे म्हणतात. महापुरुषामागे तर त्याचे निव्वळ माणूसपण व महापुरुषपण, दोन्ही समजून घेणारी महासमंजस स्त्री उभी असणे आवश्यक असते. नाही तर आपली दुःखे, वेदना आणि कर्तबगारी यांचा डोलारा त्याला एकट्याला पेलावा लागतो. आयुष्याच्या उत्तरार्धात हा भार पेलणे पुरुषाला अतिशय कठीण होते. तेव्हा त्याच्या शारीरिक क्षमता कमी होत जातात, मनही अधिक हळवे झालेले असते. त्यामुळे पुरुषाला सोबतीची सर्वांत जास्त गरज असते ती म्हातारपणी. तरुणपणी शरीरात व मनात रग असते. हिंडणे-फिरणे, प्रवास, आहार यावर बंधने नसतात. त्या वयात अल्पकाळ सोबत लाभली तरी फारसे बिघडत नसते. मात्र, आयुष्याच्या संध्यासमयी ही सारी समीकरणे विषम होतात, तेव्हा खऱ्या अर्थाने गरज असते ती पुरुषाला आश्वस्त करणाऱ्या, समंजस व दृढ आधाराची. पुरुषाला हा आधार या वयात मिळाला नाही, तर तो पार विकल होतो. तुमच्या आजूबाजूला पाहिले तर अशी अनेक उदाहरणे तुम्हाला दिसू शकतील. या संदर्भात आपण तीन महापुरुषांची उदाहरणे पाहू – गांधी, नेहरू आणि बाबासाहेब. मोहनदास करमचंद गांधींना महात्मा बनवण्यात ज्यांचा हातभार लागला आहे, त्यात कस्तुरबांचे स्थान खूप वरचे आहे. बा म्हणजे गांधी नामक हिमालयाची केवळ सावली नव्हत्या, तर प्रत्येक क्षणी गांधींना साथ देणाऱ्या, कधी आई होऊन त्यांची काळजी घेणाऱ्या सहधर्मचारिणी होत्या. आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यात बापूंना बांची साथ लाभली असती, तर ते इतके विकल, एकाकी झाले नसते. नेहरूंचे सारे आयुष्य म्हणजे नियतीची उदारता आणि कठोरता यांचा अखंड खेळ. त्यांना कमलेसारखी सुंदर, समंजस आणि प्रगल्भ पत्नी मिळाली, पण तिचा सहवास अल्पकाळ लाभला. तिच्या अकाली मृत्यूनंतर नेहरू अतिशय एकाकी झाले व त्यांनी स्वतःला पूर्णपणे सार्वजनिक कामात गाडून घेतले. तसे घडले नसते, तर त्यांची उमेद आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यात त्यांना सोडून गेली नसती. बाबासाहेबांचे आयुष्य म्हणजे सततचा संघर्ष – स्वतःशी, तसेच भवतालाशी आणि समजून घेणारे कोणी नाही. ज्याच्यासाठी हा संघर्ष करायचा तो समाज अज्ञान व दारिद्र्यात खितपत पडलेला. कष्टाच्या दिवसात रमाबाईंची समंजस साथ लाभली नसती, तर त्यांचा संघर्ष अधिक खडतर झाला असता, पण रमाबाईंनी स्वतः विपदा झेलत संसार सांभाळला व त्याची झळ बाबासाहेबांना लागू दिली नाही. पण त्यांच्या मृत्यूनंतर बाबासाहेब एकटे पडले. विशेषतः आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यात जेव्हा त्यांच्यावर आयुष्यातील सर्वाधिक महत्त्वाच्या जबाबदाऱ्या पडल्या तेव्हा ते मानसिकदृष्ट्‍या थकले होते व त्यांची प्रकृतीही खालावली होती. तेव्हा त्यांना गरज होती उत्तम वैद्यकीय साह्य व शुश्रूषा करू शकेल अशा व्यक्तीची. त्यांच्या मनातील गोष्टी समजू शकेल व जिच्याशी अवघड समस्यांवर चर्चा करता येईल अशा प्रगल्भ बुद्धिमत्तेच्या साथीदाराची. आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे स्त्रीच्या ममताळू स्पर्शाची, मायेची. डॉ. शारदा कबीर या त्यांच्या डॉक्टरांच्या रूपात त्यांना हे सारे गुण एकत्र असणारी व्यक्ती सापडली. विशेष म्हणजे बाबासाहेबांचे अंतरंग समजून घेऊन आपले सगळे व्यक्तित्त्व त्यांच्या व्यक्तित्त्वात विलीन करण्याचीही शारदेची तयारी होती. त्या सविता ऊर्फ माईसाहेब बनून बाबासाहेबांच्या आयुष्यात आल्या आणि गृहिणी, सखी, सचिव, परिचारिका अशा अनेक रूपांनी त्यांनी ही साथ निभावली. (बाबासाहेबांनी त्यांना नेहमी ‘शारू’च म्हटले.) १५ एप्रिल १९४८ ते थेट ६ डिसेंबर १९५६, म्हणजे बाबासाहेबांच्या महपरिनिर्वाणापर्यंत त्यांनी सर्वार्थाने बाबासाहेबांची सोबत केली. बाबासाहेबांचे व्यक्तित्त्व या सहजीवनाच्या काळात अधिकच उजळून निघाले. १४ ऑक्टोबर १९५६ रोजी बाबासाहेबांसोबत त्यांनीही बौद्ध धर्माची दीक्षा घेतली. अशी दीक्षा घेणारी आधुनिक काळातील ही पहिली स्त्री. ‘बुद्ध अँड हिज धम्मा’ या पुस्तकाच्या प्रस्तावनेत बाबासाहेबांनी त्यांचा गौरव करताना ‘तिच्यामुळे माझे आयुष्य ८-१० वर्षांनी वाढले’ असे गौरवोद्गार काढले. बाबासाहेबांच्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाच्या घडामोडी - स्वतंत्र भारताचे पहिले कायदे मंत्रिपद, संविधानाचे निर्माण आणि बौद्ध धर्माचा स्वीकार ही तीनही कामे त्यांनी या कालखंडात केली, हे लक्षात घेतले, तर या सहजीवनाचे मोल आपल्या ध्यानात येईल. दुर्दैवाने बाबासाहेबांच्या मृत्यूनंतर माईसाहेबांना एकटे पाडण्यात आले. त्यांच्याविषयी अनेक अफवा पसरवून त्यांना दलित समाजापासून तोडण्यात आले. मात्र, बाबासाहेबांच्या मृत्यूनंतरही त्यांनी बाबासाहेबांची साथ सोडली नाही. काँग्रेसतर्फे राज्यसभेवर जाण्याची ऑफर त्यांनी तीनदा नाकारली. परिस्थिती अनुकूल झाल्यावर त्यांनी दलित चळवळीत सक्रिय सहभागही घेतला. वृद्धत्वातील सहजीवन आणि कर्तबगार स्त्रियांना पुरुषांची साथ मिळते का, यावर आपण नंतरच्या पत्रांतून बोलू.

रवींद्र रुक्मिणी पंढरीनाथ संपर्क : ९८३३३४६५३४

बातम्या आणखी आहेत...